वसिमा शेख म्हणतात, माझ्या यशाचा प्रवास खडतर‌ !

वसिमा शेख म्हणतात, माझ्या यशाचा प्रवास खडतर‌ !

वसिमा शेख म्हणतात, माझ्या यशाचा प्रवास खडतर‌ !

एम. पी. एस. सी. ची तयारी केल्यानंतर यशस्वी होऊन उपजिल्हाधिकारी हे पद मला मिळालेलं आहे. हे पद जरी सर्वांना दिसत असले तरी या मागचा संघर्ष मोठा आहे. हा एक खडतर प्रवास आहे. जो अनेकांना माहिती नाही तो आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते.

 

राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी पद गाठलेल्या वसिमा शेख यांचं मनोगत ! त्यांच्याच शब्दांत…

 

मी जोशीसांगवी, ता.लोहा, जिल्हा. नांदेड या १५०० लोकवस्तीच्या छोट्याशा गावातून आलेली आहे. या गावात परिवहन, रस्ता अशा मूलभूत सुविधांची वानवा आहे. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा जोशीसांगवी येथे तर माध्यमिक शिक्षण याच गावातील बाळब्रह्मचारी वैरागी महाराज माध्यमिक शाळा येथे झाले.

आम्ही कुटुंबात ६ भावंड त्यात ४ बहिणी २ भाऊ आणि आई वडील. वडील मनोरुग्ण त्यामुळे कुटुंबाचा संपूर्ण भार आईवर. तिने शेतात व इतर ठिकाणी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला.

सुरुवातीला आईच्या उत्पन्नातून घरखर्च पार पडत असे. नंतर आम्हा भावंडांचा शैक्षणिक खर्च वाढू लागला. माझा पुढील शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी माझ्या भावाने स्वतःचे शिक्षण बीएससीच्या दुसऱ्या वर्षाला असताना थांबवले आणि स्वतः ऑटोरिक्षा चालून आम्हाला शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.

पुढे मी प्रियदर्शनी गर्ल्स कॉलेज कंधार येथून ८३% मार्कांनी तालुक्यातून प्रथम येत उत्तीर्ण झाले. त्यावेळी सर्वत्र कौतुक झाल्यावर शिक्षकांनी घरच्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याबाबत सुचवले. या शिक्षकांचे माझ्या यशाच्या प्रत्येक टप्प्यावर खूप महत्त्वाचे योगदान आहे. कारण राज्यसेवा परीक्षेसाठी असणाऱ्या अभ्यासक्रमाचा पाया यात शिक्षकांनी मजबूत केला होता, त्यामुळे पुढचा अभ्यास करणे सोपे झाले.

त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथून बी.ए त्याच बरोबर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड येथून डी.एडचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

२०१६ साली राज्यसेवा स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात आले. त्याच वर्षी “विक्रीकर निरीक्षक” परीक्षेत अवघ्या दोन मार्कांनी अपयश आले. तर दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी ठरले.

पण माझं मन फिल्डवरील कामाकडे धावत होते. सेल्स टॅक्सचा जॉब कार्यालयात काहीसा चौकटबद्ध. त्यामुळे या नोकरीतून वेळ काढून राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास सुरूच ठेवला आणि २०१९ साली झालेल्या परीक्षेत यशस्वी होऊन राज्यात तिसरा क्रमांक मिळवून उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्त झाली आहे.

या सर्व यशानंतर एक सांगू इच्छिते, माझी कौटुंबिक पार्श्वभूमी विशेष काही नाही, आर्थिक पाठबळ जेमतेम.

घरात कोणतेही शैक्षणिक वातावरण नाही. आमच्या कुटुंबात जवळच्या नातेवाईकांत मीच पहिली पदवीधर ! सरकारी नोकरीतही कोणी नसल्याने घरातून मार्गदर्शन मिळालेच नाही.

तरीसुद्धा या सर्वात माझा भाऊ आणि माझी आई या दोनच व्यक्ती भक्कमपणे माझ्या पाठीशी उभ्या होत्या. माझ्या यशाचे श्रेय या दोघांनाच. आज ते सर्वजण या आनंदाचा अनुभव घेत आहेत. माझे शिक्षक, तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार असलेल्या, माझ्या सासर माहेरचे सर्व कुटुंबीय या सर्वांचे या यशामध्ये योगदान आहे. याबद्दल सर्वांचे आभार!!

( वसिमा शेख यांच्या माध्यमांत दिलेल्या मुलाखतींवर आधारित)

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!