संविधानाच्या अंमलबजावणीची जबाबदारी तरूणाईच्या खांद्यावर !

संविधानाच्या अंमलबजावणीची जबाबदारी तरूणाईच्या खांद्यावर !

संविधानाच्या अंमलबजावणीची जबाबदारी तरूणाईच्या खांद्यावर !

नमस्कार!! डिजिटल फुले आंबेडकर जयंती महोत्सव 2020 अहमदपूर जिल्हा लातूर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या डिजिटल व्याख्यान मालिके मध्ये मी राकेश पद्माकर आपणा सर्वांचे स्वागत करतो.

या व्याख्यानमालेसाठी अहमदपूर मधील राहुल गायकवाड विशाल साबळे आणि त्यांची संपूर्ण टीम गेले अनेक दिवस हा उपक्रम राबवण्यासाठी विविध पद्धतीने कार्यरत आहे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात लॉक डाऊन परिस्थिती असताना जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याचा उपक्रम या टीमने ठरवला त्याबद्दल त्यांचे सुरुवातीलाच आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो.

या माध्यमांच्या विषयाला अनुसरून या ठिकाणी सुरुवातीलाच सांगू इच्छितो की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण चळवळ ज्यावेळेस उभी राहत होती, त्यावेळी डॉ. आंबेडकरांचे असे ठाम मत होते, की कोणत्याही चळवळीचा विचार रुजवण्यासाठी किंवा संघटना वृद्धिंगत होण्यासाठी त्यांचे स्वतःचे वृत्तपत्र असणे आवश्यक आहे. म्हणजेच काय की ते स्वतःचे माध्यम असणे आवश्यक आहे. आज आपण जवळ जवळ शंभर वर्षांचा कालखंड गेल्यानंतर बघतो की आज आपल्याकडे विविध प्रकारची माध्यमं ही उपलब्ध आहेत आणि त्याच माध्यमाचा वापर करणं हे महत्त्वाचं आहे. आपण सर्वजण हा विचार पोहोचवण्याचं आणि त्या माध्यमातून परिवर्तनाचे काम करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

मला या व्याख्यान मालिकेमध्ये विषय दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला तरूण ! खरंतर मी त्यामध्ये थोडा विषयांमध्ये बदल करू इच्छितो , तो असा की फक्त तरुण नव्हे; कारण तरुण म्हटल्यानंतर आपल्यासमोर पुरुष तरुणाचा चेहरा समोर येतो मला त्या दृष्टिकोनातून मांडायचं आहे की आपण तरुण ऐवजी तरुणाई हा शब्द वापरणे अधिक संयुक्तिक ठरेल, कारण या संपूर्ण चळवळीत स्त्री-पुरुष आणि सर्वच लिंग भेदाच्या पलीकडे जाऊन अनेक कार्यकर्ते कार्यरत आहेत.

त्यापैकीच आमचे एक मैत्रीण दिशा पिंकी शेख ही नेहमी म्हणते की आजची जी ट्रांसजेंडर चळवळीतील त्यांची संपूर्ण लढाई ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातील योगदानामुळे आहे. असंही डॉक्टर आंबेडकरांनी आणि घटनाकारांनी संविधान लिहिताना यामध्ये कुठेही स्त्री किंवा पुरुष असा उल्लेख केलेला नाही. त्यांनी व्यक्ती असा उल्लेख केला आहे आणि म्हणूनच संपूर्ण देशातील ही जी लढाई आज लढली जाते तिच्या एका आधारावर आणि ट्रान्सजेंडर कशाला संपूर्ण देशातीलच शोषित वंचित घटकांची लढाई हे आंबेडकरांमुळे उभी आहे.

या सगळ्यातून पुढे जाताना महत्त्वाचं एक मांडायचं आहे की आज आपल्या आजूबाजूला तयार झालेले वातावरण आणि त्या पार्श्वभूमीवर आज जी आंदोलनं, जी लढाई, जे काही संपूर्ण चळवळीचे नेतृत्व ज्यांच्या हातात आहे, ती म्हणजे आजची तरुणाई. या तरुणाईकडे बघताना डॉक्टर आंबेडकर यांनी त्यांच्या दूरदृष्टीकोनातून काय अपेक्षित केले असेल? ज्यावेळी डॉ.आंबेडकर यांनी या चळवळी पुढे कश्या जातील, याचा विचार केला, त्यावेळी त्यांनी तो विचार अत्यंत व्यापक स्वरूपात मांडलेला दिसतो. याचं कारण असं की, आपण बघितलं की डॉ. आंबेडकर हे स्वतः एक अशा शोषित, उपेक्षित वर्गातून आलेले होते की, ज्या ठिकाणी त्यांनी स्वतः अनेक अन्याय्य वागणुकीला तोंड दिले आहे. हा संपूर्ण भाग आपणा सर्वांनाच माहिती आहे. त्यामध्ये पुन्हा खोलात जाण्याची आवश्यकता नाही, परंतु ज्या वेळेला देशाचे नेतृत्व करण्याची वेळ आली म्हणजे अर्थातच घटना समिती मध्ये मसुदा समितीचे अध्यक्षपद यावेळी त्यांच्याकडे आले, त्यावेळी त्यांनी कुठल्याही प्रकारचा भेदाभेद न करता, किंवा कुठल्याही प्रकारच्या एका विशिष्ट वर्ग समूहाला जात समूहाला बदला घेणे अश्या कुठल्याही प्रकारची गोष्ट केल्याचे आपल्याला अजिबात दिसून येत नाही.

हा सर्वसमावेशकपणा त्यांनी संविधान निर्मिती मध्ये आणला हाच मुळात डॉ.आंबेडकर यांचा व्यापक विचार आहे. हा व्यापक विचार पुढे घेऊन जाण्याची जाण्याची अपेक्षा डॉ. आंबेडकर यांना आजच्या तरुणाईकडून असेल असे मला वाटते.कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे डॉ.आंबेडकर ते स्वतः नेहमी म्हणत की मी लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता आहे. लोकशाही म्हटल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या व्यक्तिपूजा किंवा विभूतिपूजा यांना महत्त्व देणे डॉ. आंबेडकरांना अपेक्षित नाही कारण त्यांचे असे ठाम मत होते की कुठलीही गोष्ट तुमच्या बुद्धीला पटत असेल तरच ती तुम्ही केली पाहिजे. कोणावरही अंधविश्वास ठेवून ती करता कामा नये.ह्या गोष्टीचा सद्सद्विवेक बुद्धीने विचार करून अभ्यास करून त्यानंतरच पुढे मार्गक्रमण करा. परंतु खेदाने असे म्हणावे लागते की आपल्याकडे अनेक महान व्यक्ती मी मुद्दाम महापुरुष हा शब्द वापरणार नाही कारण या सर्व कार्यामध्ये अनेक महिलांचे महत्त्वाचे योगदान आहे, जगाच्या कल्याणासाठी ज्या काही परिवर्तनाच्या चळवळी उभ्या राहिल्या त्या सर्वांमध्ये या सर्वांचे योगदान फार मोठे आहे. आपल्याला हे दिसून येते की या सगळ्यांना आपण व्यक्तीपूजेमध्ये विभूती पूजेमध्ये बंदिस्त करून ठेवले आहे. त्यांना या बंदिस्त चौकटी मधून बाहेर काढण्याचे काम हे आजच्या तरुणाईकडून अपेक्षित आहे.

मी वारंवार तरुणाई उल्लेख करतोय, कारण डॉ. आंबेडकर म्हणतात आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की कोणताही नवीन विचार किंवा परिवर्तनाची चळवळ ही तरूणाईकडूनच उभी राहू शकते, कारण त्यांच्यामध्ये कुठलाही नवीन विचार समजून घेण्याची, ऐकून घेण्याची क्षमता जागृत असते; कारण एका विशिष्ट वयोमर्यादेनंतर बहुतांशी लोक हे नवा विचार स्वीकार करण्याच्या मानसिकतेतून दूर गेलेले असतात.

त्यामुळेच डॉ. आंबेडकर हे तरुणाईकडून जास्त अपेक्षा ठेवतात, कारण त्यांच्या दूरदृष्टीतून त्यांना असा विश्वास वाटत असे ही जगाला पुढे नेण्याचं काम आणि त्याच बरोबर भारतात त्यांना अपेक्षित असलेली सर्वसमावेशक लोकशाही रुजवण्याचं काम हे तरुणाईकडूनच होऊ शकते.

यापुढे जाताना मी मी एक वेगळा विचार जो आमच्या कायद्याने वागा चळवळीने विचारपूर्वक मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला विश्वास आहे की आपणही याच्याशी सहमत व्हाल, तो असा की, डॉ.आंबेडकर यांची संपूर्ण चळवळ जी संपूर्ण लढाई एका त्रिसूत्रीवर आधारलेली आहे ती त्रिसूत्री म्हणजे विषयाची तळमळ, विषयाचा अभ्यास आणि विषयाची मांडणी.

आपणा सर्वांना माहिती आहे की बाबासाहेब हे स्वतः मानववंशशास्त्रज्ञ होते, समाजशास्त्रज्ञ होते शास्त्री होते, उत्तम राजकीय जाणकार आणि विश्लेषण होते. अनेक चळवळींचे नेतृत्व त्यांनी केलं आणि अनेक विषयांमध्ये त्यांना रस होता आणि त्याच बरोबर अभ्यास सुद्धा होता. कुठलाही विषय त्यांनी विनाअभ्यास कधीही मांडलेला नाही, आपल्याला त्यांच्या अनेक लढाया माहिती आहेत. त्यांचं चवदार तळे सत्याग्रह असेल, काळाराम मंदिरातील सत्याग्रह असेल या सगळ्यांमध्ये केवळ संख्या महत्त्वाची नसून विचार तितकाच महत्त्वाचा आहे आणि तो विचार मांडताना त्यासाठीचा अभ्यास आहे तो महत्त्वाचा आहे. कमीत कमी लोकांना घेऊन त्यांनी ही चळवळ मोठ्या प्रमाणावर पोहोचवली. अगदी म्हणायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर आवाहन केलं असतं तर संपूर्ण देशभरातून अखंड शोषित आणि वंचित घटक जो त्यांना आपले नेतृत्व मानत होता, संपूर्ण त्यांच्या प्रत्येक चळवळ आंदोलनामध्ये उभा राहिला असता. त्यांनी तसे न करता तो विचार अधिक अभ्यासपूर्ण मांडणीतून अनेकांपर्यंत पोहोचवला. त्यांची अनेक विषयात पडत असलेली तळमळ हे आपल्याला माहितीच आहे. परंतु केवळ तळमळ असून फायदा नाही तर त्यासाठीचा लागणारा अभ्यास त्यांनी केलेला दिसून येतो आणि तो अभ्यास केल्यानंतर योग्य घटकापर्यंत आणि योग्य संस्थात्मक रचनेपर्यंत मांडता आला पाहिजे, आणि ही कला बाबासाहेबांना उत्तम रीतीने अवगत होती कारण अनेक भाषा उत्तमरीत्या अवगत होत्या.

आजच्या तरुणाईकडून बाबासाहेबांना अपेक्षित आहे की तुम्ही कुठलाही विषय मग तो सामाजिक-राजकीय किंवा अन्य कुठलाही विषयांमध्ये क्षेत्रात काम करत असाल, तरीसुद्धा तुम्हाला त्या विषयांमध्ये उतरतांना त्या विषयाचा संपूर्ण अभ्यास असणे तळमळ तर आहेत म्हणूनच आपण या विषयांमध्ये उतरतो, पण त्याचबरोबर त्या विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी करता आली पाहिजे याच याच मुद्द्याला धरून आपणास एक आवाहन करू इच्छितो की, आपण सगळेच एका परिवर्तनाच्या चळवळीतील कार्यकर्ते आहोत जाणते आहोत आणि आपण या चळवळीशी जोडले गेले आहोत आपल्याला या चळवळीबद्दल तळमळ आहे, या चळवळीचा अभ्यास देखील आहे, अनेक जण आपापल्या परीने त्याचा अभ्यास आहेत, पण त्याची परिणामकारक मांडणी करणे हे अत्यंत गरजेचे आहे. आज आपल्याकडे अनेक माध्यमं आहेत. आज आपण फेसबुकच्या माध्यमातून डिजिटल जयंती उत्सव साजरा करतो आहोत. कोणी चांगली कविता लिहित असेल, लेख लिहीत असतील. पथनाट्य, नाटक या स्वरूपात लिखाण करत असतील, साहित्यनिर्मिती करत असाल, तर माध्यमातून आपण आपल्याला शक्य ती माध्यमं वापरून वेगवेगळ्या विषयांची मांडणी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे.

यापुढे जाताना जसं मी मघाशी म्हणालो की फक्त आंबेडकर जसे म्हणतात, “मी लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता आहे”, तर हे म्हणत असताना यामध्ये त्यांना काय अपेक्षित आहे? तर त्यातील लोकशाही मूल्यांचा पुरस्कार करणे अपेक्षित आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि समाजवाद या मूल्यांचा पुरस्कार, त्याची सुरुवात होणे अपेक्षित आणि या या मूल्याधारित चळवळीचे नेतृत्व तरुणाईकडून अपेक्षित आहे. हे सगळं सांगत असताना जसं मघाशी म्हणालो की व्यापक दृष्टिकोन असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. याचे उदाहरण सांगायचे तर आपल्याकडे गंभीर प्रश्न म्हणजे जातवाद.

जातवादाचे चटके आजवर आपण अनुभवत आलेलो आहोत. त्याचे परिणाम आपण भोगलेले आहेत. जगामध्ये एकमेव देश आहे आपला, जो अशा पद्धतीचे प्रश्नांमधून आजही ही वाटचाल करतो आहे. परंतु थोडसं वेगळं मला याठिकाणी मांडायचा आहे शोषित वर्ग जितका याचा जातीयवादाचा बळी आहे, तितकाच आजच्या प्रमाणामध्ये सगळ्या जातसमूहातील परिवर्तनाचा विचार करणारी तरुणाईसुद्धा या जात वर्णवर्चस्वाचा बळी आहे. इथून पुढे आपण परिवर्तनवादी चळवळीचे मांडणी अधिक व्यापक प्रमाणात करण्याचा प्रयत्न करावा असा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो, जो कदाचित बाबासाहेबांना अपेक्षित होता. कारण आपण भावनेच्या भरात म्हणा किंवा आजवरच्या सर्वच अनुभवांमुळे म्हणा, खूपदा एककल्ली मांडणी करून जातो आणि यामुळे आजवरच्या चळवळीला हे मारक ठरले आहे.

त्याचबरोबर सांस्कृतिक चळवळीची वेगळ्या पद्धतीने मांडणी करण्याची गरज आहे बाबासाहेबांच्या बरोबर त्यावेळी वामनदादा कर्डक यांसारखे अत्यंत विचारपूर्वक लिहिणारे उत्तम कवी शाहीर होते. आपणा सर्वांना माहिती आहे बाबासाहेब स्वत: म्हणत ही माझी चार भाषणं आणि वामनदादा यांचे एक गाणं. त्यानंतर आपण या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता आहे की इतका व्यापक विचार बाबासाहेब मांडत होते, तितका तो आजवरच्या आंबेडकरी चळवळीतील साहित्य संगीतातून आला आहे का ? की तो आपण संकुचित पद्धतीने मांडला आहे? कारण आजवरची या चळवळीतील अनेक गाणी आपण ऐकली तर खेदाने म्हणावे लागते ही इतके मोठे व्यक्तिमत्व आपण अत्यंत संकुचित पद्धतीने मांडलं. कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज सर नेहमी सांगतात की, मुख्य प्रवाहातील अनेक कलाकृतींची वेगळ्या पद्धतीने मांडणी आपण केली पाहिजे. उदाहरणच द्यायचं झालं तर मराठी चित्रपटातील अत्यंत प्रसिद्ध गाणं जे सुधीर मोघे यांनी लिहिलेला आहे, जे आपण अनेक शाळांमधून पाठ्यपुस्तकातून सुद्धा वाचत ऐकत आलेलो आहोत ते म्हणजे…फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश, दरीखोर्‍यातून वाहे एक प्रकाश प्रकाश.. .या गाण्याला राजसर भीमगीत म्हणतात, याचं कारण या गाण्याचा आशय हा डॉक्टर आंबेडकर यांना अत्यंत समर्पक आहे, परंतु आंबेडकरी गीत म्हटलं तिथे केवळ समूहातील जात समूहातील कलाकारांनी अथवा साहित्यिकांनी लिहिलेलं अथवा रचनाबद्ध केलेला असावा, असा एक अत्यंत चौकट पद्धत विचार आजवर मांडला गेला. या चौकटींना फाटा देण्याचे काम आम्ही करत आहोत. मला हेच आपणा सर्वांना या विषयाला धरून सांगायचं आहे की अशी अनेक गाणी या परिवर्तनाच्या विचाराला समर्पक आहेत त्यांची आपण अनेक अंगांनी, आपापल्या परीने सकारात्मक मांडणी वेगवेगळ्या स्तरावर नव्याने करण्याची आवश्यकता आहे.

त्याचबरोबर आपण नेहमी एक उदाहरण गमतीत देतो की डॉ. आंबेडकर यांनी जर विचार केला असता तर ते विदेशात आयुष्य आरामात राहू शकले असते. त्यालाच धरून मराठीतील प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांची कविता मला याठिकाणी उदाहरण म्हणून आपल्यासमोर मांडावीशी वाटते. कवितेतील काही ओळी या बाबासाहेबांना उद्देशून त्यांनी लिहिल्या त्या म्हणजे

“मी टेन किंग हेन्री स्ट्रीट वर, लंडनच्या पायरीवर भीमरावाना म्हंटले, इथेच राहिला असतात बॅरिस्टर होऊन तर लॉर्ड बी. आर. आंबेडकर झाला असतात, मेफेयर मध्ये प्रॉपर्टी पण झाली असती, पण आपल्याच समाजाला जागं करण्याच्या फंदात पडलात, वेशीच्या आतल्या, जुन्या मुरलेल्या अंधाराला धडकलात, पश्चिमेकडून आणि सूर्य उलटा फिरला तेव्हापासून…”

सिद्धार्थ महाविद्यालयातील लोच्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना ते म्हणतात की, “आपले शिक्षण जर समाजाच्या उपयोगी येत नसेल तर त्या शिक्षणाचा उपयोग शून्य आहे.” मी हे उदाहरण मुद्दाम याठिकाणी दिले कारण कारण आपण तरुणाई स्वतःला एका वेगळ्याच आविर्भावात पाहत असतो. आपल्या शिक्षणाचा आपल्यावर काहीसा अहम दिसतो. परंतु या शिक्षणामधून आपण खरच काही शिकलो आहोत का, कारण आजच्या घडीला आपल्या आजूबाजूला अनेक अशा गोष्टी घडत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण थोडं जरी समाज पण राखू शकलो, तरीसुद्धा हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आज आपल्याकडे माहितीच्या जंजाळातून अनेक फेक बातम्या पॅक व्हिडिओज फेक फोटोज येत असतात, परंतु आपण त्याची तथ्यता न न तपासता पुढे अनेक लोकांपर्यंत पाठवत असतो. जसे संविधानकर्त्यांनी ते तयार करत असताना त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याचे आवाहन केलेले आहे तो पण खरंच झेपतो का याचा पुनर्विचार करण्याची वेळ आहे.

आपण सर्व परिवर्तनवादी चळवळीतील मंडळी ही आंबेडकर आणि त्यांच्या सर्व कार्याबद्दल तळमळ असणारी आहोत, परंतु आपल्याला आंबेडकर समजून घ्यायचे असतील तर त्यांच्या अनेक कामातून ते आपल्याला अधिक व्यापक स्वरूपात अभ्यासता येतात. त्यासाठी त्यांचे संविधान सभेतील भाषण आपणास अधिक ऊपयुक्त ठरेल.

एक छोटीशी पुस्तिका आहे, माणूस प्रकाशन कायद्याने वागा लोकचळवळ याची. डॉ. आंबेडकर यांचं संविधान सभेतील शेवटचे भाषण विविध प्रकरणांच्या माध्यमातून आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न या पुस्तिकेत केला आहे.

त्यातलं शेवटचं प्रकरण जे आत्ताच्या संपूर्ण परिस्थितीला अधिक समर्पक आहे त्यातील काही ही महत्त्वाच्या ओळी मी आपणास वाचून दाखवणार आहे यातून आपणाला त्यांचा पूर्ण दृष्टीकोन समजून घेता येतो. या शेवटच्या प्रकरणांमध्ये डॉक्टर आंबेडकर म्हणतात की दुष्प्रवृत्ती ओळखण्यास विलंब नको. आज आपण ज्या कठीण परिस्थितीतून जात आहोत, ज्याचे परिणाम आपण सगळेच भोगत आहोत.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की, “लोकांचं लोकांसाठी आणि लोकांनी बनवलेल्या सरकार हे तत्व मर्मस्थानी बाळगणारी राज्यघटना जतन करायची असल्यास आपण निर्धार करायला हवा की, आपल्या मार्गात येणाऱ्या दुष्प्रवृत्तीना ओळखण्यात आपण विलंब लावायचा नाही. तसंच त्या दुष्प्रवृत्तीना हटवण्यासाठी खंबीर पुढाकार घ्यायचा देशसेवेचा हा एकमेव मार्ग आहे. याहून चांगला दुसरा कुठलाही मार्ग माझ्या माहितीत तरी नाही.

लक्षात घ्या ही या प्रवृत्तींना रोखण्याचं काम आज परिवर्तनवादी चळवळीतील आणि कार्यकर्ते करत आहेत. त्यांना दिशा देण्याचे कामसुद्धा अनेक जण करत आहेत. या दुष्प्रवृत्ती कोण आहेत, कशा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉ. आंबेडकर असे म्हणतात की राज्यघटना चांगली वाईट हि तिची अंमलबजावणी करणाऱ्यांवर ठरेलच, परंतु तिचे जतन करण्यासाठी या दुष्प्रवृत्तींना ओळखले पाहिजे. देशाच्या संविधानावर घाला करणाऱ्या प्रवृत्ती कोण आहे आपणा सर्वांना माहीत आहेत, त्या कुठल्या पद्धतीने आपल्यावर आक्रमण करून येत आहे हे सगळ्यांना माहीत आहे, हे सगळं करत असताना अर्थातच हा सगळा लढा तरुणाईने आपल्या खांद्यावर घेणे अपेक्षित आहे.

या माध्यमातून मी आपणा सर्वांना आवाहन करू इच्छितो ही देश नावाच्या संकल्पनेवर दुष्ट प्रवृत्ती घाला घालू पाहत आहेत. त्यांना ओळखा. या दुष्प्रवृत्तींना आपण आळा घातला पाहिजे, या सगळ्या लढ्यांमध्ये डॉक्टर आंबेडकर आपल्याला अत्यंत मार्गदर्शक ठरतात. त्यांची सगळी चळवळ आपल्याला मार्गदर्शक ठरते. त्यासाठी मी पुन्हा त्या त्रिसूत्रीवर येतो. त्याचा आपण पुन्हा गांभीर्याने विचार करावा आणि आपला या त्रिसूत्रीबद्दल काय विचार आहे हे नक्की कळवा. कारण आंबेडकरी चळवळीची अशा पद्धतीची मांडणी जी राज असरोंडकर यांनी केलीय, यापूर्वी कोणी केल्याचे निदान माझ्यातरी वाचनात नाही. शेवटाकडे येताना पुन्हा हे सांगू इच्छितो की शिवराय फुले, शाहू, आंबेडकर, सावित्रीबाई ही महान व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांना आपल्या चौकटबद्ध, साचेबद्ध चौकोनामध्ये अडकवू नका. बंदिस्त करू नका. कारण ही सर्वचजण अत्यंत व्यापक विचार करणारी कृती करणारी व्यक्तिमत्वं आहेत.

शेवटी एकच सांगेन आज आपण भेटतोय डिजिटल जयंती साजरी करतोय, त्यामागची कारणं आपणा सर्वांना माहित आहेत. जगावर एक मोठं संकट आज उभे ठाकलेले आहे. राज्य शासन त्यांच्या पातळीवरती अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. त्यांच्या आवाहनाला साथ देण्याचं काम आपल्याला यावर्षी करायचं आहे, कारण दरवर्षीसारखी परिस्थिती नाही आहे. यंदाची जयंती ही घरातल्या घरात अत्यंत साधेपणाने साजरी करणं हेच आपलं समाजभान दाखवून देईल. कारण आपली छोटीशी चूकसुद्धा दुष्ट प्रवृत्तींना ती संधी उपलब्ध करून देईल. तशी ती उपलब्ध करू न देणे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

– राकेश पद्माकर मीना

कायद्याने वागा लोकचळवळीचे महाराष्ट्र राज्य संघटक असून अहमदपूर येथील विशाल साबळे व राहुल गायकवाड यांनी फेसबुकवर आयोजित केलेल्या डिजिटल फुले भीमोत्सवात लाईव्ह सादर केलेलं हे भाषण आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!