प्रत्येकाचं आभाळ वेगळं !

प्रत्येकाचं आभाळ वेगळं !

प्रत्येकाचं आभाळ वेगळं !

प्रत्येक व्यक्ती एकामेवाद्वितीयचं असते. विधात्याने प्रत्येकाला काही ना काही विशेषत्व बहाल केलेलं आहे. आपणच आपलं वेगळेपण शोधायचं. जर आपली मौल्यवान वस्तू हरवली तर तिचा शोध घेतल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही तसंच कधी स्वतःच्या अस्तित्वाचाही शोध घ्यायला हवा ना?

ते आपल्याला एखाद्या छंदातून सापडू शकतं. खरंच माणसाला एखादा छंद असावाच. मग तो चित्र रेखाटणे असो की रांगोळी काढणे. बाग फुलवण्याचा छंद म्हणजे एका सजीवाने दुसऱ्या सजीवाला जोपासणे व निसर्ग समजून घेण्याचा.

तन्मयतेने बागकाम करताना कधी फुलांशी, झाडांशी बोलुन पहा; मायेने त्यांच्यावर हात फिरवून पहा, नक्की प्रतिसाद देतात ते. त्यांना झालेला आनंद दाखवतात .भरभरून फुले देतात, बाग फुलवणाऱ्याच्या आनंदाला बहर यावा म्हणूनच ना?

आणखी एक छंद म्हणजे वाचन ! वाचनाचा छंद म्हणजे माझा श्वास. पुस्तके आपले गुरू, मित्र आहेत हे वाक्य आपल्या मनावर कोरलं गेलं आहे. वाचनाची खरोखर आवड असेल तर पुस्तके माणसाचा एकांतातला आधार बनतात. आजारी माणसाचा श्वास बनतात तर आयुष्याच्या संध्याकाळी एकाकी आयुष्य जगणाऱ्यांचा सखा सोबतीही बनतात.

छंद माणसाला चिरतरूण ठेवतात. सोबत तर करतातच पण कधीकधी व्यावहारीक दुनियेत हरवलेल्या माणसाला स्वतःला शोधायला मदतही करतात ; म्हणूनच वाचताना एखाद्या कथेतील व्यक्तीरेखा ओळखीची वाटते, जवळची वाटते. पुस्तकात जरी असली तरी ती सजीव होऊन बोलू लागते. तिच्या सुखदुःखाशी आपण जोडले जातो. अगदी पुस्तक वाचून संपले, कथा संपली तरीही मनात घर करून राहते.

हे असं छंदात हरवणं सापडणं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. जणूकाही प्रत्येकाचं आभाळच वेगळं असतं !

 

लीना तांबे

लेखिका शिक्षिका आहेत

leena.adhalrao.tambe@gmail.com

MediaBharatNews

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!