आयुष्यात जोतिबा भेटत राहोत !

आयुष्यात जोतिबा भेटत राहोत !

आयुष्यात जोतिबा भेटत राहोत !

#सावित्रीउत्सव२०२१ च्या अंतर्गत ‘सावित्रीच्या लेकी घरोघरी, जोतीबांचा शोध जारी’ हा उपक्रम आपण राबवत आहोत. या घोषणेत असे अभिप्रेत दिसते की आज महिला मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडू इच्छित आहेत, सार्वजनिक जीवनात भागीदारी करु इच्छित आहेत, एका अर्थाने आजची सावित्री बनू पाहत आहेत, पण आजचे पुरुष मात्र जोतीबा बनून त्यांना साथ द्यायला तयार नाहीत. ढोबळमानाने हे खरं असलं तरी याबाबतीत आपल्या आजूबाजूला नक्कीच आपल्याला काही प्रेरणादायी उदाहरणे दिसतात, ज्यात पुरुषांच्या सकारात्मकतेचा अनुभव येतो आणि एका अर्थाने जोतिबांच्या विचारांचे दर्शन होते.

माझा तरी अनुभव याबाबतीत उत्साह वाढविणारा आहे. माझ्या बाबतीत ही सुरूवात घरापासूनच झाली. मुलगा हवाच असा हट्ट इतरत्र दिसत असताना एका मुलीनंतर थांबायचं, हा माझ्या पालकांचा निर्णय म्हणजे पुढचं पाऊलच मानलं पाहिजे.

मुलगी म्हणून माझ्यावर कोणतीच बंधनं त्यांनी कधीच लादली नाहीत. मला हवा तेवढा वेळ घराबाहेर थांबण्याचं, घरात आपलं मत ठामपणे मांडण्याचं, शिक्षणासाठी हवं ते क्षेत्र निवडण्याचं आणि त्याचबरोबर भविष्यात स्वतःचा जोडीदार देखील स्वतः निवडण्याचं स्वातंत्र्य मिळालंय.

दुसरा महत्त्वाचा अनुभव म्हणजे मी B.Sc. ला असताना आम्ही काही कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अंतर्गत रिंगणनाट्याचे प्रयोग करत होतो. संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही ७५ प्रयोग केले. हे प्रयोग करताना दौऱ्याच्या वेळी मुली फारशा नसायच्या. त्यामुळे कधीकधी एकटीला ते प्रयोग करावे लागायचे. तेव्हा दहा-बारा मुलं आणि त्यांच्यासोबत एकटी मुलगी अशी दौऱ्यावर जायची वेळ आली, तेव्हा घरून तर त्यासाठी कधी विरोध झाला नाहीच ; पण गटातल्या मुलांनीही कधीच त्यांच्यासोबत असताना असुरक्षित वाटू दिलं नाही. यातूनच एक सकस आणि निखळ मैत्रीचं नातं जोपासलं गेलं.

कॉलेजमध्ये असताना अनेक मित्र भेटले. त्यातील सगळेच चळवळीची किंवा सामाजिक वातावरणाची पार्श्वभूमी असलेले नव्हते. परंतू तरीही मुलींशी वागताना, बोलताना त्यांनी दाखवलेला आदर हा मैत्रीची नवी व्याख्या सांगणारा होता. ते केवळ म्हणायला आधुनिक विचारांचे नव्हते तर त्यांनी त्यांच्या वागण्याबोलण्यातून सुद्धा ते सिद्ध केलं.

Menstruation पासून ते Sex पर्यंत अनेक विषयांवर खूप सकस आणि अर्थपूर्ण चर्चा व्हायच्या, पण त्याचा कधीच चुकीचा अर्थ किंवा वापर झाला नाही आणि या सगळ्यातून मैत्रीच्या नवीन कक्षा रुंदावत गेल्या.

सावित्रीच्या लेकी म्हणून आम्ही कितपत यशस्वी झालो आहोत माहीत नाही. पण आयुष्यात पदोपदी भेटलेल्या या जोतिरावांनी मात्र आमच्या पावलांना वेग देण्याचं आणि आमच्या पंखांना बळ देण्याचंच काम केलं. सध्या आजूबाजूची परिस्थिती ही नक्कीच गंभीर आणि चिंताजनक असली तरी सगळंच काही बिघडलेलं नाही.

अजूनही सकारात्मकतेचे काही अंकुर आजूबाजूला आहेत, जे जोपासले तर ही परिस्थिती नक्कीच बदलेल असा विश्वास यामुळे निर्माण झाला.

इथून पुढच्या आयुष्यातही असेच जोतिबा भेटत राहोत अशी स्वार्थी इच्छा यानिमित्ताने व्यक्त करते आणि ३ जानेवारी हा दिवस वर्षातील पहिला सण म्हणून म्हणजेच सावित्री उत्सव म्हणून आपण साजरा करूया, असे आवाहन करते.

या दिवशी घरासमोर रांगोळी काढून, विवेकाची आणि ज्ञानाची एक पणती लावून, आकाशकंदील लावून, रोषणाई करून, खायला गोड-धोड करून हा दिवस आपण साजरा करूया. आम्ही सर्वजण करणारच आहोत, तुम्हीही यात सामील व्हा.

 

 

प्रणिता वारे, पुणे

M.Sc. Biotechnology


प्रणिताचं मनोगत ऐकण्यासाठी टिचकी मारा :

MediaBharatNews

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!