आध्यात्मिक चळवळींनी निराजकीयीकरणाला गती दिल्याने मुस्लिम समाज मागे !

आध्यात्मिक चळवळींनी निराजकीयीकरणाला गती दिल्याने मुस्लिम समाज मागे !

आध्यात्मिक चळवळींनी निराजकीयीकरणाला गती दिल्याने मुस्लिम समाज मागे !

मुस्लीम समाजात सामाजिक सुधारणांची प्रदीर्घ परंपरा आहे. त्याचा इतिहास मध्ययुगीन काळापासून सुरू होतो. अंधश्रध्देच्या विरोधात भारतीय मुस्लिमांनी दिलेल्या लढ्याच्या उपलब्ध संदर्भाप्रमाणे इसवी सनाच्या तेराव्या शतकापासूनच्या नोंदी उपलब्ध आहेत. मुस्लीम समाजातील चालीरीती, सण उत्सवाला आलेले अवैधानिक स्वरुप, विवाहसंस्था, त्यातील चुकीच्या गोष्टी याविरोधात सातत्याने मुस्लीम समाजाने व त्यातील बुध्दीजीवी वर्गाने संघर्ष केला आहे.

औरंगजेबाच्या काळात दर्गाहच्या गुंबदवरून लहान मुलांना फेकण्याच्या प्रथेवर त्याकाळातील विचारवंताच्या मागणीनंतर बंदी घालण्यात आली होती. दारुबंदी, विधवा पुनर्विवाहाला चालना, मोहर्रममधील रक्तपाताविषयी देखील अनेक कायदे मध्ययुगात करण्यात आले होते.

दक्षिणेतील काही सुफींच्या ग्रंथांमध्ये वाईट चालीरीती आणि त्याविरोधात त्यांनी केलेली मांडणी याचे दाखले सापडतात. विधवा विवाहाला चालना देण्यासाठी केलेल्या प्रबोधनाचे संदर्भही आढळतात. शेख अहमद सरहींदी, शाह वलिउल्लाह अशा अनेक विचारवंतांनी मध्ययुगात मुस्लीम समाजातील सुधारणा चळवळीचे नेतृत्व केले आहे.

कुरआनच्या विश्लेषणाची समीक्षा केलेले अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. दक्षिण भारतात अशा अनेक विश्लेषणांच्या नोंदी मध्ययुगीन काळापासून आहेत.

आधुनिक काळात सन १८४० पासून मुस्लीम समाजात शिक्षणाच्या पध्दती व त्यातील बदलावरुन प्रचंड अंतर्गत संघर्ष सुरू होता. बिस्मिल्लाह बिलग्रामी यांनी सन १८४५ मध्ये हैदराबाद येथे मुस्लीम मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरु केली. (सुरुवातील त्याचे मदरश्यासारखे स्वरुप होते.) पुढे सहावे निजाम मीर महिबूब अलींच्या काळात त्या शाळेत इंग्रजी विषय देखील शिकवला जाउ लागला. त्यामुळे हैदराबादेतील प्रागतिक लेखक संघाच्या (तरक्कीपसंद मुसन्नीफैन) माध्यमातून १८५७ नंतर काही महिला शायर पुढे आल्या होत्या. त्याविषयीची माहिती उर्दू साहित्याच्या इतिहासात उपलब्ध आहे.

अलिग़ड येथे सर सय्यद यांनी सुरु केलेले विद्यापीठ, त्या माध्यमातून परंपरागत शिक्षण पध्दतीला दिलेले आव्हान, ही खूप मोठी सुधारणा होती. किंबहुना तो मुस्लीम समाजातील क्रांतीकारक बदल होता.

त्यांच्याच काळात मौलाना मुमताज अलींनी स्त्रीयांमध्ये जागृतीची लाट आणली होती. त्यांनी स्त्रीयांच्या प्रश्नावर उभे केलेले आंदोलन अतिशय महत्वाचे होते. पुढे याच सुधारणावादी चळवळीचे तत्त्वज्ञान घडवण्याचा प्रयत्न इक्बाल आणि मौलाना आझाद यांनी केला.

अलिकडे संघाच्या हस्तक्षेपातून मुस्लीम समाजात सुधारणेच्या चळवळीच अस्तित्वात नसल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. जो समाज काळानुसार स्वतःत बदल घडवत नाही, तो काळाच्या पटलावर आपले अस्तित्व टिकवू शकत नाही. मुस्लीम समाज सुधारणा चळवळीच्या या वैभवावरच अनेक अंतर्गत बदल घडवून घेत आज उभा आहे.

काही आध्यात्मिक चळवळींनी त्याच्या निराजकीयकरणाला गती दिल्याने हा समाज सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात मागे जातोय. त्याची जाणीव अलिकडे समाजातील तरुणांना होत आहे. त्यातून नक्कीच काही तरी नवे घडेल. शाहीनबाग आंदोलनाच्या माध्यमातून या समाजातील महिलांनी घेतलेली राजकीय भूमिकादेखील महत्वाची आहे. त्याचे स्वागत केलेच पाहिजे.

 

 

 

 

सरफराज अहमद

दक्षिण भारताच्या इतिहासाचे अभ्यासक

sarfraj.ars@gmail.com

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!