काल नंदू गवांदे गेल्याचं कळलं. विश्वासच बसेना. तसा नंदू सरांशी खूप जुना परिचय होता असंही नाही अगदी सहा-सात वर्षांचा स्नेह पण आपुलकीचा...
साहित्य संवेदनचा मराठी भाषा दिवस विशेषांक करत होते. २०१७ ची गोष्ट आहे. मुखपृष्ठ कसं असावं याबद्दल विचार सुरू होता. मी सुलेखन शिकले असल्याने मुखपृष्ठावर अक्षरं असावीत असं वाटत होतं पण साकारणार कोण? नाशिकचे सुलेखनकार नंदू गवांदे यांचं या क्षेत्रातलं काम माहीत होतं. संपर्कही मिळवला. फोन करण्यापूर्वी ज्या शिष्टाचाराची धास्ती होती त्याचा लवलेशही नंदू सरांच्या बोलण्यात नव्हता.

अंकाची संकल्पना शांतपणे ऐकून घेतली आणि लगेचच मुखपृष्ठासाठी होकार दिला. एवढंच नाही तर पुढच्या चार दिवसांत मुखपृष्ठाचे नमुने पाठवले. अक्षरांचा आकार, रंग याबद्दल त्यांच्या दृष्टीने काय आणि का योग्य आहे तेही सांगितलं. माझं मत समजून घेतलं. मी संपादनात अगदीच नवीन होते पण नंदू गवांदेंसारखी माणसं कामाचं बळ देतात.
अंक प्रकाशित झाल्यावर आवर्जून नाशिकला त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. कॅलिग्राफी आणि इतर सुरू असणाऱ्या कामाबद्दल ते खूप सविस्तर बोलले.

अक्षरं रक्तात भिनलेली असली की आपसूकच काळजातून कोरली जातात याचा प्रत्यय त्यांच्या गप्पांमध्ये येत होता. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा बोलताना उल्लेख झाला तेव्हा ते स्वतः प्रतिष्ठानला घेऊन गेले. वास्तूचा परिचय करून दिला. अल्पावधीच्या भेटीतही अक्षरं, कविता, नाटक याबद्दल बरंच बरंच बोलले होते.
अलिकडे मराठी भाषा सप्ताहानिमित्त वाड्.मय मंडळातर्फे 'अक्षरचित्र' स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्याविषयी मला कार्यशाळा घ्यायची होती. नंदू गवांदेंना फोन केला तेव्हा तासभर तरी फोनवर चर्चा केली. कॅलिग्राफी, टायपोग्राफी सगळं सविस्तर सांगितलं.

अक्षरांचा आकार, रचना आणि त्यानुसार अक्षरचित्रांच्या किती शक्यता निर्माण होऊ शकतात हे खरंच गमतीशीर होतं. रेषेची लांबी-जाडी जरा बदलली की अक्षराचा स्वभाव बदलतो. हे एरवी मला जाणवायचं पण नंदू गवांदेंनी बोलता बोलता उदाहरणांतून सांगितलं. काही नमुना कक्षरचित्रही लागलीच मला पाठवली. एवढा मनमोकळा संवाद करणारी माणसं निघून गेली की चुटपुट लागते.
मध्यंतरी एका उपक्रमात त्यांच्या अक्षरलेखनाला पारितोषिक मिळालं होतं. मला म्हणाले, " त्रास होणार नसेल तर समारंभातून सन्मानचिन्ह आणू शकाल का? मी ठाण्यात आलो की तुमच्याकडून घेईन."
नंदू सर आपली भेट राहिलीच...
वृषाली विनायक
प्राध्यापक /कवि / साहित्य कार्यकर्ता
vrushalivkamble@gmail.com