कवी हरेंद्र : भिमरायाचा मळा राखणारा जागल्या !

कवी हरेंद्र : भिमरायाचा मळा राखणारा जागल्या !

कवी हरेंद्र : भिमरायाचा मळा राखणारा जागल्या !

 ‘पहा पहा मंजुळा, हा माझ्या भिमरायाचा मळा ‘ या भीमगीतातुन अवघ्या जगाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तन चळवळीचा आलेख मांडणारा आणि हा भिमरायाचा मळा आयुष्यभर डोळ्यात निष्ठेचे तेल घालून जपणारा जागल्या आपल्यातून निघून गेला. आपल्या अनुभव व निरीक्षणातून आंबेडकरी विचारांचा खोपा विणणारे ज्येष्ठ लोककवी हरेंद्र हिरामण जाधव यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रत्येक जण स्वतःच्या आनंदासाठी आपली अभिव्यक्ती शब्द, विचार भावनेतून व्यक्त करतो. परंतु, तीच अभिव्यक्ती जर इतरांच्या भावना व्यक्त करणारी ठरली, तर त्यातून परिवर्तन घडते. रिकाम्यापोटी आपली अभिव्यक्ती चळवळीसाठी वापरात आणणाऱ्या आंबेडकरी शाहीर, जलसेकार, गायकांत आपली वेगळी ओळख निर्माण करणारे होते लोककवी हरेंद्र जाधव.

काही वर्षांपासून ते आजाराने अंथरुणावर खिळून होते. शरीर निस्तेज होत होते त्यांचे, तरी चळवळीची तळमळ मात्र त्यांना कायम अस्वस्थ करीत होती. नाशिक जिल्ह्यातील मिग ओझर येथे १६ फेब्रुवारी १९३३ रोजी जन्मलेले हरेन्‍द्र यांनी, दहावी नंतर मुंबईत शिक्षक होऊन आयुष्यभर ज्ञानदान तर केलंच, तसंच रसिकांना आपल्या १० हजारांपेक्षा अधिक गीतातून शब्दांचे भरभरून दान देखील दिले. त्यांनी १९५० साली वयाच्या १७ व्या वर्षी लिहीलेल्या

अबब गर्दी ही किती झाली,
बाबांची मोटार आली,
गर्दी तुम्ही हटवा

या पहिल्या गीताने त्यांना लौकिक मिळवून दिला. परंतु या गीतानंतर लोकप्रियतेसाठी त्यांना दहा वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. जी, ” देवळात देवाजीने उपोषण केलं. ” या पहिल्या ध्वनिमुद्रित झालेल्या गीताने कवी हरेंद्र हे नाव महाराष्ट्राला चांगल्या प्रकारे प्रतिभाशाली कवी म्हणून परिचित करून दिले.

” पहा पहा मंजुळा,
हा माझ्या भिमरायाचा मळा…”

या गीताने तर आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचं समृद्ध चित्र उभं केलं. तसेच,

हे खरंच आहे खरं
भीमराव रामजी आंबेडकर
बाबासाहेब आंबेडकर
नाव हे गाजतंय हो जगभर

हे गीत तर आंबेडकरी समाजाच्या गळ्यातील ताईत बनलंय. त्यांची हरेंद्रगाणी प्रल्हाद – आनंद – मिलिंद शिंदेंं सह , शाहीर साबळे , कृष्णा शिंदे , किसन खरात, दत्ता जाधव, विठ्ठल उमप, अजित कडकडे, सुरेश वाडकर, त्यागराज खाडिलकर, श्रीकांत नारायण, शकुंतला जाधव ,अनुराधा पौडवाल ,उत्तरा केळकर, बेला सुलाखे, साधना सरगम, वैशाली सामंत , सुलोचना चव्हाण, रोशन सातारकर यांच्यासह अनेक नामवंत गायकांनी आपल्या गाऊन अजरामर करून ठेवलीयेत. तर नंदू होनप, मधु रेडकर, हर्षद शिंदे, अशोक वायंगणकर यांंसारख्या दिग्गज प्रयोगशील संगीतकारांनी त्यांच्या अनेक गितांना सुर साज चढवलाय.

भीमगीतांबरोबरच भक्तिगीते, भावगीते, लग्नगीते, पोवाडे ,देशभक्तीगीते, वगनाट्य, लोकनाट्य, कथा आदी साहित्य प्रकारांंत तब्बल ४५ वर्ष हा शब्द वेडा माणूस रममाण झाला. त्यांची शेकडो गाणी ध्वनी मुद्रित होऊन पाच दशके होऊन आजही रसिकांच्या ओठांवर तरळतायेत. सदैव लोकाभिमुख असणाऱ्या या कवीने आपल्या शब्दांची उधळण जातीपातीच्या सुपाबाहेर जाऊन केलीय. म्हणूनच त्यांनी लिहिलेली

” ऐका सत्यनारायणाची कथा “…

ऐकतांना भाविकांंची ब्रम्हानंदी टाळी लागल्याशिवाय राहत नाही. तर, त्यांनी लिहिलेलं

” तुच सुखकर्ता, तूच दु:खहरता,
अवघ्या दीनांच्या नाथा,
बाप्पा मोरया रे बाप्पा
मोरया रे.”..

या गाण्यातून ते श्रद्धाळूंंना देवाचरणी लीन होण्यास भाग पडतात. तर ,

” आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणतात ते दावशील का “…

असं लिहून श्रध्दांळे होऊ नका हेही बजावतात.

” माझ्या नवऱ्यानं सोडलीया दारू, बाई देव पावला गं “…

या लोकगीताने तर आजही भुरळ पडतेय. २००५ पासून कवी हरेन्‍द्र हे निवृत्तीनंतर पक्षाघाताने अधू झाले होते. त्यानंतर तुटपुंज्या पेन्शनमध्ये त्यांच्या संसार आणि आजारपणाची ठिगळं कधी जोडलीच गेली नाहीत.

एकुलत्या एका मुलीने त्यांचा हालाखीत सांभाळ केला. अखेर परिस्थिती आणि आजाराशी झुंज देतादेता काळ त्यांच्या वर भारी पडला. आणि अवघ्या जगाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुपीक विचारांचा मळा सुलभ शब्दात अभिमानाने दाखवणारा हा जागल्या भिमशिवारातुन निघून गेला. पण आपल्या हजारो बहरतं गीतांचे पीक मागे ठेवून.

( संदर्भ : भिमराव गवळी लिखित ” आंबेडकरी कलावंत, समाजमाध्यम)

 

 

प्रफुल केदारे

सहसंपादक, मिडिया भारत न्यूज
( kedarepraful@gmail.com)

MediaBharatNews

Related Posts
comments
 • सिद्धार्थ तांबे (कवी व गायक)

  May 1, 2021 at 4:09 am

  आयुष्यभर शब्दपुष्पांचा संभार वाहणा-या व आंबेडकरीचळवळीत ऊर्जा भरत की संजीवक करणा-या भीमशाहीर व लोकशाहीर हरेंद्र जाधव यांच्या स्मृतींना भावपूर्ण भीमांजली!

 • leave a comment

  Create Account  Log In Your Account  Don`t copy text!