मागच्याच आठवड्यात शिवसेनेच्या महिला आघाडीच्या विभाग संघटक आशा रसाळ यांच्यावर भाजपाच्या गुंडांकडून जीवघेणा हल्ला झाला होता. त्यांना आणि त्यांच्या पतीला बेदम मारहाण करण्यात आली होती. काही दिवसांतच भाजपा समर्थक शिवसैनिकांशी संघर्ष करण्याची वेळ आपल्यावर येईल, याची कल्पना त्यांना नव्हती. शिवसेनेवर कब्जा करण्याच्या भाजपाशी कारस्थानाविरोधात त्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासमोर शिवसेना शाखेत घुसण्यापासून रोखण्यासाठी उभ्या ठाकल्या.
वेगवेगळ्या शिवसेना शाखांमध्ये एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद साजरं करून ढोलताशे वाजवून शाखांवर आपलाच कब्जा असल्याचं चित्र जनमानसात तयार करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेना संपवण्याच्या भाजपाई कारस्थानाचा हा दुसरा भाग आहे. पहिला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्यात सफल झाला. आता भाजपाला शिवसेनेवर नियंत्रण मिळवायचंय.
संकलित
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे शाखेत येणारेत हे कळल्यावर ' मधल्यामध्ये आपली अडचण नको' म्हणून शिवसेनेतले शूरवीर शाखेला टाळं लावून निघून गेले होते. टाळं तोडलं जाणार नाही, अशी त्यांची खात्री होती. पण शिंदे समर्थकांनी टाळं तोडलं. खासदार तोवर यायचे होते.
या घटनेची कुणकुण लागताच आशा रसाळ मागचापुढचा विचार न करता एकट्याच शाखेवर पोचल्या. आत शिरलेल्या एका शिवसेना नगरसेविकेला त्यांनी बाहेर यायला भाग पाडलं. दरवाजावर आडवं उभं राहून त्यांनी आत शिरू पाहणाऱ्यांना रोखलं. शिंदे समर्थकांनी त्यांना धक्काबुक्कीही केली. आशा रसाळ यांनीच ही माहिती 'मीडिया भारत न्यूज' ला दिली.
संकलित
थोड्या वेळाने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तिथे पोचले. त्यांनी आशा रसाळ यांची समजूत काढत, आपण सगळे शिवसेनेचेच आहोत, असं सांगत शाखेत शिरण्याचा प्रयत्न करीत असताना रसाळ यांनी त्यांनाही दोन्ही खांदे धरून शाखेबाहेर ओढलं. पण दीड दोनशे फुटीर व सोबतच्या पोलिस बंदोबस्तासमोर आशा रसाळ एकट्या पडल्या.
शाखेत शिरल्यावर ही खासदार शिंदेंनी समर्थकांसमोर आपली बाजू मांडली असता आशा रसाळ यांनीही 'हे सगळं भाजपाचं षडयंत्र असून, उद्धव ठाकरेंची भूमिका निव्वळ राजकारणाचा विषय नसून भाजपाच्या देशविरोधी कारवायांच्या आणि सत्तेच्या दुरुपयोगाविरोधात आहे' असं प्रत्युत्तर दिलं. शिवसेना भाजपाच्या घश्यात जाऊ देणार नाही, असंही त्यांनी खडसावलं.
महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडीत आशा रसाळ यांचा बेधडकपणा राज्यभर चर्चेचा विषय झालाय. फुटीरांना भिडणारी शिवसेनेची वाघीण असं त्यांचं कौतुक केलं जातंय.
दरम्यान, एकनाथ शिंदे समर्थक अरूण आशान यांनी आशा रसाळ यांचा खासदारांसोबतचा बैठकीत बसलेला फोटो पाठवून, अशी घटना घडली नसल्याचा खुलासा केला आहे.
ठाणे जिल्ह्यात फायनान्स कंपन्यांच्या विरोधात उभं राहिल्यामुळे यापूर्वीही आशा रसाळ यांना धमक्या, हल्ल्यांना सामोरं जावं लागलंय. पण शिवसेनेने दिलेली हिंमत पक्षात कधीतरी आपल्या सोबत काम करणाऱ्यांविरोधात वापरायची पाळी आली, याचं वाईटही वाटतंय, अशी प्रतिक्रिया आशा रसाळ यांनी 'मीडिया भारत न्यूज' शी बोलताना दिली.