इथे ज्योत मालावताना तिथे पाचाड गावात पुण्यश्लोक आईसाहेबांच्या समधीवर वाऱ्याची झुळूक उतरून, वर रायगडाचा दरवाजा करकर करत उघडला असेल. तिथूनच पुढे ती मुक्तीची वाट गेली.
स्वराज्याचे सरनौबत नेताजी, प्रतापराव, हंबीरराव, ज्यांनी श्रींच्या राज्याकरिता रक्ताचा अभिषेक केला ते मुरारबाजीपासून रामजी पांगेरापर्यंतचे अगदी सगळे शिलेदार, 'कोण लेकाचा शाहीर माझ्या राजाचं कवतिक जगाला अविरत सांगत व्हता पाहूया, येतोय त्यो, येईलच..' म्हणत त्याठिकाणी उत्सुकतेनं वाट बघू लागले असतील. झुळूक तशी वर जाईल.
दरबार अजूनही तसाच भरलेला, पहाटे सूर्याची किरणे सिंहासनापर्यंत आलेली आणि तेव्हा ती झुळूक त्या वाटेवर अदबीनं सरकली. इतक्यात नगारे वाजून, गर्जना होताना, स्नान-पूजा करून, माथी श्री जगदंबेचे गंध लावून रयतेचा राजा, प्रौढप्रतापपुरंदर, स्वराज्यभूषण छत्रपती महाराज त्याठिकाणी विराजमान झाले असतील, सूर्याची किरणं त्यांच्या चरणावर स्पर्शाताना ती झुळुकही त्या तिथेच विसावली असेल..!

मुक्ती-मुक्ती म्हणजे तरी काय हो.. जे कार्य करायचे होते, ते तडीस जाणे म्हणजे मुक्ती!
आज पहाटे एका मावळखोऱ्यातील शिवभक्ताच्या शिवकार्याचा लौकिक अर्थाने अखेरचा भंडारा उधळला गेला. तो जसा आसमंतात वर-वर गेला असेल, तसा त्याच्या प्रत्येक कणातून या मातीत नूतन शिवशाहीराचे बीज रुजले गेले असेल.
शिवकार्य हे अखंड सुरूच राहील, पण त्यातही श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे या योगदानाची पणती शिवालयात कायम तेवत राहील यात शंका नाही!
वाईट वाटायचे ते वाटतेच, दुःख व्हायचे ते होतेच, पण डोळे पुसताना अश्रूंतील उब कुठेतरी समजावते, 'मी आहे.. तुमच्या रुपात, स्वराज्य यज्ञातील माझ्या राजाच्या नावे केल्या प्रत्येक कार्याच्या समिधेत.. तेवढे सुरू ठेवा..!'
गडाचा अदृश्य दरवाजा तसाच करकर करून बंद होईल, तेव्हा आत त्या चरणांवर त्या झुळुकीची दोन फुलं होतील, जी कधीच कोमेजणार नाहीत..!
आदित्य दवणे
मराठीतील नामवंत कवी