नामदार गोखलेंचा मवाळ पण ठाम सनदशीर मार्ग !

नामदार गोखलेंचा मवाळ पण ठाम सनदशीर मार्ग !

नामदार गोखलेंचा मवाळ पण ठाम सनदशीर मार्ग !

सध्याचा काळ हा संकुचित राष्ट्रवादाचा काळ आहे. प्रत्येक देश आपली संस्कृती, आपला इतिहास,आपले ऐतिहासिक पराक्रम, आपला राष्ट्रीय धर्म,आपल्या महापुरुषांचे शौर्य, लढाया, बढाया आणि सद्य स्थितीला आपल्या देशातील नेत्यांची उंची प्रतिमा निर्माण करुन सामान्य जनमानसाच्या मनांवर गारुड निर्माण करण्याचा काळ ! आणि भारताचा सबंध इतिहास उचलून पाहिला तर भारतातील लोकांची मानसिकता भावनिक आवाहनाला पटकन साद देते, असं दिसतं. बौद्धिक पातळीवर एखादा विषय पटवून देणे हे आजही तितकंच कठीण आहे.

भावनिक आवाहनात प्रचंड सजवून रंगवून शौर्यकथा रचल्या जातात आणि शौर्य म्हटलं की त्यापाठोपाठ येते आक्रमकता, म्हणून की काय भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात शांत, संयमी,विधायक, कृतीशील काम करणाऱ्यांचं जेवढे विशेष गारुड भारतीय जनमानसावर दिसते, तितकाच लोकांवर आक्रमक विचारसरणीचाही प्रभाव आहे. ह्या आक्रमकतेमुळे काही अपवाद वगळता कित्येक समाजसुधारक झाकोळले गेले हेही तितकेच सत्य आहे.

अगदी आजही शिक्षण, रोजगार, आर्थिक सक्षमता, संसदीय लोकशाहीचा आग्रह,संविधानिक मूल्ये, आधुनिक राजकारणाला संविधानाची जोड, कायद्याचेच राज्य, सत्येचे विकेंद्रीकरण इ.साठी गोपाळ कृष्ण गोखल्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय पण आक्रमक, धार्मिक,जहालमते, हिंसेच्या आड झाकोळले गेले आहे. गोखलेंच्या जयंतीला (जाणिवपूर्वक) टिळकांचा फोटो पसरवणा-यांना आजही गोखले पचवताना जड जात आहेत आणि गोखलेंचा संविधानिक मार्ग व्यवस्थेला/विरोधकांना तेव्हाही पचला नाही आणि आजही पचत नाही.गोखलेंचा विरोध म्हणजे तुमच्यातला जहालपणा, हिंसक वृत्ती स्वत:च्या प्रजासत्ताक राज्यात स्वत:च्याच नागरिकांविरुद्ध अजूनही जिवंत असल्याची साक्ष आहे.

जो देश वेगवेगळ्या कारणांनी आपापसात विखुरला गेलाय, ज्यांच्यापर्यंत अजूनही शिक्षणाची गंगा पोहचलीच नाही, ज्यांच्या नसानसात प्रचंड विषमता ठासून भरलीय, ज्यांच्यावर धर्माचा पगडा कित्येक वर्षापासूनचा आहे, येथे राजे-रजवाड्यांची सत्ता ह्यांच्यावर सुरुवातीपासून होती,कायम गुलामी ह्या मानसिकतेत वाढणारा भारतीय समाज होता, अशा लोकांसाठी प्रथमतः सामाजिक सुधारणा गोखलेंना महत्वाची वाटली, कारण स्वातंत्र्य आणि स्वैराचाराच्यामध्ये असणारी पुसट रेषा त्यांना चांगलीच माहिती होती, म्हणूनच इंग्रज सरकारच्या मदतीने इथे सामाजिक सुधारणा घडवून आणता येतील ह्यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळे त्यांच्यावर इंग्रजांचा हस्तक असल्याचा आरोपही विरोधकांकडून झाला होता.

ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणारे नामदार गोपाल कृष्ण गोखले. येथे कायदेशीर हा शब्द विशेषतः अधोरेखित करण्यासारखा आहे.साधारणपणे आपल्याकडे स्वातंत्र्य पूर्वकाळापासूनच असा समज आहे की कायदेशीर मार्ग म्हणजे नेभळट मार्ग, कायदेशीर मार्गाने जाणारे म्हणजे मवाळ, गुळगुळीत लोक ! तसा आरोप गोखल्यांवरही वेळोवेळी झालाय. पण गोखल्यांनी आपल्या मार्गाशी कधीच तडजोड केली नाही. त्यांचा सनदशीर मार्गानेच प्रश्नांची सोडवणूक होऊ शकते, ह्यावर प्रचंड विश्वास होता.

१९०७ च्या सुरत अधिवेशनात कॉग्रसमध्ये दोन गट पडले एक जहाल गट आणि दुसरा मवाळ लोकांचा गट,जहाल गटाच नेतृत्व बाळ गंगाधर टिळक करतं होते तर मवाळांच नेतृत्व होतं गोपाल कृष्ण गोखले यांच्याकडे ! ह्या दोन्ही गटातला अगदी सुक्ष्म फरक हा होता की मवाळांचा कल आधी सामाजिक सुधारणा आणि मग राजकीय सुधारणा/बदल ह्याकडे होता तर जहालांचा याउलट. न्यायमुर्ती रानडे, गोखले, आगरकर, दादाभाई हे मवाळ गटांचे स्वातंत्र्याच्या इतिहासातील प्रमुख चेहरे. गोखले अगोदर पासूनच सामाजिक सुधारणेबाबत प्रचंड आग्रही होते. त्यांनी आपल्या देशातील जाती, धर्म,उपजाती ह्यांचा आधारभूत अभ्यास केला आणि तो वेळोवेळी आपल्या लिखानातून मांडला.

गोखले अगदी सुरुवातीच्या काळापासून उदारमतवादी नेते होते. त्यांचा ब्रिटीशांच्या न्याय बुद्धीवर विश्वास होता, म्हणून त्यांनी आपल्या लढ्याला कधीच हिंसक वळण दिलं नाही. शांतपणे कायद्याच्या चौकटीत राहून अर्ज, विनंत्या,पाठपुरावा, कायद्याचे दाखले, कायद्यातील कलमांच्या आधारावरच प्रश्नांची सोडवणूक ह्यात त्यांचा विशेष हातखंडा होता. कायदा आणि कायद्यानेच प्रश्न सोडवले जाऊ शकतात, असं मानणारा आणि वाटचाल करणारा खरा संविधानिक नेता ! कायद्यावर प्रचंड विश्वास असणारा सर्वात अग्रणी असणारा तत्कालीन अभ्यासू नेता. संविधानिक चौकटीत समस्येचे उत्तर शोधण्याचा जो हातखंडा नामदार गोखलेंनी वापरला, तशाच मार्गाबाबत आपल्याला नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकरसुद्धा आग्रही दिसतात.

अलिकडच्या काळात असे व्यासंगी गोखले सापडतात ते कायद्याने वागा लोकचळवळीच्या कार्यपद्धतीत ! भारतीय संविधानाला इजम् मानून,संविधानिक मार्गाने प्रश्नांची सोडवणूक करण्यावर भर देणारी ही चळवळ गोखलेंच्या, गांधींच्या, आगरकरांच्या, आंबेडकरांच्या मार्गावरुन शांत पद्धतीने वाटचाल करताना आपल्याला दिसून येते.गोखलेंचं अभ्यासांतीच आणि आधारभूत माहितीवरच विश्वास ठेऊन कार्य करण्याची पद्धत ह्या चळवळीत आहे. प्रश्नांचे अनेक कंगोरे आम्ही जेव्हा चर्चेला येतात, तेव्हा एकमेकांच्या मताचा आदर राखून जे सत्य माहितीवर आधारित समोर येतो त्याचाच पाठपुरावा करायला या चळवळीत शिकायला मिळतं.

कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक राज असरोंडकर नेहमी सांगतात,

“बदल ही एक प्रक्रिया आहे. ज्यांना कोणाला बदल हवाय त्यांना बदलाच्या प्रक्रियेतून जाणं अपरिहार्य आहे. बदल होताना दिसत नाही तो झालेला दिसतो.त्यामुळे प्रक्रियेत सहभागींना बदलांचे श्रेय सहसा मिळत नाही. आपल्या हयातीतच बदल झाला पाहिजे, असा हट्ट प्रक्रियेला मारक ठरतो. बदलासाठी आवश्यक आहे सयंम आणि प्रयत्नांच सातत्य”

कायद्याने वागा लोकचळवळीचा बदल होतो, होऊ शकतो यावर विश्वास आहे, त्या प्रकियेवरही विश्वास आहे. बदलासाठी शांत, संयमी सातत्यपूर्ण संविधानिक मार्गानेच जाणंच आवश्यक आहे. आणि सद्य घडीला भारतीय संविधान हेच आमच्यासाठी प्रत्येक प्रश्नांच उत्तर आहे. आज कायद्याने वागा लोकचळवळ महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पाय रोवून उभी आहे. समुहाने बदलाच्या दिशेने जात आहे. अहिंसक मार्गावर पूर्ण विश्वास आहे. भावनिक गोष्टींना तिथे जागा नसते. बुद्धी तर्कावर आधारीत, ठोस माहितीच्या बळावर लढाई विस्तारत चालली आहे.

त्या काळातही गोपाल कृष्ण गोखले अगदी शांतपणे भारतीय जनमासांत लोकशाही मूल्ये रुजविण्याचं काम करत होते. लोकांचं मत बनविण्याच काम अगदी नेटाने सयंमी आपल्यावर विरोधकांकडून होणा-या टिकेला न जुमानता सातत्याने त्यांनी सुरू ठेवलं. हे मत बनविण्याची प्रक्रिया हे पुढे लोकशाहीचा आत्मा बनला. जनमानसांच मत बनवणे ही दीर्घ प्रक्रिया आहे. लोकांच्या बुद्धीला आव्हान करुन,कुठलीही धार्मिक, आस्मितेची, जातीची, पंथाची,भावनिक साद न घालता थेट लोकांच्या बुद्धीपर्यंत झिरपत नेण्याचं काम त्या काळात गोखलेंनी केलंय. लोकांच्या बुद्धीला साद घालून, लोकांच्या प्रश्नावर लोकांची मत बनवणं हे सर्वात कठीण काम होतं. हल्ली आपण पहातोच लोकांची मतं धर्माच्या, जातीच्या आधारावर कुठलाच विधायक अजेंडा नसताना, संविधानिक मुल्यांची पार माती करून, तात्पुरती भावनिक साद घालून मतं विकत घेतली जाण्याचा हा काळ आहे.

मत बनवणं लांबच राहिलं. लोकांचं स्वत:चं असलेलं वैयक्तिक मतच मारून टाकून केवळ एखाद्या चिन्हावर डोळे झाकून मतदान करायला भाग पाडणाऱ्या लोकशाहीचा हा काळ आज आपण ह्याची देही ह्याची डोळा पहातोय. त्यामुळे गोखल्यांचं त्याकाळातही शांततेत लोकांची मत बनविणं आणि त्याचा परिणामातून विकास साधून घेणे हे काम अगदी लख्ख वाटू लागतं आणि संविधानिक मूल्यांना जागणारे गोखले हे अधिक उजळून समोर येतात.

एकाच वेळी समाजसुधारक,अर्थतज्ञ,उत्तम संसदपट्टू, कार्यकर्ता, शिक्षणतज्ञ, स्वातंत्रसेनानी,आणि लोकशाहीचा/संविधानिक मार्गाचा पुरस्कर्ता असणा-या गोपाळ कृष्ण गोखलेंना कायद्याने वागा लोकचळवळी तर्फे मनपूर्वक अभिवादन.


अंकुश हंबर्डे पाटील

लेेेेखक कायद्याने वागा लोकचळवळीचे नांदेड जिल्हा समन्वयक आहेत.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!