भाजपाचा नवा कारभारी, शिवसेनेला भारी

भाजपाचा नवा कारभारी, शिवसेनेला भारी

भाजपाचा नवा कारभारी, शिवसेनेला भारी

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यात वयाचं अंतर असलं तरी मैत्रीची एक घट्ट वीण आहे. त्यांच्यात कमालीची परस्पर एकरुपता आहे. मोदींना काय हवंय, हे अमित शहांना नेमकेपणाने ठाऊक असतं आणि ते घडवून आणतात. आज ते ज्या स्थानावर पोचलेत, तिथवर येतानाचा त्यांचा प्रवास मोठा रंजक आहे. त्यात सातत्य आहे. भाजपाने मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केल्यावर त्यांच्या प्रचाराची सूत्रं एकाएकी अमित शहांकडे आलेली नाहीत. तो अगोदरपासूनच सुरू असलेल्या सुनियोजित राजकीय प्रवासाचाच भाग होता. त्याचा आढावा राज असरोंडकर यांनी घेतला होता साप्ताहिक कलमनामा च्या २५ मे, २०१४ रोजीच्या अंकात, म्हणजे पाच वर्षांपूर्वी. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची सूत्रं अमित शहांकडे आली तर ते शिवसेनेच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने धोक्याची घंटा असेल, असा इशारा या लेखात देण्यात आला होता. तोच लेख जसाच्या तसा पुनर्प्रसारित करीत आहोत…

२००९ च्या विधानसभेची तयारी महाराष्ट्रात सुरू होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिल्यांदाच ती निवडणूक लढवत होती. मराठीचा मुद्दा ऐरणीवर होता. उत्तर भारतीयांवर केलेल्या हल्ल्यानंतर मनसेने आपला मोर्चा दुकानांवरील पाट्यांकडे वळवला होता. महाराष्ट्रात राहता ना, मग दुकानावरील पाटी मराठीतच असली पाहिजे, हा आग्रह होता. महाराष्ट्रात नव्याने घडू लागलेलं मराठी भाषाभिमानाचं राजकारण मुंबईतील गुजराती समाजाला मात्र अस्वस्थ करणारं ठरलं होतं. गुजराती समाजात बदलत्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी एकजुटीच्या हालचाली सुरूहोत्या. त्यातून गुजराती एकता अभियानचं बीज रोवलं गेलं. बैठकीला मुंबईतील बडे व्यापारी, बिल्डर्स इतकंच नव्हे, तर कला क्षेत्रातीलही नामवंत मंडळी उपस्थित होती. अजेंडा होता, गुजराती संस्कृतीचं संरक्षण-संवर्धन आणि लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय सहभाग!

मुंबईत गुजराती भाषिकांची लोकसंख्या शहरातील एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश असल्याने त्या प्रमाणात मुंबईतून महाराष्ट्र विधानसभेवर गुजराती समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, अशी गुजराती एकता अभियानची मागणी होती. ती सर्व राजकीय पक्षांपर्यंत पोचवण्यात आली. प्रत्येक संबंधित नेत्याशी चर्चा करण्यात आली. मुंबईतील ३६ जागा असल्याने प्रत्येक राजकीय पक्षाने किमान ९ उमेदवार गुजराती भाषिक द्यावेत, असा प्रस्ताव गुजराती एकता अभियानने राजकीय पक्षांपुढे ठेवला होता. पण आता निवडणुक खूप पुढे निघून आलीय, उमेदवार निवडीचा अंतिम टप्पा सुरू आहे, त्यामुळे यावेळेला शक्य होणार नाही, पुढल्या वेळी बघू, असं सांगून राजकीय पक्षांनी वेळ मारून नेली होती.

मधल्या काळात गुजराती समाज अगदीच स्वस्थ बसला असेल, असं वाटत नाही. तो स्वस्थ बसलाही नव्हता, हे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांत दिसून आलंय. सगळ्या पक्षांत आपली माणसं पेरून ठेवून राजकीय पाठबळासाठी अनेक दगडांवर पाय ठेवून असलेल्या गुजराती समाजाला अखेर नरेंद्र मोदींच्या रूपाने मसिहा सापडलाच. संपूर्ण समाजच मोदींच्या मागे असेल, तर ती लाट आम्ही तरी कशी रोखणार, असं हतबलतेने सांगण्याची पाळी कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आली. गुजरातेत नरेंद्र मोदींनी आपलं बस्तान मांडल्यावर आणि गुजरात विकासाच्या सुरस कथा देशभर रंगू लागल्यानंतर तर, गुजराती समाजाची अवस्था शरीराने महाराष्ट्रात आणि मन गुजरातेत अशी झालेली होती. आता तर मोदी देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होताहेत. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील गुजराती समाजाच्या राजकीय आशाआकांक्षांना पुन्हा नव्याने पंख फुटू लागले आहेत. त्यातच महाराष्ट्र विधासनसभा निवडणुकीची सूत्रं अमित शहा यांच्याकडे जाणार असल्याच्या घडामोडींनी तर गुजराती समाज सुखावून गेला आहे.

त्याला कारण फक्त अमित शहा गुजराती आहेत, इतकंच नाही, तर अमित शहा हे आजघडीला भाजपातलं नरेंद्र मोदींनंतरचं दुसर्या क्रमांकाचं महत्त्वाचं नाव आहे. मोदींचा हनुमानच म्हणा ना. आणि हो, अमित शहा आहेत सुद्धा पक्के मोदीभक्त. नरेंद्र मोदींना भाजपाने पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केलं, त्याचवेळी आणखी एक निर्णय भाजपाने घेतला होता. अमित शहा यांना केंद्रीय कार्यकारिणीत सामावून घेणं आणि त्यांच्याकडे उत्तर प्रदेशाचं प्रभारीपद सोपवणं. अमित शहा लागलीच कामाला लागले आणि आज आपण पाहिलं की मोदींचं राजकारण खऱ्या अर्थाने तर कोठून सावरलं गेलं असेल, तर ते उत्तर प्रदेशातून. जबाबदारी हातात घेतली, तेव्हा अमित शहा यांचा अंदाज होता, ५० ते ५५ जागांचा. त्यावेळी त्यांची राजकीय विरोधकांनी टेर उडवली होती. पण पूर्वीपासून भाजपातील आणि माध्यमांतील जे लोक अमित शहांना ओळखत होते, त्यांच्या मात्र भुवया उंचावल्या गेल्या होत्या. अमित शहा यांचं निवडणूक कौशल्य भाजपात सर्वश्रुत आहे. उत्तर प्रदेशात ८० पैकी ७३ जागा भाजपा आघाडीला मिळवून देत ते शहा यांनी नव्याने सिद्ध केलं इतकंच!!

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं नातं जुळलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघात. अहमदाबादेत संघाच्या शाखेत दोघं लहानपणापासून एकत्र आहेत. अमित शहा बड्या बापाचा मुलगा, तर नरेंद्र मोदी सर्वसामान्य कुटुंबातील. युवावस्थेत आल्यानंतर मोदी अचानक हिमालयात निघून गेल्याचं सांगण्यात येतं. शहा मात्र संघात कार्यरत राहिले. शेअर बाजारात घुसले. कुटुंबाचा प्लॅस्टिक पाईप बनवण्याचा धंदा होता. शहांनी स्वतःला त्यात गुंतवून घेतलं. काळ निघून गेला आणि पुन्हा मोदी संघाच्या कार्यात परतले. आता त्यांनी अधिक जोमाने काम सुरू केलं होतं. हळूहळू संघात मोदींनी आपला चांगलाच जम बसवला. दरम्यान, अमित शहासुद्धा त्यांच्या संपर्कात आले. शहा यांचं संघाचं काम सुरूच होतं. पण धंद्यात त्यांचं अधिक लक्ष होतं.

एक दिवस अमित शहा यांनी मोदींकडे भाजपात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि तिथून भारतीय राजकारणातील नव्या मोदीपर्वाला सुरुवात झाली. मोदींना त्यांचं भाजपातलं राजकारण करत राहण्यासाठी माध्यम मिळालं होतं. मोदींचा महत्त्वाकांक्षी स्वभाव आज सर्वांना माहीत आहे. त्यावेळी मोदींमध्ये तो सुप्त स्वरूपात वावरत होता. हाताशी चालत आलेल्या अमित शहांना मोदींनी भाजपातील आपला जासूस म्हणून वापरलं.

भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष शंकरसिंग वाघेला यांच्याकडे अमित शहांना मोदी स्वतः घेऊन गेले होते. वाघेला यांनी या घटनेची आठवण करताना अलीकडेच दिलेली प्रतिक्रिया मोठी रंजक आहे. ते म्हणतात, ‘मोदी अमित शहा यांना माझ्याकडे घेऊन आले होते. म्हणाले होते, या मुलाला पक्षात काम करायचं आहे. चांगला व्यापारी आहे. मी पटकन संमती दिली. पण नंतर माझ्या लक्षात आलं की अमित शहा माझी जासूसी करत असे. माझ्या हालचालींची खडा न् खडा माहिती मोदींना पोचवत असे. आज ते दोघेही एका जासूसी प्रकरणात चर्चेत आहेत. पण गेल्या दशकापासून ते हेच काम करत आले आहेत.’

अमित शहा यांचा काही काळ भाजपात दुय्यम नेता म्हणूनच गेला. पण हा तथाकथित चाणक्य स्वस्थ बसणारा नव्हता. काही माणसांमध्ये काहीतरी करून दाखण्याची नैसर्गिक उर्मी असते आणि ते करून दाखवण्यासाठी ते वाटेल ते करायला तयार असतात. अमित शहा यांच्यात हा स्वभाव दिसतो. १९९१ मध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी गुजरातमधील गांधीनगरमधून लढण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्या प्रचाराची जबाबदारी नरेंद्र मोदींवर होती. अर्थातच, प्रत्यक्ष मैदानात मोर्चेबांधणी करण्याचा जिम्मा अमित शहा यांच्याकडे आला. अमित शहा यांचा त्यावेळी दावा हेता की अडवाणी प्रचाराला जरी आले नाहीत, तरी त्यांच्या हमखास विजयाची मी हमी देतो. त्यांनी ते करूनही दाखवलं. अडवाणी भरघोस मतांनी निवडून आले. पक्षात नरेंद्र मोदींचं नाव झालं. पण अंतर्गत पातळीवर अमित शहा नावाचा धडाडीचा कार्यकर्ता अडवाणी आणि नरेंद्र मोदी, दोघांच्याही नजरेत भरला. अमित शहा यांचं पक्षातलं वजन वाढलं होतं. पुन्हा एक सुवर्णसंधी त्यांना चालून आली. १९९६ साली. खुद्द अटलबिहारी वाजपेयी गांधीनगरमधून लढत होते. मग काय राव. अमित शहा यांनी जीवाचं रान केलं आणि वाजपेयींची मर्जी संपादन केली.

गुजरातचं राजकारण दीर्घकाळापासून जवळून बघणारे ज्येष्ठ पत्रकार ब्रिजेशकुमार यांच्या म्हणण्यानुसार, अमित शहा निवडणूक तंत्रात, व्यवस्थापनात वाकबगार आहे. उमेदवारांना जिंकवण्यात आणि पाडण्यातही त्यांचा हातखंडा आहे. याच खासियतीमुळे मोदींवर प्रभाव टाकण्यात अमित शहा सफल झाले.

अडवाणी-वाजपेयींशी जवळीक, त्यांचा आशीर्वाद, मोदींची मर्जी या जोरावर अमित शहा यांची राजकीय घोडदौड जी सुरू झाली, ती मग चौफेर उधळली. गुजरातमधल्या सहकारी संस्थांवर त्यांनी नजर वळवली. बॅँकांपासून दुधसंस्थांपर्यंत सर्व ठिकाणांतून काँग्रेसचा वर्षानुवर्षांचा कब्जा उखडून फेकण्याचं श्रेय जर कोणाचं असेल, तर ते अमित शहा यांचं आहे. सहकार क्षेत्राचा ग्रामीण भागावर, तिथल्या राजकारणावर किती प्रभाव असतो, ते महाराष्ट्रात आपण अनेक वर्षं अनुभवतो आहे. सहकार क्षेत्रावरची पकड ढिली होताच, काँग्रेस राजकीयदृष्ट्या प्रभावहीन होत गेली. त्यानंतर अमित शहा यांनी मोर्चा वळवला. क्रिकेट बोर्डाकडे. तिथून काँग्रेसनेते नरहरी अमिन यांची कित्येक वर्र्षांची एकाधिकारशाही त्यांनी संपुष्टात आणली. कालांतराने नरेंद्र मोदी बोर्डाचे अध्यक्ष झाले आणि अमित शहा उपाध्यक्ष!!! अमित शहा यांच्या सगळ्या उचापती मोदींच्या इशाऱ्यावरच सुरू होता, हे इथे स्पष्ट झालं. आज जसे मोदी, देशाचं नेतृत्व करायला अधीर झाले होते, तीच अधिरता त्यांची केशुभाई पटेलांच्या सरकारावेळी होती. कधी एकदा मुख्यमंत्रीपदाची खुर्ची हस्तगत करतो, असं त्यावेळी मोदींना झालं होतं. केशुभाई पटेलांना त्याची जाणीव होती. म्हणूनच तत्कालीन संघटन मंत्री संजय जोशींना हाताशी धरून मोदींना राष्ट्रीय सचिव पदावर दिल्लीत आणण्यात आलं. पण मोदींचा जीव गुजरातेत अडकलेला होता. अमित शहांनी मग केशुभाईंशी जवळीक साधली. त्यांच्या अनेक निकटवर्तियांशी घनिष्ठ संबंध बनवले.

भाजपात त्यावेळी अनेकांचा आक्षेप होता की अमित शहा पक्षासाठी कमी आणि मोदींसाठी वैयक्तिक जास्त राबतात. होतंही तसंच. केशुभाई पटेलांच्या सगळ्या हालचाली अमित शहा यांच्यामार्फत मोदींना दिल्लीत बसल्याजागी माहीत पडत. केशुभाईंच्या सरकाराला हळूहळू उतरती कळा लागली होती. स्थानिक निवडणुकांपासून पोटनिवडणुकीपर्यंत प्रत्येक ठिकाणी भाजपाचा पराभव होत होता. त्यातच गुजरातवर आलेल्या भूकंपाच्या संकटाने तर केशुभाई सरकारविरोधात प्रचंड आक्रोश निर्माण झाला. त्याचवेळी अमित शहा यांनी त्यांच्याविरोधात दिल्लीत लॉबिंग केली. आपलं राजकीय कौशल्य, संघाशी असलेलं नातं अमित शहा यांनी पणाला लावलं आणि गुजरातची खुर्ची नरेंद्र मोदींसाठी खेचून आणली. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे नातं तेव्हापासून अधिक घट्ट झालं.

२००२ साली अमित शहा यांनी पहिल्यांदा सरखेज इथून विधानसभा निवडणूक लढवली आणि १ लाख ६० हजार मतांच्या फरकाने ती जिंकली. २००७ साली तोच फरक २ लाख ३५ हजार होता. दुसर्यांसाठी आपलं निवडणूक तंत्र राबवणार्या अमित शहा यांनी ते स्वतःसाठीसुद्धा तितक्याच परिणामकारकरित्या वापरलं होतं. २००२ च्या मंत्रिमंडळात अमित शहा गृहराज्यमंत्री झाले. सोबत आणखी १० मंत्रालयांची जबाबदारी त्यांच्यावर होती. ९० टक्क्यांहून अधिक समित्यावंर मोदींनी अमित शहा यांची नेमूणक केलेली होती. परिस्थिती ‘मॅनेज’ करण्याच्या गुणामुळे अमित शाह यांना अपेक्षेपेक्षा खूप काही मिळालं होतं. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मोदींचा विश्वास संपादन केला होता.

मोदींच्या मंत्रिमंडळात अमित शहा यांच्यापेक्षा अनेक अनुभवी वरिष्ठ नेते होते. पण चालायचं अमित शहा यांचंच. फक्त याला अपवाद होत्या, आनंदीबेन पटेल. अमित शहा यांना मोदींची सावली मानलं जात असलं, तरी आनंदीबेन मोदींना तुलनेत अधिक जवळच्या होत्या आणि आजही आहेत. पण तरीही गुजरातमधील राजकीय जाणकार हेच मानतात की मोदींच्या सफलतेमागे अमित शहा यांचं मोठं योगदान आहे. २४ तास हा माणूस राजकीय डावपेचात गुंग असतो. अत्यंत चलाख, सामाजिक, राजकीय गणित जुळवण्यात माहीर आणि ‘साहेबां’चा अत्यंत निष्ठावान. अगदी ‘साहेबां’च्या आदेशावरून शेकडो फोन फिरवत एखाद्या महिलेवर पाळत ठेवणारा, खोट्या चकमकी, हत्या, खंडणी, अपहरण अशा गुन्ह्यांत नाव गुंतूनही, अटक होऊनही पर्वा न करणारा, थंडपणे गेम वाजवणारा अमित शहा… अत्यंत वादग्रस्त माणूस… तितकाच शांत. मोजकं, कामापुरतंच बोलणारा. पत्रकारांच्या पकडीत न सापडणारा. जबाबदारी घेतली की झोकून देणारा. ते करताना अगदी पार आतपर्यंत घुसून खोलवर यंत्रणा ढवळून काढणारा, कोणाला काय वाटेल याची पर्वा न करणारा, निवडणुकांची जबाबदारी पार पाडताना नेत्यांना बाजूला सारून तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणारा, सूचना कमी आणि आदेश जास्त देणारा अमित शहा आता महाराष्ट्र विधानसभेची जबाबदारी सांभाळणार आहे.

संघाचाच आदेश असल्याने ते आता जवळजवळ निश्चित झालं आहे. अमित शहा यांचं कामकाज एव्हाना सुरूही झालं असेल. त्यांची स्वतःची टीम आहे. अत्यंत चलाख अशा युवकांचा त्यात भरणा आहे. ही टीम अत्याधुनिक साधनसामग्रीने सज्ज आहे. मतदारसंघांचा गेल्या २५ वर्षांचा इतिहास ती खदडून काढते. स्थानिक प्रश्नांचा, मुद्यांचा अभ्यास करते, बुथस्तरापर्र्यंतच्या कार्यकर्त्यांचं जाळं विणलं जातं आणि अत्यंत सुनियोजित परिणामकारक प्रचाराच्या धडाक्याने मतदारांना प्रभावाखाली आणलं जातं. आवश्यक निर्णय सर्व अमित शहा यांचे. दिवसेंदिवस त्यांची देहबाली बदलत चालली आहे. त्यांच्यात आता नरेंद्र मोदीच भिनू लागलेला आहे. आवाज शहा यांचा असतो, पण समोरच्या कार्यकर्ते, नेत्यांसाठी तो मोदींचाच आदेश असतो. मोदींना काय अपेक्षित आहे, हे अमित शहा यांना तंतोतंत कळून चुकलंय. इतकी त्या दोघांत एकरूपता आलीय. काही जणांना वाटतं अमित शहा यांचं वागणं साधं, नम्र आहे. काहींना ते घमंडी वाटतं. आपल्या विरोधकांना गोंधळात ठेवण्याचं आणि मनसुब्यांचा कुठलाच थांगपत्ता लागू ने देण्याचं कसब अमित शहा यांच्यात आहे.

महाराष्ट्रात एक से एक राजकीय खिलाडी आहेत. डावपेचात ते तरबेज आहेत. मोदींच्या लाटेने देशभरात भाजपाला नवसंजीवनी मिळालेली असली तरी महाराष्ट्रात कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आशा सोडलेली नाही. नव्याने डावांची मांडणी सुरू आहे. दुसरीकडे महायुतीत कमालीचा उत्साह आहे. राज्यात सत्ता येणारच हा आत्मविश्वास महायुतीत आहे. पण भाजपाला आपला मुख्यमंत्री बनवायचाय.

लोकसभा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला मागे टाकलेलं आहेच. आता विधानसभा निवडणुकीत तो फरक वाढवायचाय. कॉँग्रेस-राष्ट्रवादीचं होणारं नुकसान भाजपाच्या पदरात पडेल, असे डाव पाडायचेत. त्यासाठी शिवसेनेचं राज्यातील वर्चस्व महायुतीत वावरतानाच झुगारावं लागेल. नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, एकनाथराव खडसे, विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, मंगलप्रभात लोढा, राज पुरोहित यांची एकत्र मोट बांधावी लागेल. अंतर्गत धुसफुशीचा नाट लागू नये, याची काळजी घ्यावी लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील विजयाचं श्रेय फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींकडेच ठेवायचं असेल, तर अमित शहा यांना महाराष्ट्रात आणावंच लागेल. लोकसभा निवडणुकीत गुजराती समाजात निर्माण झालेलं राजकीय चैतन्य विधानसभा निवडणुकीत कॅश करण्यासाठी अमित शहा यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अर्थात, गुजराती समाजाला अमित शहा किती झुकतं माप देतात, ते पाहावं लागेल. कारण जाणकार सांगतात की अमित शहा यांच्या डावपेचांत जात-पात-धर्म-भाषा या भेदाभेदाला स्थान नाही. येनकेनप्रकारे निवडणूक जिंकणं इतकंच ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर असतं. गोपीनाथ मुंडेंचा ‘मी मी’ रोखण्यासाठी अमित शहा भाजपाला हवे आहेत. जरी मुंडे हा महाराष्ट्रातील लोकप्रिय चेहरा असला तरी, त्यांनी दोन वेळा दाखवलेला असंतोष भाजपा विसरलेली नाही. अशी व्यक्ती पक्षाच्या विचारधारेला भविष्यात घातक ठरू शकेल, असा पक्षांतर्गत सूर आहे. त्यांना केंद्रात जबाबदारी देऊन देवेंद्र फडणवीस यांना बोहल्यावर चढवायचं आहे. शिवसेनेचा स्वतंत्र विदर्भाचा विरोध मावळेपर्यंत फडणवीसांच्या माध्यमातून विदर्भात घट्ट राजकीय जाळं विणायचं आहे. त्यासाठी महाराष्ट्रातही भाजपाला एकहाती विजय हवा आहे. अमित शहा यांचं निवडणूक व्यवस्थापन कौशल्य भाजपाला आता महाराष्ट्रात वापरायचं आहे. उत्तर प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्राची भूमी राजकीयदृष्ट्या अधिक लवचिक आहे, असं भाजपाला वाटतंय.

अमित शहा यांच्या प्रतिमेचं उदात्तीकरण भाजपाने पद्धतशीररित्या चालवलंय असं दिसतंय. माध्यमांची भाषा या पक्षाला नेमकी कळते. कॅमेर्यांच्या फ्रेममध्ये अमित शहा यांना आणलं जात आहे. प्रत्येक घडामोडीत त्यांची उपस्थिती दाखवली जात आहे. त्यांच्या हालचाली नजरेत येणार्या असतात. वास्तविक, सारासार विचार करता भारतीय राजकारणातलं एक वादग्रस्त पात्र. पण नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ सुनियोजितपणे अमित शहा यांना जनतेत विशेषतः युवकांमध्ये हिरो बनवण्याचा प्रयत्न भाजपात सुरू आहे. एका बाजूला तत्त्वाच्या राजकारणाच्या, सामंजस्याच्या बाता आणि दुसर्या बाजूला अमित शहासारखी कडव्या विचारांची माणसं… भाजपाची दुहेरी नीती देशाला नवीन नाही. पण यावेळी ती सफल झाली आहे. अमित शहा हे भाजपाचं भविष्य आहे, भाजपाचा चेहरा आहे, असं बोललं जात आहे. परिवर्तनाच्या लाटेवर स्वार होऊन भाजपाची पुढची राजकीय वाटचाल कॉँग्रेसच्या दिशेनेच जाणार असंच चित्र सध्यातरी दिसून येत आहे.


राज असरोंडकर

लेखक कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक प्रमुख आहेत.

लेखाखालील प्रतिसाद रकान्यात आपली प्रतिक्रिया जरुर द्या.

 

MediaBharatNews

Related Posts
comments
  • प्रदिर्घ लेख . उत्तम राजकीय विश्लेषण व अभ्यासपूर्ण मुद्देसूद मांडणी असल्यामुळे लेख वाचनीय झाला आहे।
    पण लेखाचे शीर्षक ‘भाजपचा नवा………. भारी ‘ असे न देता ‘मोटाभाई आणि छोटाभाई यांची जगावेगळी यारी ‘ अशा अर्थाचे दिले असते तर् ते जास्त समर्पक वाटले असते.

  • leave a comment

    Create Account    Log In Your Account    Don`t copy text!