आता चंद्रावर उमटणार भारताचे अशोकचक्र !!

आता चंद्रावर उमटणार भारताचे अशोकचक्र !!

आता चंद्रावर उमटणार भारताचे अशोकचक्र !!

चंद्राच्या पृष्ठावर सॉफ्ट लँडिंग करणारा, त्याच्या भूरचनेचा, अंतर्गत गर्भाचा आणि वातावरणाचा अभ्यास करणारा भारत चौथा देश झाला आहे. यापूर्वी अशी कामगिरी सोव्हिएत युनियन, अमेरिका आणि चीन यांनी केली आहे. चंद्राच्या साऊथ पोल (दक्षिण ध्रुव) भागात चांद्रयान उतरणार असून तिथे ते संशोधन करणार आहे. आत्तापर्यंत कुठलाच देश ह्या भागात गेला नसून भारत हा पहिला देश ठरणार आहे. चांद्रयान चंद्रावर अशोक चक्र आणि इस्रोचं चिन्ह उमटवून परतणार आहे. रोव्हरच्या एका चाकावर अशोकचक्र आणि दुसऱ्यावर इस्रोचं चिन्ह आहे. त्यामुळे रोव्हर उतरल्यानंतर त्यांची प्रतिमा चंद्रावर उमटेल.

१५ ऑगस्ट १९६९ रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची ‘इस्रो’ची स्थापना झाली. इस्रोचं यंदाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. इस्रोच्या स्थापनेत डॉ. विक्रम साराभाई आणि डॉ. होमी भाभा यांचा मोलाचा वाटा आहे. प्रारंभापासून इस्रोच्या शास्त्रज्ञांनी ‘अवकाश तंत्रज्ञानाचा विकास करणे आणि त्याचा उपयोग विविध राष्ट्रीय कार्यात करणे’ हेच व्रत मानले आहे. डॉ. विक्रम साराभाई यांना ‘भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक’ म्हटले जाते. लँडरचं नाव ‘विक्रम’ असं ठेवण्यात आलं आहे. डॉ. विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आलं आहे. रोव्हरचं नाव ‘प्रग्यान’ असं ठेवण्यात आलं आहे.

२० जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. नासाच्या अपोलो ११ या मोहिमेचे ते महान यश होते. मानवाचे चंद्रावरचे ते पहिले पाऊल होते. या ‘जुलै’ महिन्यातच या ऐतिहासिक घटनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. इस्त्रोच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात जुलै महिन्यातभारताचे चांद्रयान-२ हे चंद्राकडे झेपावले आहे.

चंद्रावर सापडलेल्या पाण्याच्या रेणूंवर आणखी अभ्यास करण्याची गरज आहे. चंद्राचा पृष्ठभाग, चंद्राचा गाभा आणि बाह्य वातावरणाचा अभ्यास करून चंद्रावरील पाण्याचे मूळ शोधून काढण्याचा प्रयत्न आता केला जाईल. चंद्रावरील भूरचनेचा अभ्यास, तिथल्या खनिजांचा, त्याच्या बाह्यवातावरणाचा अभ्यास करणं तसेच तेथे कोणत्या स्वरूपात पाणी उपलब्ध आहे, हे पाहाणं या सुद्धा चांद्रयान-2 मोहिमेच्या उद्दिष्टांमध्ये समावेश आहे.

चंद्राच्या उदरात प्रचंड प्रमाणात ऊर्जा सामावलेली आहे. ही ऊर्जा पृथ्वीवर आणता आली तर मोठेच घबाड हाती लागणार आहे. या मोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशातील पाण्याचे व हेलियम-३चे नमुने निरीक्षण केले जाणार आहेत. हेलियम-३ मुळे पृथ्वीवरची ऊर्जासमस्या सुटण्यास मोठी मदत होणार आहे. हे संशोधन खूप महत्त्वाकांक्षी ठरणार आहे.

चांद्रयान-२ या मोहिमेद्वारे इतर महत्त्वाचे संशोधनही करण्यात येणार आहे. चंद्राच्या दक्षिणेकडील पृष्ठभागातील घटकांचा अभ्यास, चंद्रावर होणाऱ्या भूकंपाची नोंदणी, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळच्या पृष्ठभागाच्या नकाशाची नोंदणी, चंद्रासंबंधीची नवीन माहिती मिळविणे इत्यादी उद्दिष्टे ठरविण्यात आली आहेत. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मोहीम कमीतकमी खर्चाची आहे. या मोहिमेद्वारे करण्यात येणारे संशोधन हे केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या हितासाठी उपयुक्त ठरणार आहे.

दहा वर्षांपूर्वी २२ ऑक्टोबर २००८ रोजी भारताच्या चांद्रयान-१ या यानाने सतीश धवन केंद्रातून यशस्वी उड्डाण केले होते. ८ नोव्हेंबर २००८ रोजी ते चंद्रकक्षेत पोहोचले होते. त्यावेळीही भारतीय शास्त्रज्ञांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले होते. चंद्रावर गोठलेल्या स्वरूपात पाणी असल्याचे पुरावे त्यावेळी जगाला दिले गेले होते. चांद्रयान-१ पेक्षा चांद्रयान-२ ची कामगिरी खूप वेगळी आहे. या चांद्रयान-२ मोहिमेमध्ये ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर असे तीन भाग कार्य करणार आहेत. चांद्रयान-२ मधील ऑर्बिटरवर आठ, लँडरवर तीन आणि रोव्हरवर दोन अशा 13 उपकरणांमध्ये 1 उपकरण नासाचं आहे. GSLV MK-III हे 640 टन वजनाचे लाँचर भारतानं आजवर तयार केलेलं सर्वांत जास्त वजनदार लाँचर आहे. हे लाँचर 3,890 किलो वजनाचं चांद्रयान-2 घेऊन जाईल. 48 दिवसांचा प्रवास करून चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचेल.

हा ऐतिहासिक क्षण आहे. चांद्रयान-2 हे ज्या कक्षेत जाणं अपेक्षित होतं त्याहून 6 हजार किमी दूर गेलं आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. याचाच अर्थ इंधनाची बचत होईल. काही दिवसांपूर्वी तांत्रिक अडचण आली होती. आम्ही 24 तास रॉकेटचं निरीक्षण केलं, चूक शोधून काढली. इस्रोच्या टीमने केलेलं काम हे अभूतपूर्व आहे. त्यांनी सर्वांनी खूप मेहनत घेतली.

के. सिवन, इस्त्रोचे प्रमुख

आजवर चंद्राच्या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आजवरची चांद्रयानं उतरली आहेत. चंद्राचा विषुववृत्तीय प्रदेश इतर भागाच्या तुलनेत थोडा सपाट आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव मात्र दऱ्याखोऱ्यांचा आणि खडबडीत पृष्ठाचा आहे. त्यामुळे इतर कोणत्याही देशानं आजवर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाण्याचं धाडस केलेलं नाही. चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा काळ आणि स्वतःभोवती प्रदक्षिणा घालण्याचा काळ हा साधारण सारखाच असल्याने पृथ्वीवरून चंद्राची एकच बाजू दिसते. परंतु चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या भागाचंही या मोहिमेत संशोधन केलं जाणार आहे.

दक्षिण ध्रुवावर सूर्यकिरण पोहोचत नसल्याने त्याचा भाग सावलीत असतो. अशा अप्रकाशित भागाचं संशोधन, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर नक्की कसं वातावरण आहे, तिकडे किती दऱ्या आहेत, तिकडली माती कशी आहे, पाण्याचे अवशेष असतील का ? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरं शोधण्याचा प्रयत्न चांद्रयान मोहिमेतून होणार आहे. या भागाचा मोठा प्रदेश सूर्याच्या सावलीत असतो आणि सूर्यकिरणं कमी प्रमाणात पोहोचल्यामुळे हा प्रदेश अत्यंत थंड झाला आहे. त्यामुळे कायम अंधारात असणाऱ्या या प्रदेशात पाण्याचे अंश किंवा खनिजं असतील असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. नुकत्याच झालेल्या काही चांद्रमोहिमांमधून त्यावर थोडंफार संशोधनही झालं आहे. जर त्यावर अधिक संशोधन झालं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचा शोध लागला तर भविष्यात माणसाला ते फायदेशीर ठरेल.

जर माणूस अंतराळात गेला नाही तर माणसाला भविष्यच उरणार नाही, असं मत प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्ज यांनी व्यक्त केलं होतं. अंतराळ मोहिमा पार पाडण्यासाठी चंद्र अत्यंत आश्वासक आहे. पृथ्वीच्या प्राचीन इतिहासाचा आणि चंद्राचा संबंध आहे. सौरमालेच्या निर्मितीचे ऐतिहासिक पुरावेही यामुळे समोर येतात त्यामुळेच चंद्रावरती इतकं लक्ष दिलं जातं.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!