प्रश्न संवेदनशीलतेने सुटतात ; सरकारने ती दाखवायला हवी !!

प्रश्न संवेदनशीलतेने सुटतात ; सरकारने ती दाखवायला हवी !!

प्रश्न संवेदनशीलतेने सुटतात ; सरकारने ती दाखवायला हवी !!

काल संसदेत अभूतपूर्व घटना घडली. देशाच्या विविध भागातील चार-पाच तरुणांनी एकत्र येत संसदेत घुसखोरी केली. संसदेची अभेद्य सुरक्षाव्यवस्था भेदून यातील दोन तरुण थेट प्रेक्षक गॅलरीत पोहोचले. गॅलरीतून खासदारांच्या बाकावर उड्या मारून त्यांनी घोषणाबाजी केली. संसदेच्या बाहेरही दोघा-तिघांनी स्मोक कॅन्डल फोडून धूर केला. ही घटना अभूतपूर्व आणि अतिसाहसी  म्हणायला हवी.

ज्या तरुणांनी हे कृत्य केले, त्यातील एक लातूर जिल्ह्यातील अमोल शिंदे हा आहे. माध्यमाने आज त्याच्या घराचे व त्याच्या आई वडिलांचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. गरीब शेतकरी कुटुंबातील अमोल ‘सैन्य भरतीसाठी दिल्लीला जात आहे,’ म्हणून गेला आणि काल ही घटना घडली.

हे चार-पाच तरुण वीस पंचवीस वयोगटातील आहेत. त्यांच्या हाती कोणतेही शस्त्र नव्हते, की इतरांना इजा पोहोचवण्याचा त्यांचा उद्देशदेखील नव्हता, असे एकूण चित्र दिसत आहे. मात्र साधारण बावीस वर्षांपूर्वी याचदिवशी संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्या हल्ल्याने देश सुन्न झाला होता. त्या पार्श्वभूमीवर काल घडलेली घटना गंभीरच मानायला हवी.

मात्र या तरुणांना हे कृत्य करावे असे का वाटले? त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत? त्यांनी केलेल्या घोषणाबाजीचा अर्थ काय आहे? आपण जे करत आहोत, ते कृत्य गंभीर असून त्याचे परिणाम भयंकर असू शकतात, याची कल्पना असूनही या तरुणांनी एवढे धाडस का केले? हा खरा प्रश्न आहे.

सर्वच तरुण वेगवेगळ्या राज्यातील आणि सर्वसामान्य कुटुंबातील आहेत, हे विशेष. मात्र तरीही अत्यंत नियोजनपूर्वक व्हिजिटर पास घेऊन ते संसदेपर्यंत पोहचले आणि घोषणाबाजी केली. त्यांना त्यांचे म्हणणे केवळ देशाच्या संसदेपर्यंत पोहोचवायचे होते, एवढे तरी माझ्यासारख्याला प्रथमदर्शनी दिसत आहे.

मागच्या अनेक वर्षांपासून देशातील तरुण अस्वस्थ आहेत. नोकरी वा रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध नसल्यामुळे तरुणाईची अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशाचा भौतिक चेहरा कितीही संपन्न, सुदृढ वाटत असला तरी वस्तुस्थिती वेगळी आहे.  बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि इतर गोष्टींचे वास्तव आपल्याला नाकारता येत नाही. खेड्यापाड्यातील तरुण नोकरी व रोजगाराअभावी वैफल्यग्रस्त होत आहे. वय वाढत चालल्यामुळे त्यांची निराशा अधिक तीव्र होत आहे. शिक्षणसंस्था आणि इतर शासकीय आस्थापनांवर आर्थिक व्यवहाराशिवाय किंवा वशिल्याशिवाय काम होत नाही. अशावेळी गरीब मुलांनी काय करायला हवे?

या मुलांचे हे धाडस त्यांना महागात पडणार असले तरी त्यांना ही कृती करायला भाग पाडणाऱ्या व्यवस्थेचे काय?

मनातली स्वप्ने उध्वस्त होत आहेत आणि आपण काहीच करू शकत नाहीत, ही पराभूत भावना आजच्या तरुणाईला त्रासदायक ठरत आहे. यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांनी नोकरी व आर्थिक स्थैर्य नसल्यामुळे आत्महत्या केलेली आहे. या सगळ्याच घटनांचा नकारात्मक परिणाम एकूण समाजजीवनावर होत असतो. यातूनच गुन्हेगारी व्यवस्था बळकट होत जाते. आपल्याच माणसांविषयीचा भ्रमनिरास वाढत गेला की, मुले ‘बऱ्या वाईट’ गोष्टींचा विचार करण्याची मानसिकताच गमावून बसतात. (म्हणजे झारखंडमध्ये कोण्या एका खासदाराच्या घरात तीनशे कोटी रुपये सापडलेत म्हणे ! गेल्या तीन चार दिवसांपासून पैसे मोजण्याचे काम सुरु आहे. म्हणजे एकीकडे ही अशी परिस्थिती आणि दुसरीकडे प्रचंड गरिबी. हा विरोधाभास विचार करणाऱ्या तरुणांना दिसतोच ना!)

त्यामुळे या तरुणांना गुन्हेगार ठरवून शिक्षा देण्यापेक्षा त्यांच्या मागण्या आस्थेने समजून घ्यायला हव्या.  कालची घटना  गंभीर असली तरी या मुलांची मानसिकता आणि त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न संसदेने दुर्लक्षित करायला नकोत.

प्रश्न संवेदनशीलतेने सुटतात.
सरकारने संवेदनशीलता दाखवायला हवी.

 

 

पी. विठ्ठल

प्राध्यापक, भाषा संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ.

MediaBharatNews

Related Posts

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!