सोमवारी पहाटे नंदू गवांदे यांचे ब्लड प्रेशर अचानक वाढल्या मुळे त्यांना नाशिकच्या गंगापुर रोडवरील गुरुजी रुग्णालयात ऍडमिट केले. त्यानंतर आज दुपारी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांची प्राणज्योत मालवली..एक सच्चा कलावंत गेला.. 'जनस्थान'चा एक तारा निखळला..आज दुपारी ही धक्कादायक बातमी येऊन धडकली. अन् गेल्या चाळीस वर्षांचा पट डोळ्यांसमोरून सरकत गेला.
नंदू आणि मी कॅालेजपासून सोबत होतो. तो कलाशिक्षणात एक वर्ष माझ्यापुढे होता. तसा तीन वर्षांनी मोठा. त्याने तीनच वर्षे चित्रंकलेचं शिक्षण घेतलं. परंतु केटीएचएमला त्याने एमए इकॅानॅामिक्स ( फर्स्ट क्लास ) केलं होतं. नाशिकमधे एकांकिका स्पर्धांमधून त्यानेच प्रथम मला नाटकांत आणलं होतं. आम्ही दोन तीन एकांकिका सोबत केल्या होत्या.
नंदूने बऱ्याच एकांकिका लिहील्या होत्या. अभिनय केला होता. दिग्दर्शन केलं होतं. या सगळ्यात त्याला पुरस्कारही मिळाले होते. अनेक एकपात्री स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यांतही पुरस्कार मिळवले होते.

मी नंतर पुण्यात अन पुढे मुंबईत शिकायला गेलो. त्याने खडकाळीच्या त्याच्या घरातूनच डिझाईनिंगची कामे सुरू केली. नंतर वसंत मार्केटमधे काही काळ होता. त्यानंतर आताचे कॅालेजरोडचे आफिसमधे काम सुरू केले.
मी ज्या ज्या वेळी नाशकात येत असे त्या त्या वेळी त्याच्या स्टुडिओतच माझा खूप वेळ जात असे. त्याने नवीन काय काय प्रयोग केले ते तो मला दाखवी किंवा नवीन काय काय आले आहे वाचायला ते मला विचारी, त्यावर चर्चा करणं वगैरे बरीच देवाण घेवाण होत असे. मी सुचवलेल्या अनेक ग्रंथांनी त्याची लायब्ररीही बहरत गेली.
पुढे त्याच्या व्यवसायाने जोर धरल्यावर त्याने नाटकांतून अंग काढून घेतले किंवा नाटकांतून अंग काढून घेतले म्हणून व्यवसायाने जोर धरला, असंही म्हणता येईल. नंतर तो कधीच नाटकाच्या वाटेला गेला नाही.

कॅलिग्राफी हाच त्याचा श्वास राहीला. कॅलिग्राफीत अक्षरांची नवनवीन वळणे तयार करणे, त्यासोबत विविध साधनांसह नाविन्यपुर्ण प्रयोग करणे यातच तो रममाण असे. अधुनमधून काही पुस्तकांची मुखपृष्ठेही नंदूने केली.

माझ्या काही कवीमित्रांच्या कविता घेऊन ‘पोस्टर पोएट्री’चीही भरपुर डिझाईन्स नंदूने केली. त्या सगळ्या ‘पोस्टर पोएट्री’ डिझाईन्सचा खुप मोठा चाहता वर्गही समाज माध्यमांवर निर्माण झाला होता.
नंदू , तू नाटक सोडलं होतंस तरी जीवनाच्या रंगमंचावरून लवकरच ‘एक्झिट’ घेतलीस. तुला कसा निरोप देऊ ???
केशव कासार
चित्रकार तथा कलाशिक्षक