सुखाच्या चकव्यात सापडलंय आपलं आयुष्य !

सुखाच्या चकव्यात सापडलंय आपलं आयुष्य !

सुखाच्या चकव्यात सापडलंय आपलं आयुष्य !

सकाळचा चहा घेताना सहजच बाहेर गुलमोहराच्या झाडाकडे लक्ष गेलं. रात्री अवेळी झालेल्या पावसामुळे एक घरटं मोडून खाली पडलं होतं. तो पक्षी पुन्हा नव्यानं काड्या, गवत ,पानं असं जे मिळेल ते आणून नव्या जोमाने कामाला लागला होता.

याआधी मी पाहिला नव्हता पण सुंदर पक्षी होता तो. त्याच्या नव्या घराला आकार देण्यासाठी सज्ज झाला होता. इवलासा जीव तो, कुठून एवढी मानसिक शक्ति मिळते? अगदी भारावून गेले मी.

त्याला पाहून 'कुसुमाग्रज' यांच्या एका कवितेच्या ओळी आठवल्या,"मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा!"

त्याचं फार कष्टाने काम चाललं होतं पण त्याची लगबग मात्र खूप विलोभनीय होती.

माणूस मात्र खचून जातो ; कोलमडून पडतो. असं काही संकट आलं की ! खरं तर इतर प्राण्यांपेक्षा माणूस जास्त बुध्दिमान. एकच काय, अनेक घरं तो बांधू शकतो. जरा स्थिरस्थावर झाला की सेकन्ड होम, त्यापुढे फार्म हाऊस ही तर त्याच्या स्टेटसला एक सुखाची झालर असते. त्यातून पुढं मग रिटायर्ड लाईफ निवांत जगण्यासाठी गावाला एखादं छोटंसं टुमदार बंगल्यासारखं घर.

बाजूलाच फुलबाग फुलवण्यासाठी थोडी मोकळी जागा जेथे त्यांच्या सौ मनासारख्या भाज्या, फळे व फुलांची झाडं लावणार असतात आणि त्यातच एक झोपाळ्यासाठी आवर्जून जागा ठेवायची असं दोघांनी ठरवलेलंच असतं.

आयुष्यभर घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे दोघांनी संसाराचा गाडा अक्षरशः पळवलेला असतो. होय! गाडा चालवलेला नसतोच मुळीच. दोघांच्या नोकऱ्या ही आजच्या सुखवस्तू संसाराची गरज असते म्हणूनच त्यांनी आयुष्यात घर आणि नोकरी अशी दुहेरी सर्कस केलेली असते. त्यात फार दमछाक झालेली आहे हे त्यांना १००% मान्यच असतं. पण आता मात्र न जगलेलं निवांतपणाचं जीवन जगावसं वाटत असतं.

सुखाची फार सोपी व्याख्या असते आपली मध्यमवर्गीय लोकांची. त्यासाठी करोडो रूपयांची किंवा फार श्रीमंती असण्याची गरज नसते.

सकाळपासून मात्र आपल्या पेक्षाही खूप सुखात हा समोरचा उद्योगी पक्षीच आहे, असंच मला सारखं वाटायला लागलं. कारण तो अन्न, निवारा आणि त्याची सुरक्षितता या फक्त मुलभूत गरजाच फक्त पूर्ण करत होता.

आपण मात्र पैशाचा संचय करत वस्तू आणि वास्तूमध्ये सुख शोधत बसतो. संपूर्ण आयुष्य सुखाच्या चकव्यात सापडल्यासारखं फिरत राहातो .

 

 

 

 

 

लीना तांबे 

लेखिका शिक्षिका आहेत.

leena.adhalrao.tambe@gmail.com

 

 

MediaBharatNews

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!