लव्हजेहादचा विखारी प्रचार मुलींचा अन्यायाविरोधातला आवाज दाबणारा ! स्त्रियांची सामाजिक सुरक्षितता धोक्यात आणणारा !

लव्हजेहादचा विखारी प्रचार मुलींचा अन्यायाविरोधातला आवाज दाबणारा ! स्त्रियांची सामाजिक सुरक्षितता धोक्यात आणणारा !

लव्हजेहादचा विखारी प्रचार मुलींचा अन्यायाविरोधातला आवाज दाबणारा ! स्त्रियांची सामाजिक सुरक्षितता धोक्यात आणणारा !

एखाद्या फसलेल्या प्रेमप्रकरणात मुलगा मुस्लिम असला आणि मुलगी हिंदू असली की त्या प्रकरणाला लव्हजेहाद म्हणून संबोधण्याचा विखारी तितकाच बेकायदेशीर प्रकार हिंदुत्ववादी संघटना केंद्र आणि राज्यांमध्ये बसलेल्या हिंदुत्ववादी सरकारांच्या जीवावर करीत आहेत. मात्र, सखोल विचार करता लव्हजेहादचा विखारी प्रचार हिंदुंसहित सगळ्याच धर्मातील मुलींची सुरक्षितता धोक्यात आणणारा आहे.


हिंदुत्ववाद्यांनी असा प्रचार चालवलाय की मुस्लिम मुलं हिंदू मुलींना ठरवून जाळ्यात ओढतात, त्यांना धर्मांतर करायला भाग पाडतात, लग्न न करता शरीरसंबंध करतात किंवा लग्न केलं तरी नंतर ठरवून छळतात, मारझोड करतात, हाल करतात किंवा क्रूरतेने हत्या करतात. त्यामुळे हिंदू मुलींनी मुस्लिम मुलांशी लग्न करू नये, यावर हिंदुत्ववाद्यांचा जोर असतो. मात्र तरीही हिंदू-मुस्लिम विवाह वरचेवर होत असतात. कारण मुस्लिम मुलांबद्दल जे जे काही सांगितलं जातं ते सगळे दुर्गुण हिंदू मुलांमध्येही असतात किंवा कोणत्याही धर्मांच्या पुरुषांमध्ये ते असू शकतात.

भारतात घटस्फोटांची टक्केवारी जगाच्या तुलनेत कमी आहे. गेल्या काही वर्षांत ती दुप्पटीने वाढली आहे. मात्र, याचा अर्थ सर्व आलबेल आहे असं नाही. जगात घटस्फोट मागणाऱ्यांत स्त्रीयांचं प्रमाण जास्त आहे, तर भारतात पुरूषांचं ! भारत हा पुरूषसत्ताक देश आहे. देशाची सगळी धोरणं पुरूष ठरवतात. इथे लोकसभेत आणि राज्याराज्यातल्या विधानसभांमध्ये स्त्रीयांचं प्रमाण नगण्य आहे.

इथल्या बहुसंख्य असलेल्या हिंदू धर्मीयांत धर्मानुसार, स्त्रीयांना फारशी मोकळीक नाहीये. स्त्रियांना ती मिळालीय हिंदू कट्टरतावाद्यांशी कटुता घेऊन झालेल्या सामाजिक सुधारणांमुळे. हिंदू कट्टरतावादी सामाजिक सुधारणा स्वीकारल्याचा आव आणत असले तरी प्रत्यक्षात त्यांची धडपड सामाजिक सुधारणा संपवून पुन्हा एकदा 'ढोल, गंवार, शूद्र, पशू, नारी, सकल ताडना के अधिकारी' वाली समाजव्यवस्था आणण्यासाठी चाललीय.

भारतात घटस्फोटांचं वाढल्याचा ठपका कट्टरतावादी स्त्रीस्वातंत्र्यावर ठेवतात. स्त्रीया शिकल्यासवरल्या, स्वतंत्र झाल्या, नोकरी करू लागल्या, कमावू लागल्या, स्वावलंबी झाल्या म्हणून घटस्फोटांचं प्रमाण वाढलंय, असं कट्टरतावाद्यांना वाटतं. पण ठळक कारण स्त्रीयांमध्ये आलेलं आत्मभानसुद्धा आहे.

भारताच्या २०२० च्या राष्ट्रीय गुन्हें नोंदीनुसार, हुंड्यामुळे रोज १९ महिलांचे मृत्यू होतात. देशातल्या ३० टक्के महिला सततच्या घरगुती हिंसाचाराला बळी पडतात. हा आकडा प्रत्यक्षात अधिक असावा. कारण कौटुंबिक हिंसाचार सहन करत राहणं हाच आपला धर्म असल्याचं स्त्रियांवर बिंबवलं जातं. पतीला देव मानणे, त्याची सेवा करणे, त्याचे सर्व प्रकारचे अन्याय अत्याचार निमूट सहन करणे हे संस्कार आणि संस्कृतीचा भाग असल्याचं समजलं जातं.

समाजात पद्धतशीरपणे पेरले गेलेले तथाकथित संस्कृतीरक्षक प्रचारक व्याख्यानं, प्रवचनांमधून स्त्रीयांवर हेच बिंबवत असतात की छळ सहन करून संसार हाकत राहणे हाच स्त्रीयांचा धर्म आहे. या तथाकथित संस्कारांमुळे स्त्रीयां निकटवर्तीयांकडून झालेल्या बलात्काराच्या घटनेतही गप्प राहतात. २०२१ मध्ये अशा दीड हजार घटनांची नोंद आहे, पण नोंदवले न गेलेले गुन्हें कितीतरी पटीने असतील, असं जाणकार सांगतात.

२०२१ मध्ये महिलांवरील अत्याचारांचे ४ लाख २८ हजार २७८ गुन्हे भारतात नोंदवले गेले, जे २०२० च्या तुलनेत १५.३ टक्क्यांनी वाढलेले होते. या गुन्ह्यांत पतीसह जवळच्या नातेवाईकांच्या क्रूरतेचे प्रमाण ३१.८ टक्के इतकं होतं. विनयभंगाच्या हेतून हल्ला चढवलेल्या गुन्ह्यांचं प्रमाण २०.८ टक्के होतं. १७.६ टक्के गुन्हे अपहरणाचे तर ७.४ टक्के गुन्हे बलात्काराचे होते.

या गुन्ह्यांतील आरोपी सर्वच जातीधर्मातील पुरूष असणार हे स्वाभाविक आहे. शिवाय, भारत हा हिंदू बहुसंख्यांक देश असल्याने आरोपींमध्ये हिंदू सर्वाधिक असणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण मुलींना सावध केलं जातंय केवळ मुस्लिम आणि ख्रिश्चनांपासून. त्यातही मुस्लिमांवर मोठा जोर आहे. यातून एक अप्रत्यक्ष धोकादायक संदेश जातोय की आरोपी मुस्लिम असला तरच महिलाविरोधातील अत्याचाराचा गुन्हा गंभीर असतो. आरोपी हिंदू असले आणि त्यातही ते हिंदू धर्मातील तथाकथित वरच्या जातीतील असले की काय होतं ते जगाने बिल्कीस बानो सामुहिक बलात्कार प्रकरणात पाहिलंय.

एका बाजूला स्रीचं पातिव्रत्य आपली संस्कृती म्हणून सांगायचं आणि पातिव्रत्य भ्रष्ट करण्याच्या इराद्याने अतिथी म्हणून एखाद्या महिलेच्या घरी जाऊन तिला नग्न होऊन जेवण वाढलंस तरंच जेवू, असं सांगितलं गेल्याच्या कथा निमूट भक्तीभावाने ऐकायला आणि त्यात अध्यात्म शोधायला समाजाला भाग पाडायचं, हे आज नाही, तर हजारों वर्षांपासून सुरू आहे. !

गरोदर स्त्रीवर सामुहिक बलात्कार करणाऱ्या नीच गुन्हेगारांना सोडल्यामुळे मनातल्या मनात खूश होणारा आणि तसं करणाऱ्या सरकारची/राजकीय पक्षाची निर्लज्ज पाठराखण करणारा समाज रामदेवबाबाच्या स्त्रीयांच्या नागडेपणावर केलेल्या विधानाने संतापत नाही, ते याच जडणघडणीमुळे.

पीडिता मुस्लिम आहे म्हणून तिच्या गुन्ह्यातील आरोपींना मोकळं सोडणं, आरोपींचा जाहिर सन्मान करणं समस्त स्त्रियांसाठीच किती धोकादायक आहे, ते अजून भारतातल्या स्त्रियांच्या लक्षात येतंय की नाही, समजायला मार्ग नाही. बिल्कीस बानो प्रकरणात भारतातील सर्वसामान्य विशेषतः हिंदू स्त्रियांनी ( सामाजिक कार्यकर्ता वगळता ) बाळगलेलं मौन चिंताजनक आहे. आरोपी हिंदू असेल तर मामला 'आपला' अंतर्गत असल्याने अशा घटनांविरोधात आवाज उठवण्याची गरज नाही, हे स्त्रियांच्या मेंदूत पद्धतशीरपणे रुजवलं गेलंय.

आफताब पुनावाला याने त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या श्रद्धा वालकर या मैत्रीणीची हत्या केली. हत्या केल्यानंतर आफताबने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने तिचे तुकडे केले व ते दिल्ली परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. आफताबला अटक झाली आणि तपासातून उघड होणाऱ्या नवनवीन बाबी रोजच्या रोज वृत्तमाध्यमात होऊ लागल्या. इतक्या क्रूर घटनेचा वृत्तमाध्यमांनी पाठपुरावा करत राहणं ही खरं तर सकारात्मक आणि आवश्यक गोष्ट होती. परंतु इथे वृत्तमाध्यमांना श्रद्धा वालकरच्या मृत्यूबाबत फारसं देणंघेणं नव्हतं. घटनेतील क्रूरतेने वृत्तमाध्यमं हादरलीत असंही नव्हतं. तसं असतं तर अशाच प्रकारच्या इतर घटनांतही माध्यमांनी तितकंच गांभीर्य दाखवलं असतं जितकं ती आफताब-श्रद्धा प्रकरणात दाखवलं.

श्रद्धा वालकरचं हत्या प्रकरण १० नोव्हेंबरला उघडकीस आलं. तत्पूर्वी ७ नोव्हेंबरला मध्यप्रदेशात शिल्पा झारिया नावाच्या २१ वर्षीय युवतीच्या हत्येची घटना घडली होती. जी ८ नोव्हेंबरला उघडकीस आली होती. जबलपूर जवळील मेखला रिसाॅर्टमध्ये ती घटना घडली होती.

शिल्पाने तिथे आपलं नाव राखी मिश्रा नोंदवलं होतं तर तिच्या सोबतचं नाव होतं अभिजीत पाटीदार, ज्याने तिचा गळा चिरून शिल्पाची हत्या केली होती. अभिजीत पाटीदारचं खरं नाव हेमंत भदाणे. महाराष्ट्रातील नामचीन गुन्हेगार आहे. इन्स्टाग्रामवर त्याने ती घटना लाईव्ह केली होती. ज्यात शिल्पा रक्ताच्या थारोळ्यात तडफडताना दिसत होती. पण, मयत युवती हिंदू आणि आरोपीही हिंदू ! त्यामुळे शिल्पाची हत्या चर्चेचा विषय झालाच नाही.

शिल्पा गरीब कुटुंबातील आहे. तिची आई आजही टाहो फोडतेय की हेमंत भदाणेला जाहिर फाशी द्या आणि विडिओ करून जगाला दाखवा. पण शिल्पाच्या कुटुंबियांचा आवाज क्षीण आहे. वृत्तवाहिन्यांचा पडदा आफताबने व्यापला. वृत्तवाहिन्यांसाठी जणू ती घटना लव्हजिहाद नावाची वेबसिरीज झालीय. जितकं म्हणून हिंदुमुस्लिम रंग देऊन वातावरण पेटवता येईल तितकं वृत्तवाहिन्या अधिकाधिक हलकट वागल्या. आफताबचा क्रूरपणाही फिका पडावा इतक्या वृत्तवाहिन्या भेसूर झाल्या.

केवळ मध्यप्रदेशातील शिल्पा झारियाच नव्हें तर उत्तरप्रदेशातील सहा तुकडे करून मारली गेलेल्या आराधना प्रजापतीलाही वृत्तवाहिन्यांच्या पडद्यावर जागा मिळाली नाही. कारण तेच. आराधना हिंदू आणि तिचे तुकडे करून मुंडकं विहिरीत फेकून देणारा आरोपी प्रिन्स यादवसुद्धा हिंदू ! निर्लज्ज वृत्तवाहिन्यांसाठी मग तो मोठा विषय होत नाही. त्यांच्या मते आरोपी हिंदू असेल तर हत्या ही क्रूरता नाही. आरोपी मुस्लिम असेल तरच ती क्रूरता.

वृत्तवाहिन्यांच्या तर्कानुसार, ३५ तुकडे ही क्रूरता आहे. ६ तुकडे ही क्रूरता नाही.

आपल्याशी लग्न केलं नाही, दुसऱ्याशी केलं हा राग धरून विवाहित आराधनाची प्रिन्स यादवने हत्या केली. हेमंत भदाणे व्हिडिओमध्ये शिल्पाला बेवफा म्हणतो, तर सोशल मीडियावर देशातील नवयुवकांची सहानुभूती हेमंतला मिळते. आराधना प्रकरणात लोक, प्रेम होतं तर लग्न का नाही केलं म्हणून दोष आराधनालाच देतात.

उत्तरप्रदेशातच मथुरेत यमुना एक्सप्रेस हायवे वर २२ वर्षीय आरुषी यादवचा मृतदेह सापडतो, जिची हत्या तिच्या आईवडिलांनीच मर्जीने लग्न केलं म्हणून गोळ्या घालून केलेली असते. समाजमाध्यमांत लोक संबंधित पोस्टखाली लिहितात, बरोबर केलं आईवडिलांनी ! मात्र, लिव्ह इन मध्ये राहिल्यावर लग्नाचा हट्ट कशाला करायचा, असा प्रश्न त्यांना शिल्पा वालकर घटनेत पडत नाही. तिथे आफताब शंभर टक्के दोषी असतो. कारण तो आफताब असतो.

देश असा पूर्णपणे गंडलाय. क्रूरतेलाही धार्मिक रंग दिला गेलाय. आमची चांगली, तुमची वाईट असं म्हणत क्रूरतेचंही आता हिंदुमुस्लिम असं विभाजन झालंय वर्तमान भारतात. यात भरडल्या जाणारेत समस्त स्त्रियां. त्या कुठल्याही जातीधर्माच्या असोत, समाजाचा विखारी दृष्टिकोन, तपास यंत्रणांचा दुजाभाव आणि न्याययंत्रणांचा एकतर्फी न्याय, या सगळ्यात सामाईक असलेला पुरूषी अहंभाव, स्त्रियांना अधिकाधिक घातक ठरत जाणार आहे.

चारबोटं आपल्याकडेच आहेत, पण तिथून लक्ष हटवावं म्हणून एक बोट लव्हजेहादकडे दाखवलं जातंय. त्याला बळी पडण्याऐवजी, मुस्लिमांनी केलेली फसवणूक, छळ, हत्या लव्हजेहाद असेल तर मुस्लिमेतरांनी केलेल्या त्याच गुन्ह्यांना काय म्हणता येईल, हा प्रश्न समस्त स्त्रियांनी इथल्या पुरूषसत्तेला म्हणजेच आपल्या सोबतच्या प्रत्येक पुरूषाला विचारला पाहिजे.

 

 

 

राज असरोंडकर 

संपादक, मीडिया भारत न्यूज | संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ

mediabharatnews@gmail.com 


 

MediaBharatNews

Related Posts

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!