वक्तृत्व स्पर्धेतूनच उद्याचे वक्ते घडतात : राज असरोंडकर

वक्तृत्व स्पर्धेतूनच उद्याचे वक्ते घडतात : राज असरोंडकर

वक्तृत्व स्पर्धेतूनच उद्याचे वक्ते घडतात : राज असरोंडकर

आपापल्या महाविद्यालयांतून इथवर येणं, इथून मंचावर येणं, सहा मिनिटं उभं राहून एखाद्या विषयावर बोलणं हे वाटतं तितकं सोपं नाही. भाषण म्हटलं की भल्याभल्यांचे पाय लटपटतात, पण तुम्ही वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्याची हिंमत दाखवलीत, हे कमी नाही. स्पर्धा जिंका अथवा नका जिंकू, पण तुमच्यात महाराष्ट्रातील उद्याचे वक्ते दडलेले आहेत, अशा शब्दात कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक राज असरोंडकर यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं.

३ फेब्रुवारी २०२४ रोजी ठाण्यातील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातर्फे आयोजित ग. का. फणसे स्मृतिचषक कोकण विभागीय आंतर- महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेसाठी असरोंडकर परीक्षक म्हणून उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. असरोंडकर यांच्यासोबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या वंदना शिंदे यांनीही परीक्षक म्हणून काम पाहिलं.

स्पर्धेचं यंदाचं १९ वं वर्ष होतं. स्पर्धेची सुरुवात अण्णा फणसे यांच्या प्रतिमेला सपुष्प अभिवादनाने  झाली. यावेळी महाविद्यालयाचे सचिव कमलेश प्रधान तसंच प्राचार्य डॉ. गणेश भगुरे आणि फणसे कुटुंबीयांच्या वतीने अंजली गुप्ते-फणसे आवर्जून उपस्थित होते.

कार्यक्रमाचं प्रास्ताविक स्पर्धेच्या समन्वयक प्रा. डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी केलं. महाराष्ट्राला प्रभावी वक्त्यांची एक समृद्ध परंपरा असल्याचं प्रज्ञा पवार यांनी सांगितलं‌. परीक्षकांचा परिचय महाविद्यालयाच्या प्रा. शीतल गाणार यांनी करून दिला. प्राचार्य डॉ. गणेश भगुरे यांनी स्पर्धकांना सदिच्छा दिल्या.

स्पर्धेत भाग घेणं आणि सर्वांपुढे येऊन धिटाईने आपलं विचार मांडणं, ही महत्त्वाची बाब असल्याचं प्राचार्य डॉ. भगुरे यांनी सांगितलं. संस्थेचे सचिव कमलेश प्रधान यांनी विद्यार्थी हा समाजाचा महत्त्वाचा घटक असून, त्यांचे विचार या स्पर्धेच्या निमित्ताने अभिव्यक्त व्हायला मदत होते, असं प्रतिपादन केलं.

स्मृतीचित्रे ते सूर्य गिळणारी मी - स्त्री आत्मकथनांचा प्रवास, महात्मा जोतीराव फुले आज असते तर, नव्या शैक्षणिक धोरणाचे प्रारुप व प्रस्तुतता, हिंसा आणि समकालीन समाज, एआय तंत्रज्ञान विरुद्ध मानवी प्रज्ञा असे आव्हानात्मक विषय होते. सर्व स्पर्धकांनी निवडलेल्या विषयावर आपली अभ्यासपूर्ण मते मांडली. त्यामधून त्यांचा विषयाचा आवाका व उत्साह दिसून आला. विषयाबाबतची त्यांची खोलवरची समज आणि उत्तम सादरीकरणाने त्यांनी सभागृहातील सर्वांना बांधून ठेवलं. स्पर्धकांची भाषणं एकापेक्षा एक सरस होती.

या स्पर्धेत रामनारायण रुईया महाविद्यालयाच्या दिक्षा सावंत या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक पटकावला. दुसरा क्रमांकावर एम डी महाविद्यालयाची वर्षाली ठाकूर आली, तर वझे केळकर महाविद्यालयाच्या कौस्तुभ गोसावी या विद्यार्थ्याला तिसऱ्या क्रमांकावर जावं लागलं असलं तरी उत्स्फुर्त वक्तृत्व स्पर्धेत त्याने बाजी मारली. शैलेंद्र एज्यूकेशन सोसायटीच्या पूनम हेंडगेची उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी निवड करण्यात आली.

उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत अंतिम निवड झालेल्या चार विद्यार्थ्यांना ऐनवेळी विषय देऊन मतमांडणी करण्यास सांगण्यात आलं. यासाठी स्पर्धकांना दैनंदिन जीवनातील परंतु आव्हानात्मक विषय देण्यात आले होते. यावेळी स्पर्धकांच्या बुद्धीमत्तेचा कस लागल्याचं दिसून आलं. 

फिरता चषक आणि रोख पारितोषिक देऊन परीक्षकांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचा गौरव करण्यात आला. उत्स्फूर्त विषयासाठी वेगळे रोख पारितोषिक देण्यात आले.

या स्पर्धेच्या पहिल्या सत्रातील सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या मराठी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. माधुरी पाथरकर यांनी तर दुसऱ्या सत्रातील बक्षीस समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. शीतल गाणार यांनी केले आणि आभाराची जबाबदारी मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी पार पाडली.

स्पर्धा समितीचे सदस्य डॉ. किशोर वानखेडे, डॉ. जान्हवी थोरात, डॉ. सर्जेराव बोऱ्हाडे आणि सिद्धी पाटील यांच्या सक्रिय सहभागाने ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. 

MediaBharatNews

Related Posts

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!