चौकटीबाहेरची कलावंत आणि कौशल्यही !

चौकटीबाहेरची कलावंत आणि कौशल्यही !

चौकटीबाहेरची कलावंत आणि कौशल्यही !

सरोज,
सरोज खान,
मास्टरजी ,म्हणजेच निर्मला किशनचन्द्र संधुसिंह नागपाल…
तू गेलीस, मुद्रा शांत, भाव निस्तेज, घूंगरांना मूकं करून. कोट्यावधी शिष्य झुकणारे तुझे पाय आता कधीच थिरकणार नाहीत. कुणावरही अवलंबून राहू नये हे अनुभवांनी तु शिकलीस आणि तूच तुला घडवलंस. पाकिस्तानच्या एका अमीर बापाची लेक तू . देश फाटला आणि तुझे फाटलेले आई-वडील एक चटई घेऊन माहिमच्या पीडब्ल्यूडी चाळीत स्थिरावले. इथेच जन्मलीस तू. २२ नोव्हेंबर१९४८ रोजी.

लहानपणी भिंतीवरच्या हलत्या सावल्यांंसोबत हातवारे करत, तूही नाचायचीस. आईला वाटलं तुला कशाची तरी बाधा झालीय. म्हणून तिने, तुला डॉक्टरला दाखवलं. तेव्हाच डॉक्टरने भाकीत वर्तवलेलं की , तू जगातील सर्वश्रेष्ठ कलावंत होशील.

वयाच्या तिसऱ्याचवर्षी बालकलाकार म्हणून तू “नजराणा” चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलस. ते पाऊल ६९ वर्ष अविरत थिरकतच होतं.
चार बहिणी आणि एक भाऊ वर्षभराचा असतांंना तुझे वडील गेले. एकट्या पडलेल्या आईसोबत तूही त्या घराची आई झालीस. वयाच्या १० व्या वर्षी तू बँकग्राऊंड डान्सर बनून नर्तनालाच आयुष्य बनवलंंस. १९५८ च्या हावडा ब्रिज चित्रपटात मधुबालाच्या ‘आईए मेहेरबा…” या गाण्यात बॅकग्राऊंडला तू दिसलीस. ताजमहलच्या कव्वालीत तर तु मागे बसूनही तुझी डोळे, ओठांची अदाकारी इतकी प्रभावी होती, की, जणू मुख्य नायिकेसही फिकं ठरवत होतीस !

वयाच्या १३ व्या वर्षी ४३ वर्षाच्या नृत्यदिग्दर्शक मास्टर पी सोहनलाल यांच्या कडून नृत्यविद्येचे धडे घेतलेस. ते घेता घेता त्याच्याच प्रेमात पडलीस. त्याची पत्नीही झालीस. त्याने तुला भरभरून प्रेम दिलं , भाकर दिली, दोन मुलं दिली. नाही दिलं, ते फक्त तुझ्या मुलांना त्याचं नाव. त्याचक्षणी, तू धैर्याने तडक त्याला नाकारलंस. कुटुंब आणि तुझ्यातील तू. हे द्वंद्व आयुष्यभर संपलंच नाही.

जगण्यासाठी बॅकग्राऊंड डांसर, नर्स, टेलिफोन ऑपरेटर , रिसेप्शनिस्ट, सहाय्यक नृत्य दिग्दर्शक झालीस. नंतर तू सरदार रोशन सोबतही संसार थाटलास. पण चौकटीतली नव्हतीसच तू. पुढे संधी तुला खुणावत होती. वैजयंतीमालाने तुला डान्स डायरेक्टर म्हणून पहिला ब्रेक दिला. यानंतर मात्र तू कधीच वळून मागे पाहिलं नाहीस.

तू वहिदा, नूतन, आशा, कुमकुम, शर्मिला, रेखा, श्रिदेवी, ते वेस्टन हेलन पर्यंत सगळ्या नायिकांना आपल्या तालावर नाचवलंस. केवळ माधुरी, मिनाक्षी, ऐश्वर्या , काजल ते दिपिकाच नव्हे तर गोविंदा , अनिल कपूर, संजय दत्त सारख्या नटांनाही प्रत्येक ताल, शब्द, लय आणि त्याचा भाव व्यक्त करण्यासाठी नाक, डोळे, भुवया, ओठ, हनुवटी, मान, खांदे ,कंबर यांच्या सह स्टेजचा व्यापक व समर्पित वापर तू नव्यानं शिकवलास.

१९८८ च्या ‘ तेजाब ‘ मधील एक-दोन-तीन या गाण्यात तर माधुरीसोबत हजारो प्रेक्षकांनाही बेधुंद नाचवलंस. इथूनच कोरिओग्राफर काय असतो हे बॉलिवूडला कळलं. तुझ्या या गाण्यापासुनच कोरिओग्राफरसाठी पहिल्यांदाच फिल्मफेअर अवॉर्डची सुरुवात झाली.

आज तुझ्यामुळेच कोरीओग्राफरला पत, प्रतिष्ठा आणि पैसा मिळू लागलाय. तू सजवलेले धकधक, एक-दोन-तीन , डोला रे डोला, निंबोडा निंबोडा, मार डाला, तम्मा तम्मा , पासून जब वी मेट पर्यंतच्या एक ना अनेक गाण्यांना तुझ्या नृत्य दिग्दर्शकाने समृद्ध केलंय. कथ्थकली , भरतनाट्यम, कथ्थक, मणिपुरी या नृत्य प्रकारांनी तर तुझ्या पायाशी लोळण घेतली होती . २०० पेक्षा अधिक चित्रपटातून २००० पेक्षा अधिक गाणी तुझ्यामुळे ऐतिहासिक ठरलीत.

तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळवूनही चंदेरी गर्दीत तू कधीच हरवली नाहीस. बॅकग्राऊंड डान्सर असोसिएशन अध्यक्षपदावरून, डान्स अँकेडमीतून, रियालिटीज शोजची जज बनुन , हजारो जगभरातील डान्स प्रेमींना, घरगुती ग्रुहिणींना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तू डान्स शिकवुन आत्मिक समाधानाचा मार्ग दाखवत राहिलीस आणि कायमच दाखवशील. तू १९७४ पासून ४ दशकं सिने प्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवलंस. गाण्यातल्या भावछटा, अंगबोली यांची नव्याने ओळख करून दिलीस. नाचण्याला नवा अर्थ उमजवुन दिलास.

आता स्वर्गातील अप्सरांनाही तुच कोरिओग्राफ करावंस. हाच तुझ्या नावानं कलमा आणि मिलाद पढतो !

 

प्रफुल केदारे

लेखक पत्रकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते व कायद्याने वागा लोकचळवळीचे माध्यम समन्वयक आहेत.‌

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!