जीवघेण्या स्पर्धेत मुलांचं बालपण हरवतंय !

जीवघेण्या स्पर्धेत मुलांचं बालपण हरवतंय !

जीवघेण्या स्पर्धेत मुलांचं बालपण हरवतंय !

कुठे थांबावं! हे कळलं तर आयुष्य सोपं आहे. पण हे थांबणं, वाट बघणं मान्यच नसतं कित्येकदा ! काही लोकांना दिवस उगवल्यापासून ते मावळेपर्यंत फक्त घाई आणि घाईच दिसते. सगळीकडे चढाओढ , स्पर्धा, जणू घड्याळाच्या काट्याकडे पाहतच दिवसाचा कार्यक्रम आखून जगताना दिसतात काहीजण.


फार धावतो आपण. स्पर्धाच करत असतो सतत नाही का ? स्पर्धा मग ती कशाचीही असो कोणाशीही असो कधी वेळेशी, तर कधी पैशाची ,तर कधी जगण्याची !! परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावण्याची स्पर्धा ,मार्कांची शर्यत, ती तर घराघरांत चालूचं असते. या स्पर्धेत मुलांना अक्षरश: ढकलून देत त्यांना सतत धावायला लावणारे पालक आपणच तर असतो ना?

का त्याला या स्पर्धेत उर फाटेपर्यंत धावायला सांगायचं ? यथावकाश होईल ना त्याची प्रगती ! शिकेल तो त्याच्या कुवतीप्रमाणे! सगळ्या गुणांनी संपन्न आपलं मूल झालंच पाहिजे.....हा अट्टाहास पालकांचा असतो; मुलांचा नाही. त्याला तर बिचाऱ्याला याची कल्पनाही नसते. त्याला काय पाहिजे हे न विचारता आपणच ठरवतो की त्याने भविष्यात काय करायचे ?

आपल्या मुलाला सर्व गुण संपन्न बनवण्याची; चढाओढ ; स्पर्धा त्या मुलाच्या माथी मारली जाते .अगदी लहानपणापासून आपला मुलगा प्रत्येक कलेत निपुण झालाच पाहिजे असं आई वडिलांना वाटतं . त्याला हार्मोनियम, तबलाही वाजवता आला पाहिजे, त्याला गाणंही म्हणता आलं पाहिजे, नाचताही आलं पाहिजे, शिवाय शाळेतील सर्व विषयांत अगदी खेळातही तो अव्वल स्थानावर असलाच पाहिजे हा अट्टाहास .....हा खरंतर जीवघेणा अट्टाहास नाही वाटत का?

करू द्या ना त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे, क्षमतेनुसार, त्याला झेपेल तसे, त्याच्या आवडीनुसार प्रगती. जगू द्या त्याला स्वच्छंद व मुक्तपणे !सुरक्षित व आश्वासक वातारण देऊन आपल्या सोबतीने. त्याला मदत करत राहूच की आपण ! आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याला आधार जरुर द्या. तुमच्या अनुभवांचा मोलाचा फायदा त्याला नक्कीच मिळाला पाहिजे पण त्यामध्ये त्याचे बालपण हरवून जायला नको.

जगू द्या त्याला स्वच्छंदपणे; फुलपाखरासारखं! होऊद्या त्याची निकोप आणि निरागस वाढ ,अगदी बागेतल्या फुलाप्रमाणे ! सुरवंटाचे फुलपाखरू होतेच, त्या फुलपाखराप्रमाणे त्याचेही पंख विस्तारतील. तोही मुक्तपणे विहरणारच आहे. पण त्याला त्याचं मोकळं आकाश तर मिळालचं पाहिजे ना?

निसर्ग जसा आपल्या प्रत्येक अंशाला लेकराला हवं तसं योग्यवेळी बहरण्याची फुलण्याची संधी देतो हे आपण पाहतोच ना ? त्याने कधीच स्पर्धा ठेवली नाही ,कळ्यांना वेळेआधी फुलण्याची किंवा फळांना वेळेआधी पिकण्याची. पण निसर्गनियमानुसार फुलणारे फूल किती परिपूर्ण आणि सुंदर दिसते. झाडावर पिकणाऱ्या फळाची गोडी तर अमृतासारखी अवीट असते हे आपण नेहमी पाहतो.

सगळं कळतं पण वळत नाही म्हणतात ना तसं झालंय अगदी आपलं. वेगवेगळे पुरस्कार आणि बक्षिसं मिळवण्याची तर केविलवाणी धडपड दिसते. पुरस्कार मग तो कोणत्याही मार्गाने मिळो, पण जास्तीत जास्त मिळालेचं पाहिजेत..

सगळीकडे स्पर्धा , स्पर्धा आणि स्पर्धाच दिसते. नकळत आपण आपलं आणि आपल्या मुलांच स्वास्थ्य पणाला लावतो. न संपणाऱ्या अपेक्षांचे ओझं लादून, रेसच्या घोड्यांसारख धावायला लागलेली मुले कधी दिशाहीन होतात कळतही नाही......टीव्हीवर वेगवेगळे इव्हेंट व टॅलेंट सर्चच्या गोंडस नावाखाली तर स्पर्धांचीच अविरत स्पर्धा चालू आहे. कुठे चाललो आहोत आपण .....यातून नक्की काय साधणार आहोत?

फक्त मुलांवरच आपण आपली मतं लादलेली आहेत, असं नाही तर या स्पर्धेत धावणारे आपण मोठेही मागे नाहीत. ऑफिसमध्ये टार्गेट कंप्लीट करण्याची स्पर्धा, प्रमोशन पदरात पाडून घेण्याची स्पर्धा ,रस्त्यावर वाहनांचीसुध्दा ; जर कधी ट्रॅफिक जाम झालाच तर जोरात हॉर्न वाजवणाऱ्या महाभागांचीही स्पर्धाच चालू होते. आधीच प्रवासाने शिणलेले जीव आणि त्यात हा सगळा गोंधळ.

कधी कधी वाटतं माणसाने स्वतःच स्वतःचे जीवन प्रगतीच्या नावाखाली अवघड करून ठेवले आहे ! जीवन कसं साधं ,सोपं आणि दिलखुलासपणे जगावं ! ना हरण्याची लाज, ना विजयाचा उन्माद.

स्पर्धा जरूर हवी पण स्वतःचीच स्वतःशीच असावी. माझा आजचा जीवन प्रवास हा कालच्यापेक्षा छान आहे. माझ्या जीवनातील प्रत्येक टप्पा आशादायी आहे आणि माझी प्रगती जरी सावकाश झाली तरी मी माझ्या जीवनात सुखी आहे. असे समाधान असणे फार महत्वाचे.

आपणच आपल्या जीवनातील येणाऱ्या बर्‍यावाईट प्रसंगांमधून , वाटचालीं मधल्या खाचखळग्यांतून, चुकांमधून, स्वतःला सावरत, शिकत आपला प्रवास ध्येयाच्या दिशेने चालू ठेवला की यश आपल्या स्वागताला येतेच हे मात्र नक्की...!!

 

 

 

लीना तांबे

लेखिका शिक्षिका आहेत.

leena.adhalrao.tambe@gmail.com

MediaBharatNews

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!