लग्नाआधी वडिलांनी शिक्षणाला प्राधान्य दिलं आणि आयुष्याला कलाटणी मिळाली !

लग्नाआधी वडिलांनी शिक्षणाला प्राधान्य दिलं आणि आयुष्याला कलाटणी मिळाली !

लग्नाआधी वडिलांनी शिक्षणाला प्राधान्य दिलं आणि आयुष्याला कलाटणी मिळाली !

 

३ जाने. सावित्रीबाई फुले जयंती सावित्रीउत्सवात रूपांतरीत होताना मनापासून आनंद होतोय. सावित्रीबाई फुले हे एक बंडखोर, परिवर्तनवादी स्वतंत्र व्यक्तिमत्व होते. जोतिबाच्या सोबत प्रत्येक कार्यात त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेविरोधात निकराने झुंज दिली.

आज ज्या समताधिष्ठित निकोप स्त्री-पुरूष नात्याचा आम्ही स्त्रिया आग्रह धरतोय त्याचा आदर्श साऊ-जोति यांनी निर्माण केलाय. त्यामुळे आमच्या विचारांची परंपरा ही कायमच अन्यायाविरूध्द आवाज उठवणारी आहे याचा मला निश्चितच अभिमान वाटतो.

माझ्या आजवरच्या जडणघडणीत या समताधिष्ठित विचारधारेचा महत्त्वाचा वाटा आहे. खरं तर यंदाच्या सावित्रीउत्सवासाठी “सावित्री आहे घरोघरी, जोतिबाचा शोध जारी” या उक्तीचा वापर अगदी यथोचित वाटतो. याचं कारण असं माझं बालपण फुले-आंबेडकरी विचारांच्या छायेत गेलं. माझे वडील गणपती कांबळे हे आंबेडकरी चळवळीतले सक्रिय कार्यकर्ते होते.

स्वतः शिक्षक असल्याने त्यांना सावित्रीचा खडतर प्रवास माहित होता तो माझ्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी मला उच्चशिक्षण दिले. आपण आजही ‘स्त्री’ला लग्नाच्या कोंदणात सजवणं हे इतिकर्तव्य मानत असतो. परंतु माझ्या वडिलांनी यापेक्षा शिक्षणाला प्राधान्य दिलं होतं. मी दहावीत असताना लग्नासाठी एक स्थळ आलं होतं परंतु माझ्या वडिलांनी ते नाकारलं. माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा हा जोतिबा माझ्यासाठी नेहमीच सर्वोच्च स्थानी राहील.

पुढे M.sc.B.Ed शिकलेला प्राध्यापक असलेल्या मुलाशी माझं लग्न झालं. प्रा. डाॅ. अर्जुन पन्हाळे या जोडीदारासोबत खऱ्या अर्थाने जोतिबासोबत माझ्या जीवनाची वाट प्रगतीच्या मार्गावर जोडली गेली. माझं पदव्युत्तर शिक्षण मी लग्नानंतर पूर्ण केलं. शिवण क्लास असो वा योग प्रशिक्षण यांतही मी प्रावीण्य मिळवू शकले ते माझ्या जोतिबाच्या पाठबळामुळे.

आज इस्लामपूरातील उदय नागरी पतसंस्थेची संचालिका म्हणून मी काम करते त्यासाठी खंबीर आधार अर्जुन पन्हाळे अर्थात माझ्या जोतिबाचा आहे.

सावित्री असो वा जोतिबा एकेकटे घडत नाहीत. ही एकमेकांना अधिक करण्याची प्रक्रिया आहे जी मी आणि पन्हाळे सर अनुभवतोय. आणि म्हणूनच मला माझा अनुभव आज या उपक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवावासा वाटला.

३ जाने. या दिवशी आम्ही सगळ्या मैत्रीणी केक कापून ‘साऊ’चा वाढदिवस साजरा करतो. यंदाही असाच आनंदी वातावरणात हा उत्सव साजरा करण्याचा मानस आहे.

अगदी दारासमोर ज्ञानमय पणती लावून, एकमेकींना सदिच्छा देऊन, घरी गोडधोड बनवून सावित्रीउत्सव साजरा करणार आहोत. सावित्रीचे ऋण व्यक्त करण्यासाठी ३ जाने. ला आवर्जून ‘सावित्रीच्या लेकीबाळी’ म्हणून भाळावर चिरी लावणार आहे.

सावित्रीच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्हीही असाच हा उत्सव साजरा करावा अशी मी आपणास विनंती करते.

 

 

 

नीलम अर्जून पन्हाळे

संचालिका, उदय पतसंस्था, इस्लामपूर


नीलम पन्हाळे यांचं मनोगत ऐकण्यासाठी इथे क्लिक करा :

MediaBharatNews

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!