खय्याम… एक संगीतमय युग

खय्याम… एक संगीतमय युग

खय्याम… एक संगीतमय युग

चित्रपटाची कथा, त्यावेळची सामाजिक स्थिती, चित्रपटातील प्रसंग पाहून संगीत देणे व गीतांच्या चाली बांधणे हे खय्यामचे वैशिष्ट्य… खय्यामनी चित्रपटाच्या संगीताचा दर्जा, शायरीचा आशय कधीही ही ढळू दिला नाही..

१९ फेब्रुवारी १९२७ ला नवांशहर पंजाब मध्ये जन्मलेले मोहम्मद ज़हूर खय्याम हाशमी संगीतातील एक युगच होते. २०११ ला पद्मभूषण सन्मानप्राप्त खय्यामना…१९७७ ला कभी कभी आणि १९८१ ला उमराव जान या चित्रपटांच्या सर्वश्रेष्ठ संगीतासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते..१९८० ला नूरी, १९८१ ला थोड़ीसी बेवफ़ाई, १९८३ ला बाज़ार‌आणि १९८४ ला रज़िया सुलतान…या चित्रपटांतील सर्वश्रेष्ठ संगीतासाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

१९७७ साली साहिरच्या एका कवितेवरून चित्रपट तयार झाला..कभी-कभी !! या चित्रपटातील संगीताने, खय्यामच्या मेहनतीने, अमिताभच्या अभिनयाने हा चित्रपट मैलाचा दगड ठरला..आणि खय्यामना सर्वश्रेष्ठ संगीतासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा ठरला…

अमिताभ साठी तोपर्यंत रफीसाहेब, किशोरजी यांचा आवाज वापरला जात असे… खय्यामनी प्रयोग केला …

कभी कभी मेरे दिल में ख़याल आता है..

या लोकप्रिय गीतासाठी त्यांनी मुकेशजींचा आवाज वापरला… चित्रपट हिट झाला आणि प्रयोगही हिट झाला….हे गाणे आजही प्रचंड लोकप्रिय आहे.

सर्वश्रेष्ठ संगीतासाठी खय्यामना फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा दुसरा चित्रपट म्हणजे उमराव जान…खय्यामच्या संगीताने फुललेला हा चित्रपट….गीत, अदाकारी, गायकी, त्याकाळच्या सामाजिक परिस्थितीचा अभ्यास, कथेचं उलगडणं, त्यातील रसिकता, वेदना…या सर्वच गोष्टींसाठी श्रेष्ठ होता …

उमराव जानचा अभ्यास केल्यानंतर, त्या पात्राच्या गायकीसाठी, तिच्या आवाजाला योग्य न्याय देण्यासाठी आशाजींच्या आवाजाच्या पट्टी पेक्षा दीड सुर खाली घेऊन त्यांच्याकडून उमराव जानची अजरामर गाणी गाऊन घेणं हे कसब फक्त आणि फक्त खय्यामजींचंच…

इन आँखो की मस्ती के…या गाण्यात रेखाने डोळ्यांनीच मस्ती, अदा पेश केलीये..तर ये क्या जगह है दोस्तो..या गाण्यात रेखाचे डोळे वेदनेचा डबडबलेला सागर बनले होते…त्‍यात खय्यामचं काळीज चिरत जाणारं संगीत रसिकांच्या दिलावर अधिराज्य गाजवत राहिलं…ऐंशीच्या दशकातील या चित्रपटाची गाणी आजही संगीतामुळे प्रत्येक पिढीला माहित आहेत…

बाज़ार चित्रपटाची गाणी संगीतामुळेच अविस्मरणीय ठरली आहेत.

फिर छिड़ी रात बात फुलोंकी..

देख लो आज हमको जी भर के…

करोगे याद तो हर बात याद आएगी…

ही गाणी आठवताच शब्दांआधी संगीत कानात गुंजायला लागतं..

खय्यामचं फक्त मेलोडीयस संगीतच मनावर गारुड करणारं नव्हतं तर गपूची गपूची गम गम…असो वा मौसम मौसम लवली मौसम…सारखं हलकं फुलकं ठेक्यावर ताल धरायला लावणारं संगीत असो, खय्यामचं संगीत काळाच्या कसोटीवर बावनकशी सोनं ठरलं…

तलत मेहमूद च्या किंचित कंपन असणाऱ्या आवाजात

शामे गम की कसम, आज गमगीन है हम, अभी जा अभी जा आज मेरे सनम

हे गाणं अप्रतिमरित्या चालीत बांधून घेऊन सुरांवर, शब्दांवर संगीत जादू करू शकतं हेच सिद्ध केलंय खय्यामनी…

खय्याम च्या पत्नी जगजीत कौर ताकदीच्या गायिका.. त्यांनी फार कमी गाणी गायलीत पण खय्यामच्या संगीताची जादू जगजीत कौर यांच्या आवाजातलं..तुम अपना रंजो गम अपनी परेशानी मुझे दे दो हे शगून चित्रपटातील गाणं असो की काहे को ब्याही बिदेस, अरे लखिया बाबुल मोरे ...असो.. या गाण्यांनी आजही नॉस्टॅल्जिक होणं जाणवतं. त्यातील सुरुवातीचा सनईचा सूर ऐकताना आजही प्रत्येक पोरीच्या माय बापाच्या डोळ्यात पाणी येतंच… हे बिदाई गीतही उमराव जानचंच..

खय्यामनी संगीतबद्ध केलेलं माझं सगळ्यात आवडतं गाणं म्हणजे रज़िया सुलतानचं..ऐ दिल-ए-नादाँ, आरज़ू क्या है जुस्तजू क्या है..

ऐ दिल-ए-नादाँ…या पहिल्याच ओळीतील चार शब्दांनंतर काही क्षणांसाठी थांबणारं संगीत, काळजाचा ठोका चुकवतं… तशीच अवस्था..

ये ज़मीं चुप है, आसमां चुप है ...या ओळी आधीची आणि नंतरची ही जीवघेणी शांतता… अवघं ब्रम्हांड निःशब्द होतं…संगीत…. शब्द….. काहीsssच नाही…एका अनामिक पोकळीत, शांततेच्या आवर्तनात भोवंडत बसतो श्रोता… पण तेही मनाला खूप भावतं…कितीही कोलाहलात हे गाणं ऐकलं तरीही मन निरवतेच्याच अधिन होतं…कुठलं ही वाद्यं न वाजवता, सूर ऐकू न येता, गंभीर परिणाम साधणारं खय्यामचं हे संगीत लाजवाबच… त्यानंतर हळुवारपणे पाण्यावर तरंग उठावेत तसा पसरत जाणारा लतादीदींचा सूर…वाहव्वा…वेळ लागतोच या गानसमाधीतून बाहेर यायला…

खय्याम, आज तुमच्या नंतरही या संगीताच्या जादूतून रसीक बाहेर पडू शकत नाही…तुम्ही गेला नाहीतच, फक्त नजरेच्या टप्प्याआड झालात…तुमची संगीतबद्ध गाणी ऐकताना, तुमचा सदा हसरा चेहरा नजरे समोर येईल.. आमच्यासारख्या रसिकांना संगीताच्या बरसातीत चिंब भिजवून मालामाल करणाऱ्या खय्याम ना त्रिवार सलाम..!!

 

———-अजिता सोनाले———-

लेखिका निवृत्त शिक्षिका असून त्यांचं सिनेगीतांवर आधारित पडद्यामागचं गाणं हे पुस्तक प्रकाशित आहे.

बुकगंगावर आहे पुस्तक…पडद्यामागचं गाणं

लेखाखालील प्रतिक्रिया रकान्यात आपलं मत जरूर नोंदवा.

 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!