हे विखारी डंख कशासाठी..?

हे विखारी डंख कशासाठी..?

हे विखारी डंख कशासाठी..?

असेलही ती दोषी.. पण, ते सिद्ध करण्यासाठी न्यायालये आहेत. न्यायालयाआधीच वृत्तवाहिन्यांनी निकाल लावण्याची प्रक्रिया अगाध आहे आपल्याकडे. ती कमी म्हणून काय तर, सोशल मिडिया आहेच दिमतीला.. सोशल मिडियावर होतंय काय..? तर, केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे समर्थक ज्याला डोक्यावर घेणार त्यालाच सत्ताधारी पक्षाचे विरोधक खाली आपटण्याच्या प्रयत्नात असणार. (अर्थात, हा विरोध सत्ताधारी पक्षाला नसून त्यांच्या कार्यपद्धतीला आहे.) आणि सत्ताधारी पक्षाचे विरोधक ज्याला खाली आपटणार त्याला सत्ताधारी पक्षाचे समर्थक डोक्यावर घेऊन नाचणार. वर्तमान स्थितीत विरोधकांकडे किमान लॉजिक तरी आहे. समर्थक मात्र विरोधासाठी विरोध आणि व्यक्तीपूजनासाठी समर्थन करतानाच अधिक दिसताहेत.

गोष्ट एकट्या रिया किंवा कंगनाची नाहीय. दीपिकालाही ह्याच सोशल मिडियावर ट्रोल केलं गेलं होतं. आज कलावंत म्हणून कंगनाला गोंजारणार्‍यांनीच दीपिकामधील ‘कलावंत’ विसरून ‘छपाक’ला केवळ विरोधासाठी विरोध केला होता. २०१७ साली कंगनाने दिलेल्या सनसनाटी मुलाखतीच्या वेळी हेच पक्षीय समर्थक मूग गिळून गप्प होते. तेव्हाही विरोधक आणि सो कॉल्ड गुलाम म्हणविल्या जाणार्‍यांनी किमान कंगनाची बाजू सहानुभूती म्हणून का होईना पण समजून घेऊन तिला समर्थन तरी दिलं होतं. आजच्या कंगनाला तेच पक्षीय समर्थक डोक्यावर घेऊन नाचत आहेत, तो केवळ एक देखावा आहे. मुंबई आणि पर्यायाने महाराष्ट्रात ज्यांचं सरकार आहे, त्यांना नामोहरम करण्याची एकही संधी ही मंडळी सोडणार नाहीत. आज मुद्दाम यांच्यासाठी मी वारंवार भक्त, अंधभक्त अशी विशेषणे वापरत नाहीय. ती वापरून यांचा सन्मान वा अपमान करण्यामध्ये मूळ मुद्दा बाजूलाच राहून जातो. शिवाय आपलेच अनेक मित्र-मैत्रीणी दुखावले जातात हा भाग निराळाच. पण, हे न दुखावू देण्याची काळजी नेहमी आपणच का घ्यावी..? असाही प्रश्न अनेकदा अनुत्तरीत राहतोच.

ह्याच कंगनाने उत्तर प्रदेश किंवा बिहारच्या विरोधात मुक्ताफळे उधळली असती, तर ह्याच मंडळींनी तिला सळो की पळो करुन सोडलं असतं. पण, तिने तोंड सोडलंय ते मुंबईवर.. आणि तंबी दुराई यांनी म्हटल्याप्रमाणेच, “मुंबई बिचारी कुणीही हाका..” अशी सगळी अवस्था आहे. त्यात महाराष्ट्राने केंद्रातला पक्ष महाराष्ट्रात घरी बसवलाय, त्याचाही राग ह्या निमित्ताने काढणार. अर्थात तो काढण्यासाठी ह्या मंडळींना कोणतेही निमित्त चालते हा भाग अलाहिदा. राजेश टोपे जरा फंबल झाले.. तर, ही मंडळी त्यांना ट्रोल करणार. तिथेच मोदी आणि कंपनीने कितीही चुका केल्या तर त्यावर हीच मंडळी त्याविषयी अवाक्षरही काढणार नाहीत. त्यामानाने ‘गुलाम’ म्हणवली जाणारी मंडळी आपल्याच नेत्याच्या चुका सांगताना कचरत नाहीत, ही बाब ठळकपणे नोंदवण्यासारखी आहे. त्यामुळेच “खरे (मानसिक) गुलाम कोण..?” ह्या प्रश्नाचं उत्तरही आपसुकच मिळतं.

कालपरवा पर्यंत शिवसेना ज्या मंडळींच्या गळ्यातला ताईत होती. भले मग तो गरज किंवा नाईलाज म्हणून बांधलेला ताईत का असेना. पण, तुमच्या डोक्यावरचा मुकूट त्याच ताईतची मेहरबानी होता. आज तोच ताईत तुम्हाला टोचतोय. कारण, मुकूट उतरवला गेलाय तुमच्या डोक्यावरून.. दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांना पहिल्यांदा आणलं गेलं तेव्हा ज्या मंडळींनी नाराजीचे सूर काढले, त्यांना तेव्हा तुम्ही उत्तरं दिलीत. आदित्यवर भरभरून प्रेम केलंत तुम्ही. पण, आज तीच नाराज मंडळी आदित्यवर भरभरून प्रेम करत असताना तुम्ही मात्र आदित्यला उध्वस्त करण्याच्या शक्कल लढवित आहात. हे सगळं का..? तर आता शिवसेना नावाचा ताईत तुमच्या गळ्यातून उतरलाय. आज कितीही गळे काढत असलात. तरी, उद्या मुकूट घालण्याला उपयुक्त ठरलाच, तर पुन्हा ‘शिवसेना’ नावाचा ताईत तुम्ही आनंदाने गळ्यात मिरवाल. मग, तुमच्या तुलनेत ही तेव्हाची नाराज मंडळी खरी माणुसकी जपणारी आहेत. किमान दुटप्पी तरी वागत नाहीत. दुसर्‍याच्या आदित्यला उगा हिणवत असताना तुमचा ‘राम’ तरी कुठे पवित्र राहिलाय..? ह्याकडे कधीतरी लक्ष द्या.

आज रियाची जी काही चूक असेल वा नसेल.. पण, पुन्हा विरोधकांनी तिला सहानुभूती दाखवलीय ना.. मग पलिकडच्या भक्तांनी तिला ट्रोल केलंच पाहिजे. आणि तेच होताना दिसतंय. विरोधक कंगनाला विरोध करताहेत ना, मग समर्थकांनी तिला दुलईत गुंडाळून गोंजारलंच पाहिजे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्राचे गोडवे गाणारेच आज, “महाराष्ट्र म्हणजे काही अख्खा देश नाही.” अशी मल्लिनाथी करून कंगनाची बाजू घेत आहेत. मुंबई, महाराष्ट्र असो की आणखी कुठलाही प्रदेश.. त्याच्याविरोधात काही बरळणे ही चूकच आहे. तशात पोलीस यंत्रणेला नावं ठेवणं म्हणजे देशाच्या सुरक्षा व्यवस्थेलाच नावं ठेवणं.. मग, विरोध करणार्‍यांनी कंगनाला देशद्रोही म्हटलं, ह्यात त्यांचं काय चुकलं..?

महाराष्ट्राला, मुंबईला धडधडीत नावं ठेवणार्‍या कंगनाला ‘सद्गुणी’ ठरविणार्‍यांनीच, न्यायालयाच्या निकालाधीच रिया खलनायिका म्हणून दोषी घोषित केलंय. “कंगनाला मावा आणि रियाला चावा” (देश)भक्तीचं हे लॉजिक समजण्यापलिकडचं आहे. माझं मत विचाराल तर, कुणाची चूक असेल तर कंगनाही चूक आणि रियाही चूक. आणि नसेल चूक तर दोघी बरोबर. दुटप्पीपणाने काहीही लिहिणार नाही. मी तर आजही हेच म्हणतो, “कंगना एक उत्तम अभिनेत्री आहेच.” पण, म्हणून काही मुंबईच काय, देशाच्या कुठल्याही भागाविषयी अद्वातद्वा बोलण्याचा तिला अधिकार मिळालेला नाहीय. तिची वैयक्तिक जपणूक व्हावी, ह्यासाठी तिला पुरविण्यात आलेली सुरक्षाही योग्य आहे. पण, अशी सुरक्षा घेण्याची वेळ तिनेच स्वतःवर आणलेली आहे. ह्या मुंबईने आणि महाराष्ट्राने तिला कधीही कोणताही त्रास दिलेला नाहीय. विरोधकांनीही तिच्या चित्रीकरणाच्या क्लिप्सद्वारे तिची खिल्ली उडवणं हेही गैर आहे. उद्या आपण स्वतःही काही खरं युद्ध वगैरे करणार नाही ना.. टेक्निक्सचाच आसरा घेणार. तो चित्रपट आहे आणि अभिनेत्री आहे ती.. खरं युद्ध आणि ती खरी योद्धा असती तर बाब निराळी होती. कंगनानेही चित्रपटातल्या कथित आणि चित्रीत शौर्यावर बढाया मारणं चुकीचंच आहे.

आता रियाबद्दल सहानुभूती वाटण्याचं तसं कोणतंही कारण नाहीय. पण, एक व्यक्ती म्हणून तिची होत असलेली अवहेलनादेखील अयोग्यच आहे. पण, स्त्री म्हणून कंगना जपली जावी आणि रिया राक्षसच ठरवली जावी, हा दुजाभाव देखील पटण्यायोग्य नाहीय. रिया ही व्यक्तीरेखा एक उदाहरण किंवा प्रतीक म्हणून घेतली तर कुणाच्या आयुष्यात ‘ती’ नसते. इथल्या अनेकांच्या आयुष्यात रिया असणारच. पण, कुणीही आपली कथा जगासमोर आणत नाही. माझ्याही आयुष्यात होती एक रिया. फक्त माझा सुशांतसारखा शेवट झाला नाहीय. तो तसा होण्यासाठीचे सगळे प्रयत्न आवर्जून करण्यात आले होते. ती तिचं आयुष्य जगतेय आणि मी माझं आयुष्य जगतोय. त्या अनुभवातून सांगतोय, कुठलीही रिया १०० टक्के एकटी चुकीची नसते. काही चुका आपल्यातल्या सुशांतच्याही असतात. जर एखादी रिया एखाद्या सुशांतला फसवत जरी असेल, तरी ती फसवणूक करून घेणारा कुणी सुशांत कुठेतरी स्वतःच्याच मूर्खपणाचा बळी ठरत असतो.

आणि निघून जाणारा नेहमी सुशांतच असतो असंही नाहीय. कित्येक रियाही निघून गेलेल्या असतात. फरक इतकाच की, इथे स्त्रीची कहाणी रंगविण्याचे ब्रश थोडे निराळे असतात. पण, कुणाही व्यक्तीच्या चारित्र्याचे धिंडवडे काढणे, हे कधीही लज्जास्पद आणि गैरच आहे. उदाहरणातल्या रियाने केलेली ‘चूक’ ही उदाहरणातल्या सुशांत आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याचा भाग असते. ज्याला दोघेही सारखेच जबाबदार असतात. कदाचित सुशांतच्या जाण्यामागचं कारण निराळंही असू शकेल. अर्थात, निघून गेलेल्या सुशांतला न्याय मिळालाच पाहिजे, ह्याविषयी कोणतंही दुमत नाहीच.

असो, न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या बाबींवर आपण कोणताही निष्कर्ष काढू नये, वा तोडगा सुचविण्याचा घाटही घालू नये. “रियाचा निकाल आणि सुशांतला न्याय” ह्या दोन्हीही गोष्टींसाठी न्यायालये समर्थ आहेत. त्याआधीच रियाचे लचके तोडले जाणे गैर आहे, इतकंच ह्या निमित्ताने सुचवायचं आहे. कुठल्याही रियाला निष्कर्षाआधीच डंख मारले जात असतील, तर त्यातला एकही डंख आपला असू नये, एवढी जरी काळजी प्रत्येकाने घेतली तरी पुरे.. सुशांत, रिया, कंगना, आदित्य, दीपिका.. की आणखी कुणी.. प्रत्येकाला एक आयुष्य आहे. जे तुम्हाला आम्हाला आहे. आस्तिक असणार्‍यांनी देवाला घाबरून तरी काही चुका करू नयेत.. आणि नास्तिक असणार्‍यांनी नैतिकतेचं भान म्हणून तरी कुणाला उगीच दूषणे देऊ नयेत. हे इतकं सांभाळलं तर आपण सगळे ‘एक’ आहोत.

अस्मिता प्रत्येकाला जपायचीय. पण, नैतिकतेचा बळी जाऊ न देता ती जपली गेली, तर त्या अस्मितेला स्वतःचं झळाळणारं तेज असेल. अन्यथा ‘काळ’ अनेक गोष्टी झाकोळून टाकतोच. बाकी कुठलीही ‘सीता’ प्रत्येक युगात अग्नीपरिक्षा देत असतेच.. आणि रावण तर दरवर्षी जाळला जातो. शिवाय रामाला वनवास कायमचाच.. त्यामुळे आपल्याकडून कुणालाही त्रास होऊ न देता जगणं, हे केव्हाही श्रेयस्कर.. पटतंय का बघा..

 

 

जनार्दन केशव

मराठी साहित्यिक, भाषा अभ्यासक, गज़लकार

 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!