जमिनीखालच्या माणसांच्या जमिनीवरच्या गोष्टी

जमिनीखालच्या माणसांच्या जमिनीवरच्या गोष्टी

जमिनीखालच्या माणसांच्या जमिनीवरच्या गोष्टी

सिद्धार्थ देवधेकर या कथालेखकाने आपला नवा कथासंग्रह `माणसं जागी झाल्यावर अदृश्य होणाऱ्या माणसांना’ अर्पण केला आहे. कोण आहेत ही इतर माणसे जागी झाल्यावर आपसूक अदृश्य होणारी माणसे आणि कोण आहेत सिद्धार्थ देवधेकर? सकाळी अदृश्य होणारी माणसे म्हणजे मानवी मलमूत्र साफ करणारे, रस्त्यांच्या कडेकडेने असणारी गटाराची जाळी उघडून, त्यात उतरून तुंबलेली गटारे साफ करणारे, नगरपालिकांमध्ये `लेबर’पेक्षाही खालच्या दर्जावर भरती केले जाणारे अगणित सफाई कामगार. सफाई कामगार हा शासकीय शब्दप्रयोग असला तरी अनेकदा खाजगीत आपण यांना बिनदिक्कत `झाडूवाले’, `गटारवाले’ किंवा `भंगी’ म्हणून संबोधतो. या व्यवसायामध्ये दलितांना १००% आरक्षण आहे, असेही नाईलाजाने सांगतो.

(सध्या आरक्षणाची मागणी करणाऱ्या मंडळींचे या आरक्षणाबद्दलचे मत काय आहे, कुणास ठाऊक!) देवधेकर स्वत: मुंबई महानगरपालिकेत `बॉय’ म्हणजे मानहोलमध्ये उतरणारा कामगार या पदावर नोकरीला लागले आणि काही काळाने, लेबर पदावर बढती मिळाल्यावर त्यांनी नोकरी सोडली. नोकरीच्या काळात त्यांना भेटलेल्या माणसांचे, त्यातल्या बऱ्यावाईट अनुभवांचे आणि या दुर्लक्षित कामगारविश्वाचे चित्रण करणाऱ्या त्यांच्या चार कथा म्हणजे `न सांगितलेली गोष्ट’ हा कथासंग्रह. कथासंग्रहाला डॉ. आनंद तेलतुंबडे यांची प्रस्तावना आहे तर डॉ. श्रीधर पवार यांनी परिशिष्ट लिहिले आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावर जयंत पवार यांनी या कथांचे सार लिहिले आहे. कथांच्या मागचे-पुढचे हे तीनही लेख कथांइतकेच महत्त्वाचे आहेत.

एक दीर्घकथा आणि तीन सर्वसाधारण लांबीच्या कथा इतकाच पुस्तकाचा परीघ आहे. कथांची भाषा कोठेही अलंकारिक नाही, तरीही कथेसाठी आवश्यक असणारे नाट्य, संवादातून उलगडत जाणारी गोष्ट असे चांगल्या कथेचे पैलू लिखाणात आहेत आणि कथनात प्रचंड सच्चेपणा आहे. कामगारांच्या रोजच्या बोलण्यात येणाऱ्या अनेक शब्दांचे/विषयाचे धक्के मध्यमवर्गीय वाचकाला मध्ये-मध्ये बसतात, पण कुठेही अश्लीलता जाणवत नाही. पुस्तक हातात घेतल्यावर एका बैठकीत संपविण्याचा मोह वाचकाला आवरत नाही, कारण जमिनीखालच्या माणसांच्या कथा सांगताना लेखक पूर्णपणे जमिनीवर आहे. पहिली कथा वाचतानाच आपण सुन्न होतो. मनात विचार येतो, कसे जगतो आपण या महानगरात? कोणाच्या जीवावर आपले रोजचे जगणे विनासायास पार पडते? आपल्याला बांधकाम मजूर माहित असतो, दूधवाला-भाजीवाला माहित असतो, प्लंबर-सुतार-गवंडी माहित असतात, घरकामाला येणाऱ्या बायका माहित असतात, घरोघरी येऊन कचरा गोळा करणारे कामगारही माहित असतात, मग अगणित संख्येने इथे असणारी ही जमिनीखालची माणसे आपल्या कधीच का लक्षात येत नाहीत? अन्नपाण्याच्या गरजेइतकीच असलेली सांडपाण्याची, स्वच्छतेची, आरोग्यपूर्ण शहराची आपली गरज जे पूर्ण करतात, ते आपल्या खिजगणतीतही का नसावेत? एक अपराधीपणाची टोचणी घेऊन आपण पुढच्या कथा वाचायला लागतो आणि तिसऱ्या कथेच्या शेवटी सद्गदित होतो. चौथी दीर्घकथा आशेचा किरण दाखवते आणि अशी माणसे भेटतील, दिसतील तेव्हा या पुस्तकाविषयी त्यांच्याशी बोलायचे या निश्चयाने आपण पुस्तक मिटतो.

वरवर एकेका व्यक्तिरेखांभोवती फिरणाऱ्या वाटल्या तरी प्रत्यक्षात या प्रातिनिधिक कथा आहेत. प्रकाश दगडू, सुहास रामचंद्र, काशिनाथ पांडुरंग अशी नावे कथेत येत असली तरी ती कोणा एका प्रकाशची, सुहासची कथा नाही. शहरवासीयांच्या मते ज्यांना नाव नाही, चेहरा नाही, आहे फक्त त्यांच्या व्यवसायावरून मिळालेली ओळख अशा सगळ्यांच्याच या कथा. `बॉय’ कथेत जेमतेम सोळा-सतरा वर्षांचा मुलगा या खात्यात नोकरीला लागतो आणि पहिल्याच दिवशी कामाच्या अनुभवाने हादरून जातो. मानवी मैला, भिजून-कुजून टम्म फुगलेले उंदीर असे सगळे पहिल्याच दिवशी बघून त्याला जेवण जात नाही, झोप लागत नाही. कितीही खसखसून आंघोळ केली तरी अंगाचा वास जात नाही. वाचताना आपल्यालाच कसेतरी होते, मग खरेच काय अवस्था होत असेल यांची काम करताना? आणि ते ही रोज हेच काम….वर्षानुवर्षे त्यात बदल नाही. मग का येतात ही तरूण मुले इथे नोकरीसाठी? बेरोजगारी हे कारण आहेच, पण त्याचबरोबर नगरपालिका या कामगारांना आपल्या कर्मचारी वसाहतीत प्राधान्याने जागा देते. सफाई कामगाराच्या मुलाने दुसऱ्या ठिकाणी किंवा नगरपालिकेत दुसऱ्या खात्यात नोकरी धरली तर हातची जागा जाते, शहराच्या बाहेर राहून शहरात नोकरीला येणे जिकीरीचे असते, मग मोक्याच्या ठिकाणाची जागा राखण्याचा एकच पर्याय तरूण मुलांकडे शिल्लक असतो, वडिलांसारखे गटारात उतरायचे आणि तुंबलेली गटारे साफ करायची. तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे जातीचा. कागदावर कुठेही उल्लेख नसलेलं शंभर टक्के आरक्षण या क्षेत्रात आहे. बहुसंख्य कामगार मेहतर, मातंग समाजातले, फार थोडे मांग आणि चांभार समाजातले. या समाजातल्या तरुणांना कोणतेही शालेय शिक्षण नसेल, विशेष कौशल्य नसेल तरी नोकरीची हमी असते, म्हणूनही मुले या कामाकडे वळतात.

पुढे कामाशी संबंधित दुर्गंधी, किळसवाणे अनुभव सहन न झाल्यामुळे दारूचे-तंबाखूचे व्यसन ओघानेच येते. तरूण बायको गावाकडे असेल तर वेश्यांकडे जाणेही पैशाच्या उपलब्धतेनुसार होत असते. कोवळ्या वयात नोकरीला लागत असल्यामुळे, कामाच्या स्वरूपामुळे आणि व्यसनांमुळे होणारे क्षयरोग, यकृताचे विकार, दमा असे आजार तरुणपणीच शरीरात घर करण्याचे प्रमाण प्रचंड आणि या कामगारांचे चाळीशी-पन्नाशीत मृत्यू हीदेखील सर्वसामान्य बाब. वडील गेल्यावर अनुकंपा तत्त्वावर त्यांचीच तरूण, कोवळी मुले नोकरीला लागणे आणि पर्यायाने हे चक्र अखंड चालू राहणे, हेच इथले वास्तव.

`संभ्रम’ या कथेत एका तिशीच्या तरुणाला क्षयरोगाची बाधा झाली आहे. तो लवकरच मरणार याची त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना माहिती आहे, पण त्याच्या बायकोला मात्र याचा पत्ता नाही. आपल्या आजारामुळे आपल्याला मूलही होणे शक्य नाही, मग बायकोला तरूण वयात वैधव्यात ढकलण्यापेक्षा तिचे दुसरे लग्न लावून द्यावे, असा विचार करणारा हा तरूण. थोडीशी आदर्शवादाकडे झुकणारी कथा असली तरी आताच्या पिढीचे बदलणारे विचार साध्या प्रसंगातून आणि शब्दांतून मांडण्यात लेखक यशस्वी झालेला दिसतो.

तिसऱ्या कथेतला मध्यमवयीन पुरूष आईच्या शेवटच्या क्रियाकर्मासाठी सगळ्यांकडे पैसे मागतो पण आधीच अनेक ठिकाणाहून पैसे उचलल्यामुळे त्याला कोणी नव्याने पैसे देत नाही. कंटाळून तो दारूच्या गुत्त्यावर जाऊन आईच्या मरणाचे आणि आपल्या हतबलतेचे दु:ख विसरण्याचा प्रयत्न करतो. थोर कथाकार प्रेमचंद यांची अशाच प्रकारची कथा आहे, ज्यात घरातली तरूण स्त्री वारल्यावर तिचा नवरा आणि सासरा यांना काळजी वाटते की खांदा द्यायला आलेल्या लोकांना दारू आणि जेवण कसे देणार? शेवटी दोघेही तिच्या प्रेताशेजारी बसून स्वत:च दारू पितात. जवळजवळ शंभर वर्षांपूर्वी लिहिलेल्या या कथेत आणि आजच्या गरीब कामगाराच्या मनोवस्थेत काहीच फरक नाही.

संघटित आणि असंघटित क्षेत्रातल्या अनेक कार्यालयात आजही चतुर्थ श्रेणी कामगाराच्या हातात पडलेला पगार घरी जायच्या आधी देणेकरी ऑफिसबाहेर उभे असतात. पंचवीस टक्के पगारही घरापर्यंत पोहोचत नाही. अनेकांची कुटुंबे खेड्याकडे असतात. प्रसंगी उपाशी राहून, विडी-सिगारेट ओढून, दहा-वीस रुपयांची दारू ढोसून भूक मारली जाते आणि जास्तीत जास्त पैसे गावाला पाठविण्याचा प्रयत्न केला जातो. व्यसन हे गरीबीचे प्रमुख कारण असले तरी त्यासोबतीने इथली व्यवस्था, व्यवस्थापनाची कामगारांकडे बघायची दृष्टी, त्यांच्याच सहकारी क्रेडीट सोसायट्यांनी त्यांना लावलेली कर्जाची सवय या इतर घटकांचा कामगार संघटनांनी विचार करायला हवा. कामगार केवळ संघटित झाला, पगारवाढीचे लढे यशस्वी झाले, कामगारांच्या पतपेढ्या त्यांना भरपूर कर्ज देऊ लागल्या, कामगारांना वर्षाला दोन-चार युनिफॉर्म आणि गमबूट मिळाले की कामगार संघटनांचे काम संपते का? वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कामगारांचे अपुरे शिक्षण, घरातली व्यसने, कामाच्या निमित्ताने शरीरात ठाण मांडून बसणारे आजार, आरोग्याच्या अपुऱ्या आणि कमी दर्जाच्या सोयी हे सगळेच गरीब कामगारांचे प्रश्न आहेत. भर म्हणून लहान वयात येऊन पडलेली कुटुंबाची जबाबदारी, नाईलाजाने पुन्हा त्याच रोगट वातावरणात काम आणि त्यातली असहाय्यता विसरण्यासाठी पुन्हा नवीन व्यसने असे सफाई क्षेत्रातल्या कामगाराच्या आयुष्याचे दुष्टचक्र आहे. यातून बाहेर पडायचे तर शिक्षण हवे आणि हे काम, हे शहर, इथली घुसमट नाकारायची धमकही हवी.

कथासंग्रहातल्या शेवटच्या कथेतला नायक ही धमक दाखवतो. आणि त्यासाठी त्याला मिळालेले आंबेडकरी आणि बुद्धविचारांचे पाठबळ अभिमानाने मान्य करतो. आयुष्याची चाळीस वर्षे मुंबईत काढूनही त्याची नाळ मुंबईशी जुळत नाही. निवृत्तीनंतर तो आपल्या गावी स्थायिक होतो. या खात्यात काम करणारे फार कमी लोक व्यसनापासून लांब राहून, नियमित पैसे वाचवून आपल्या गावी परत जाऊ शकतात. एकतर शहरात राहून परंपरागत व्यवसायाशी, शेतीशी संपर्क पूर्णपणे तुटलेला असतो, शहरातल्या सार्वजनिक सुखसोयींची सवय झालेली असते. अशा वेळी निदान पुढच्या पिढीने मुंबईत राहावे, अशी अनेकांची इच्छा असते. पण देवधेकरांच्या कथेतला नायक याला नकार देतो, मुलाला स्वयंरोजगाराचा मार्ग दाखवतो आणि या चक्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो.

बाबासाहेबांनी १९३४ साली मुंबई महानगर पालिकेतल्या कामगारांसाठी पहिली युनियन स्थापन केली तेव्हा भारतातल्या कामगारवर्गाच्या प्रश्नाला एक जास्तीचा जातिभेदाचा कंगोरा आहे आणि इथल्या वर्गीय संघर्षाला कधी ना कधीतरी जातीय संघर्षाशी भिडावे लागेल, हे त्यांना माहित होते. आज ऐंशी वर्षांनंतरही जातीय कंगोरा तेव्हढाच टोकदार आहे आणि वर्गीय संघर्ष दुर्दैवाने थंडावला आहे. शहरे आडवी-तिडवी वाढली, नगरपालिकांनी कचऱ्याच्या कामाचे जमेल तितके खाजगीकरण केले, स्वातंत्र्याला सत्तर वर्षे झाली तरी देशभरात काही ठिकाणी मानवी मैला उचलणाऱ्या जमाती शिल्लक आहेत. इथली गटारे साफ करण्यासाठी अजूनही तुमच्या-आमच्यासारख्या माणसांनाच गटारात उतरावे लागत आहे आणि या क्षेत्रातले आरक्षणही तसेच आहे. स्मार्ट सिटीच्या, स्वच्छ भारत अभियानाच्या गप्पा मारणाऱ्यांना या खऱ्याखुऱ्या सफाई कामगारांशी, त्यांच्या समस्यांशी, त्यांच्या जगण्याच्या लढाईशी काही देणंघेणं नाही. नगर-नियोजनाचे आराखडे बनत आहेत, रेल्वेगाड्या, वाहने, रस्ते, इमारती चकचकीत, गुळगुळीत होत आहेत, पण रुळांमधली, रस्त्याखालची, इमारतीसभोवतालची घाण कोण साफ करते, याचा या चकचकीत जगातल्या लोकांना पत्ताच नाही. या अंधाऱ्या दुनियेचा भाग असणाऱ्या लोकांशी जमिनीवरच्या, उजेडातल्या लोकांचे पूर्वीही काही नाते नव्हते, आजही नाही. हे नाते जोडण्यासाठी सिद्धार्थ देवधेकर यांचे पुस्तक वाचणे गरजेचे आहे.

एका मोठ्या सामाजिक प्रश्नाला कथेच्या माध्यमातून वाचा फोडण्याचा लेखकाचा प्रयत्न निश्चितच यशस्वी झाला आहे. सतीश भावसार यांचे मुखपृष्ठ आणि सुधारक ओलवे यांची पुस्तकातील छायाचित्रे विषयाला समर्पक आहेत. लोकवांड्.मयगृहाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाने मराठी कथाविश्वात एक वेगळे दालन खुले केले आहे; त्याचे स्वागत करणे गरजेचे आहे.

 

न सांगितलेली गोष्ट
लेखक – सिद्धार्थ देवधेकर
प्रकाशक – लोकवांड्.मयगृह
पृष्ठसंख्या – १६०
मूल्य – रु. २००/-


——-योगिनी राऊळ——-

लेखिका कवी आहेत आणि स्त्रीमुक्ती चळवळीतील सामाजिक कार्यकर्ता आहेत.


लेखाखालील प्रतिक्रिया रकान्यात आपलं मत जरूर नोंदवा.

 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!