विकृत सर्जनशीलता जोमाने कामाला लागलीय !

विकृत सर्जनशीलता जोमाने कामाला लागलीय !

विकृत सर्जनशीलता जोमाने कामाला लागलीय !

रेल्वे स्टेशनवर गतप्राण आईजवळचं मूल आणि घरकामगार स्त्रीमुळे होणाऱ्या लागणीपासून बचाव करण्यासाठी यंत्राची जाहिरात! असंवेदनशील समाजाची ही ताजी दोन रूपं. करोनाचं पाणी नाकातोंडात जाऊ लागल्यावर मध्यमवर्ग नावाची माकडीण एका मागोमाग एक रोज नवनवीन बळीवर पाय रोवून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. करोनामुळे होणाऱ्या मृत्युच्या भयाहून आपल्या समाजाने पांघरलेले एकेक बुरखे ज्या वेगाने टराटरा फाटत आहेत त्याचं भय जास्त दाटून येत आहे. हे सगळे बुरखे गळून पडल्यावर एखादा सापळा तरी आत असणार आहे की नाही, का नुसतीच पोकळ हवा ?

रस्त्या स्टेशनावर माणसं किडा मुंग्यांसारखी मरत, दोन घासासाठी खेचाखेच करत आहेत. माणसांचे हाल , भूख, मुलांची , महिलांची दीनवाणी अवस्था याकडे बघितलं, बोललं तरी आपल्या सरकारशी प्रतारणा तर होणार नाही ना अशी भीती या उच्चमध्यमवर्गाला वाटते.

हे सुस्ठीतीतले लोक मित्र, आप्त यांना भेटायला शहरात, फार्म हाउसवर, थंड हवेच्या ठिकाणी आपल्या गाड्यांनी सहज पोहोचत आहेत त्यामुळे हे दीनवाणं मरण, भेगाळलेले, दुखावलेले पाय त्यांचे अश्रू हा त्यांच्या मेजवान्या, ऑनलाईन खेळ, करमणूक यात बिब्बा घालण्याचा कट वाटतोय त्यांना, तोही निष्प्रभ माध्यमं आणि विरोधकांचा?

कष्टकरी, तृतीय श्रेणी सरकारी कर्मचारी, छोटे व्यावसायिक असलेल्या आई बापांच्या पोटची मुलं आज आपला गाव, राज्य सोडून शहरात ‘ गेटेड कम्युनिटी’त सर्वार्थाने सुरक्षित आहेत तरीही त्यांना रोज नवनव्या शत्रूमुळे धोका निर्माण होत असतो. पाकिस्तान, काश्मीर, तबलीघी करत करत हा धोका आता रोज मदतीला येणाऱ्या बायकांवर येऊन पोहोचला आहे.

सण, आजारपण, गावी जाणं यासाठीही त्यांनी कधी सुट्टी घेतली तर घरावर महाकाय संकटाचं सावट पसरायचं त्याच घरा घरात आता त्या नंबर एक शत्रू झाल्या आहेत. घरी येणाऱ्या मदतनीस बायकाच काय तो करोना घेऊन येणार आहेत. मध्यमवर्गाच्या नोकऱ्या, व्यवसाय सुरक्षेचे उपाय घेऊन चालू शकतात. यांच्या घरात भाजी, सामान यावं यासाठी जे काम करतात ते काय कोरोना कवच घालून जन्मले आहेत?

कोरोना आला म्हणून सफाई कर्मचाऱ्यांना कोणी सुट्टी दिल्याचं ऐकिवात नाही कारण ते काम कोण करणार ? कुणामुळे लागण होणार आणि कुणामुळे नाही हा यांचा स्वार्थ ठरवणार.

मदतनीस बाईचं काम हे काही काम नाहीच, कारण ते काम करण्यासाठी हक्काची बाई घरातच आहे. ‘कुटुंबाच्या रक्षणासाठी’ असं गोंडस नाव दिलं की घरातल्या बाईलाही आता ही कामं करण्याचा हुरूप येतो. स्वत:ची कामं स्वत: करता येणं हे उत्तम आहे पण करोना आल्यानंतर त्याचा साक्षात्कार होत असेल तर त्यात खोट आहे. आता त्यांची अस्वच्छता आणि अडाणीपणाचे धोके याची चर्चा करणं हा निर्लज्जपणा आहे. आता त्यांच्यापासून लागण होण्याची भीती वाटते ते संकट तिथपर्यंत गेलं कसं? नेलं कुणी ? याकडे सोयीस्कर डोळेझाक केली जातेय.

कधी वेळ आलीच तर ज्या डॉक्टर, नर्सेस शिवाय पर्याय नाही त्यांनासुद्घा घरातून हाकलून दिलं जातंय. लागणीपासून बचाव म्हणत सुरक्षेच्या नावाखाली कातडीबचाऊ संकुचित वृत्ती सोयीस्कर फोफावत चालली आहे त्याचं लांगुलचालन करून खिसे भरण्यासाठी असल्या विखारी जाहिरात करणारी विकृत सर्जनशीलता जोमाने कामाला लागली आहे आणि जे जबाबदार आहेत त्यांची निष्क्रियता डोळ्याआड केली जातेय.

संयोगिता ढमढेरे

लेखिका मुक्त पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता आहेत.


 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!