श्रद्धांजली आपल्यातल्या ढोंगीपणालाच वाहायला हवी !!!

श्रद्धांजली आपल्यातल्या ढोंगीपणालाच वाहायला हवी !!!

श्रद्धांजली आपल्यातल्या ढोंगीपणालाच वाहायला हवी !!!

आण्णा हजारेसारख्यांचं ऐकून, माहिती अधिकाराचा कायदा आणून काॅंग्रेसने देशाचं वाटोळं केलं होतं, म्हणून आण्णांनी काॅंग्रेस सरकार घालवायला हातभार लावला आणि माहिती अधिकारासहीत नागरिकांच्या खाण्यापिण्याहगण्यापासून सगळ्याच मूलभूत अधिकारांवर गदा आणणाऱ्या सरकारसाठी पायघड्या घातल्या.

२०११ मध्ये आण्णा हजारेंनी भाजपाशी हातमिळवणी करून “स्वातंत्र्याचा दुसरा लढा” उभा केला होता. वृत्तवाहिन्यांनी दिवसरात्र एक करून आण्णा हजारेंचा लढा देशातल्या स्वातंत्र्य लढ्यापेक्षाही मोठा असल्याचं चित्र निर्माण केलं होतं. आण्णा त्याने हरखून गेले होते. पण डोकं ताळ्यावर असलेले आमच्यासारखे लोक शांतपणे सगळा तमाशा पाहत होते.

आमची भूमिका त्या आंदोलनाच्या विरोधी होती. अनेक जण विचारत होते, कायद्याने वागा नावाची लोकचळवळ चालवतो, मग भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या विरोधी का? आमचं उत्तर होतं, आंदोलन प्रामाणिक नाही !!! आंदोलनाच्या पुढच्या प्रवासात त्यावर शिक्कामोर्तब झालं. “स्वातंत्र्याचा दुसरा लढा” ही सुपारी थीम देशातल्या स्वातंत्र्यावरच आघात करणारी ठरली.

कोणाही सर्वसामान्य नागरिकांना एकसारखंच असलेलं स्वातंत्र्य हे फक्त दलित, अल्पसंख्यांक यांच्यापुरतंच मर्यादित असून, ते बहुसंख्यांक हिंदुंची गळचेपी करणारं आहे, ही गरळ धर्मांधतेच्या आडून देशात रूजवण्यात रास्वसंघ, भाजपा आणि त्यांचे हस्तक यशस्वी झाले. धर्म, देवधर्म, श्रध्दा, धर्माभिमानाच्या आभासी दुनियेच्या नादात आपण आपले वास्तवातले सुकर आनंदी जगण्याचे हक्क गमावून बसतोय, याची जाणीव नसल्यामुळे आपल्याला हवं असलेलं धर्मस्वातंत्र्य मिळवणं आणि ते खुलेआम देऊ शकेल, असं सरकार आणणं हिंदुंची धार्मिक गरज बनली. तिने रास्वसंघाच्या राजकीय गरजेच्या पूर्ततेचा मार्ग मोकळा केला.

देशाला दुसरा डुप्लिकेट आण्णा हजारे मिळाला. आण्णा हजारेंचाही त्याला पाहून ऊर भरून आला. पण तोवर त्यांच्या आंदोलनातला डुप्लिकेट गांधी नव्या आण्णाने लाटला होता. अर्थात, तो गांधी त्यांनीच दिलेला होता. त्यांचा त्यांनी काढून घेतला. आण्णांनीही फारसं मनाला लावून घेतलं नव्हतं. तसेही आण्णासारख्यांचे गांधी डुप्लिकेटच असतात.‌ तुम्ही त्यांना नथुराम गोडसेंबद्दल विचारा. ते लगेच सोयिस्कर मौन धारण करतील. त्यांना देशविरोधी कटकारस्थानाचा आरोप असताना, प्रज्ञा ठाकूरला भाजपाने खासदारकीचं तिकीट देण्याबद्दल व निवडून येण्याबद्दल विचारा, ते यादवबाबा मंदिरात स्वत:ला कोंडून घेतील. त्यांना माॅब लिंचिंगबद्दल विचारा, दलितांवरील अत्याचाराबद्दल विचारा, देशात संविधान जाळलं गेल्याबद्दल विचारा…ते चुकीचं आहे, इतकं उसनं अवसान आणून बोलतील आणि कृतीशून्यता दाखवत तो विषय तिथेच संपवतील.

कर्नाटकमधील सत्तेच्या घोडाबाजाराबद्दल आण्णांनी अवाक्षर काढलेलं नाही. उत्तरप्रदेशातील बालकांचे मृत्यू, झुंडींचा नंगानाच, वाढती गुन्हेगारी, बिहारमधील बालिकांचं शोषण यावरून निर्णायक आंदोलन करीत संबंधित मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागण्याची हिंमत आण्णांमध्ये नाही. बहादूरसिंग यादवचं निकृष्ट अन्नाबाबत आवाज उठवणं, त्यानंतर त्याचा झालेला छळ, पुलवामा हल्ल्यावेळचं काॅर्बेट पार्कमधलं शुटींग, पाकिस्तानवरील हल्ल्याचा बनाव, भारतीय सेनेने स्वत:चंच विमान पाडणं किंवा सीमेवरील वाढत्या हल्ल्यात जवानांच्या मृत्यूची वाढती संख्या…एक माजी सैनिक म्हणूनही आण्णांनी याविरोधात सरकारला कधी जाब विचारलेला नाही.

मागच्या सरकारात थोडीफार तरी संवेदनशीलता होती, त्यामुळे आण्णा हिंमतीने उपोषणाला बसत. आताचे सत्ताधारी मेलो तरी दखल घेणार नाहीत, याची भीती बोलून दाखवत नसले तरी आण्णांच्या मनात असावी. रामलीला मैदानावरची गर्दी कृत्रीम होती. ती एकतर पुरवली गेलेली होती किंवा देशभक्तीचा तात्पुरता पक्षाघात झालेली भाबडी गर्दी होती. ती पुन्हा उभी करणं अशक्य असल्याची जाणीव आण्णांना असावी. कोणतंही पीक काढायचं तर जमीनीची आधी चांगली मशागत करायला हवी, हे आण्णांसारख्या ग्रामीण भागात आयुष्य गेलेल्या अनुभवी व्यक्तिला कळायला हवं होतं.

त्यांना घाई होती. लवकर गांधींचा पर्याय व्हायचं होतं. घाई नडली आणि आण्णा अध्यायाचा देशाला लवकर विसर पडला. काॅंग्रेस राजवटीत आण्णा हजारे हे नाव राळेगणसिद्धीतून जगभर गेलं होतं, ते भाजपा राजवटीत पुन्हा एका तालुक्यात मर्यादित झालं. तोंडी लावण्यापुरतं ते वृत्तवाहिन्यांच्या लबाड पत्रकारांकडून अधूनमधून येत राहील, पण शिक्षण, आरोग्य, वीजपुरवठा यात लोकाभिमुख निर्णय घेणाऱ्याचा कान पिरगळणारा आणि सार्वजनिक संस्थांचा गळा घोटत त्या कंपूतील बड्या उद्योगपतींच्या घशात घालणाऱ्या देशाशी विश्वासघात करणाऱ्या ढोंगी माणसाचं कौतुक करणारा आण्णा हजारे नावाचा फुगा फुटलेला आहे, हे आपण स्वीकारायला पाहिजे. त्यांना देशातल्या समस्यांबाबत जाब विचारणं आता आपण सोडून दिलं पाहिजे. किंबहुना, आपल्यातील अशा ढोंगीपणालाच आपण विनम्र श्रध्दांजली वाहिली पाहिजे.

राज असरोंडकर

raj.asrondkar@gmail.com

लेखक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय अभ्यासक व कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते आहेत. 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!