अहिल्याबाईंचा इतिहास प्रेरणादायी !

अहिल्याबाईंचा इतिहास प्रेरणादायी !

अहिल्याबाईंचा इतिहास प्रेरणादायी !

एकदा बाजीराव पेशवे यांचे सरदार मल्हारराव होळकर पुण्यास जाताना रस्त्यात चौंढी येथे देवळात जाणारी ८ वर्षांची चुणचुणीत मुलगी त्यांना त्यांचा मुलगा खंडेराव साठी वधू म्हणून पसंत पडली. १७५४ मध्ये कुंम्हेरच्या लढाईत खंडेराव धारातीर्थी पडल्यावर मल्हाररावांनी कुशाग्र बुद्धीच्या सुनेला सती जाऊ दिले नाही आणि राज्यकारभार हळू हळू सांभाळण्यास दिले. त्याच अहिल्याबाई होळकर !

पुढे आणखी १२ वर्षांनी १७६६ मध्ये मल्हाररावांचेही निधन झाले आणि सर्व जबाबदारी अहिल्याबाई यांच्यावर आली; त्यापुढे ३० वर्षे त्यांनी माळवा प्रांताचा राज्यकारभार सैन्याच्या मदतीने योग्य शासक आणि संघटक म्हणून सांभाळला.

अहिल्याबाईंचा जन्म ३१ मे १७२५; अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंढी या खेड्यात जन्म !  एक बाई काय राज्यकारभार सांभाळणार हा त्यावेळच्या दरबारी मंडळींचा कयास धादांत खोटा ठरवणाऱ्या अहिल्याबाई हे नाव इतिहासात अमर झाले.

दरबारात दिवाण म्हणून गंगोबा तात्या याने राघोबा दादांशी संधान बांधून इंदूर बळकवण्यासाठी प्रोत्साहित केले, हे अहिल्याबाईंना कळले, तेव्हा त्यांनी युद्धाची तयारी दाखवली, हे तर राघोबांना अधिकच अडचणीचे झाले. हरलो तर बाईकडून हरलो आणि जिंकलो तर बाईशी युद्ध करण्यात कोणती मोठी मर्दुमकी, म्हणून त्यांनी स्वतःच माघार घेतली.

पण तरीही खूप वर्षांनी १७९२ मध्ये शिंद्यांच्या सरदाराने गोपाळराव यांनी हल्ला चढवला होता तेव्हा तरुणालाही लाजवेल अश्या तडफदारीने अहिल्याबाईनी लढाई करून त्यांचा पराभव केला होता.

आपण आता या काळात एवढं मोठं साहस करणं कठीणच पण वैश्विक महामारीच्या काळात काही पथ्ये पाळून नक्कीच लढा देऊ शकतो.

त्यांची मला भावलेली एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की त्यांच्या मुलीचा विवाह करताना त्यांनी जाहीर केले होते की जो कोणी चोर, लुटारू, दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करेल त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह लावून दिला जाईल. जात पात पाहिली जाणार नाही आणि यशवंत फणसे या तरुणाशी लग्न लावून दिले…बोली तैशी कृती !

मुलगा मालेराव यालाही सुभेदारी मिळाली, पण सांभाळता आले नाही. कालांतराने मुलाचेही निधन झाले. भाऊ आणि जावई हे पण अचानक मृत्यू पावले. मुलगी ही सती गेली याचे त्यांना मोठे दुःख होते. अशी सगळी जवळची लोक सोडून गेल्यावरही त्या लढाईत शत्रूंवर तुटून पडत होत्या.. अहिल्याबाईंचा इतिहास जितका प्रेरणादायी तितका तो दुर्लक्षितही राहिला, ही खंत आहे.

आज अहिल्याबाईंची जयंती ! त्या निमित्त त्रिवार वंदन !!!

ललिता मोरे

लेखिका शिक्षिका असून पत्रकारिता, अभिनय, निवेदन क्षेत्रातही कार्यरत आहेत.


 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!