ऑडिओ क्लिप मधील आवाज नक्की प्रियांका नारनवरे यांचाच आहे का ?

ऑडिओ क्लिप मधील आवाज नक्की प्रियांका नारनवरे यांचाच आहे का ?

ऑडिओ क्लिप मधील आवाज नक्की प्रियांका नारनवरे यांचाच आहे का ?

समाजमाध्यमात सध्या एक ध्वनिफीत मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे. व्हॉट्सऍप-फेसबुकवर या ध्वनिफितीची जोरदार चर्चा सुरू आहे. या ध्वनीफितीत एक महिला आपल्या सहकाऱ्याकडे हॉटेलमधून फुकट जेवण मिळेल का, याची चौकशी करत आहे. सदरची महिला दुसरंतिसरं कोणी नसून पुण्यातील परिमंडळ 1 च्या पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे असल्याचा दावा ध्वनिफिती सोबतच्या मजकुरातून करण्यात येत आहे.

मात्र सदरबाबत कोणतीही पुष्टी झाली नसून पोलिसातील आपसातील वैमनस्यातून हा प्रकार केला गेला असल्याचंही सांगण्यात येत आहे. डिसीपी प्रियांका नारनवरे यांच्याकडून मात्र अद्यापि कोणताही अधिकृत खुलासा आलेला नाही.

 

मिडिया भारत न्यूज ने पोलिस उपायुक्त कार्यालयाच्या ०२० – २४४५४४५० या क्रमांकावर संपर्क साधला ; पण काॅल स्वीकारला गेला नाही. dcpzone1.pune@nic.in या ईमेलवर विचारणाही केलीय, पण अद्याप प्रतिसाद नाही. प्रतिसाद मिळाल्यावर तो वृत्तात जोडण्यात येईल.

ध्वनीफितीतील महिला समोरच्या व्यक्तिकडे मांसाहारी जेवणाबाबत चौकशी करताना ऐकू येते. मटन, चिकन, कोळंबीचं चांगलं जेवण कुठे मिळेल, त्यांना चिकन आवडतं, नवऱ्याला मटन आवडतं, कोळंबी सुकं मिळेल का अशी ही चर्चा जेव्हा खर्चावर येते, तेव्हा महिला म्हणते, पीआयना सांगून व्यवस्था करा. आपल्या हद्दीत आपण पैसे द्यायचे का? ध्वनीफितीतील वादग्रस्त भाग या फुकटेगिरीचा आहे.

पोलिस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांचा तो आवाज असल्याचा दावा केला गेल्यामुळे ध्वनीफित वादग्रस्त ठरली आहे. मात्र, सदरबाबत वृत्तांकन करणाऱ्या टीव्ही9 या वृत्तवाहिनीने बातमी काढून टाकली आहे, तर पुण्यातील पीएनन्यूज या स्थानिक पोर्टलने सदरची ध्वनीफित बनावट असल्याचं म्हटलं आहे.

संबंधित अधिकाऱ्याची बदली करण्यासाठी ही बनावट ऑडियो क्लिप व्हायरल केली जात असून त्यांच्याविरोधात राजकारण व षडयंत्र रचले जात असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या पदावर येऊ इच्छणाऱ्या अन्य अधिकाऱ्याने बनावट ऑडियो क्लिप (Fake Audio Clip) तयार करून व्हायरल केल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे. आता या प्रकरणाची चौकशी सायबर सेलकडून व्हावी अशी मागणी केली जात आहे, असं वृत्त सदरच्या वेबपोर्टलने दिलं आहे.

स्वत: डिसीपी नारनवरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्याविरोधात षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे. यात गैरधंदे बंद झाल्यामुळे दुखावलेले पोलिस कर्मचारी आणि एका डिसीपी स्तरावरील अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. आपण सदरबाबत सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

अलिकडेच पुण्यातील दगडूशेठ गणपती जवळच्या एका इमारतीत धाड टाकून पोलिस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांनी 50 लाखांची रोख रक्कम जप्त केली होती. गुटख्याच्या अवैध व्यवसायातील ती रक्कम असल्याचा पोलिसांना संशय आहे. तीन वर्षांपूर्वी ठाणे नगर पोलिस ठाण्यातील महिला पोलिसांच्या लैंगिक छळवणुकीच्या तक्रारीची चौकशीही त्यांच्याकडे होती. नारनवरे यांच्या रोखठोक स्वभावामुळे त्यांना लक्ष्य केलं जात असल्याचं बोललं जातंय.

अर्थात, त्यामुळे ध्वनीफितीच्या विवादातून त्यांची सुटका होत नाही. सदरची ध्वनीफित कुठून आली, त्यातला आवाज प्रियांका नारनवरे यांचा आहे का, अन्यथा, आवाज कोणाचे आहेत, ती पसरवण्यामागे कोणाचे काय हेतू आहेत, याची सदरबाबत फौजदारी गुन्हा दाखल होऊन रीतसर चौकशी व संबंधितांविरोधात कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी कायद्याने वागा लोकचळवळ करत आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!