नाविण्यपूर्ण आणि सर्वसमावेशक आयोजनासाठी महाराष्ट्रातील कलासाहित्य क्षेत्रात अल्पावधीत नाव कमावलेला झिम्माड महोत्सव यंदा १० व ११ सप्टेंबर रोजी ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यातील माळ गावातील निसर्गरम्य अशा रिलॅक्स एडव्हेंचर रिसाॅर्टवर होतोय.

लेखिका, कवी डाॅ. प्रज्ञा दया पवार यंदाच्या कलासाहित्य झिम्माड महोत्सवाच्या अध्यक्ष आहेत. अभिनेता किरण माने उद्घाटक असणार आहेत तर नाट्यदिग्दर्शक रवीन्द्र लाखे, डोंबिवली रिटर्नचे लेखक- दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई, व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर, भापोसे अधिकारी रुपाली अंबुरे व कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

याशिवाय महाराष्ट्रातील कलासाहित्य क्षेत्रातील शशिकांत तिरोडकर, छाया कोरेगावकर, शिल्पा कांबळे, दुर्गेश सोनार, योगिनी राऊळ, प्रतिभा सराफ, ज्योत्स्ना राजपूत, संगीता अरबुने, नंदू सावंत, सुवर्णा जाधव, सुनिल देवकुळे, सुहास मळेकर, सुप्रिया हळबे,संगीता लोहारे, अमोल गायकवाड, प्रथमेश पाठक, सरीता पवार, कल्पना मलये, संदीप जालगावकर, कविता मोरवणकर, मंजिरी मणेरीकर, आनंद लोकरे, स्वाती वैद्य, उत्तम जोगदंड, नितीन शेठ, बापू राऊत, श्रीकांत पेटकर, शालिनी आचार्य, डॉ. नरसिंग इंगळे, शिवराम भोंडेकर, सुनील शिरसाट, जयश्री देशमुख, प्रिया मयेकर असे अनेक मान्यवर यंदाच्या झिम्माड कलासाहित्य महोत्सवात सहभागी असणार आहेत, असं झिम्माड कलासाहित्य महोत्सवाच्या संयोजक वृषाली विनायक यांनी कळवलं आहे.

कायद्याने वागा लोकचळवळीच्या महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्था व झिम्माड काव्यसमुहाच्या वतीने झिम्माड कलासाहित्य महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. यंदाचं पाचवं वर्षं आहे.
खेळीमेळीचं वातावरण, साहित्यिक कप्प्यांच्या पलिकडे जाऊन कलासाहित्य क्षेत्रात अभिव्यक्ती जोपासणाऱ्या अगदी विभिन्न विचारांतला स्नेहसंवाद हे झिम्माड महोत्सवाचं वैशिष्ट्य आहे.

पुण्यातील एस एम जोशी फाऊंडेशन, माणगांवचं साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, दापोलीचं कृषीभवन आणि बदलापुरातील लव्हाळी गावात या आधीच्या झिम्माड महोत्सवांचं आयोजन झालं आहे.
यंदाच्या आयोजन समितीत वृषाली विनायक यांच्यासोबत कवी अरुण गवळी, जितेंद्र लाड, सुधीर चित्ते व संध्या लगड यांचा समावेश आहे.

शनिवार १० सप्टेंबर रोजी साहित्यसहलीचा माहौल आणि दुसऱ्या दिवशी रविवारी ११ सप्टेंबर रोजी दिवसभर झिम्माड महोत्सवाचं रीतसर आयोजन असं स्वरूप आहे. परिसंवाद, मुलाखत, कवीसंमेलन यासोबतच मुक्तसंवाद, संगीत मैफल अशा विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली असल्याची माहिती वृषाली विनायक यांनी दिली आहे.