पतंजलीच्या स्वदेशीपणाला स्वदेशी कायद्यांचा धाक का नाही ?

पतंजलीच्या स्वदेशीपणाला स्वदेशी कायद्यांचा धाक का नाही ?

पतंजलीच्या स्वदेशीपणाला स्वदेशी कायद्यांचा धाक का नाही ?

एके काळी पतंजली हे नाव ऋषी पतंजलीच्या योगाभ्यासासाठी जगभर प्रसिद्ध होते. आता ह्या नावाला चिकटलाय एक व्यापार. प्राचीन योगशास्त्र आणि आधुनिक मेडिसीनच्या मधल्या पोकळीत राष्ट्रवाद इतका घट्ट बसवला गेलाय की पतंजली ह्या नावाचा मुळ उद्देशच गेल्या दोन दशकात बदलत गेला. आज पतंजली हे नाव ऐकताच योगशास्त्र आठवायचे सगळे मार्ग बंद आहेत. आता डोळ्यासमोर येतो तो करोडो रुपयांची वार्षिक उलाढाल करणारा एक उद्योग समुह. कोणी कोणाच्या नावाने उद्योग सुरु करावा, हा प्रश्न मुळीच नाही, पण इतिहास, धार्मिक भावना आणि देशातील लोकांच्या अस्मितेला हात घालून योगाची परंपराच नष्ट करण्याला मात्र विरोध करत राहायला हवा.

आज पतंजली उद्योगसमुह हा भारतातल्या सर्वात मोठ्या उद्योगसमुहांपैकी एक आहे आणि ह्या उद्योगसमुहाचा प्रत्येक रोगांवर मोठे मोठे दावे करण्याचा मोठा इतिहास आहे. कोरोना महामारीने सगळे जग त्रस्त असतानाच संपूर्ण जगभरातील विद्यापीठे, मेडिकल संस्थाने, छोट्या छोट्या लॕब कोरोनावर उपचार शोधण्यासाठी दिवसरात्र एक करत असतानाच २३ जून २०२० रोजी पतंजली उद्योगसमुहाने कोरोनावर उपचार शोधल्याचा दावा केला. हा दावा फार काळ टिकू शकला नाही. अवघ्या ४ दिवसातच पतंजलीला आपला दावा मागे घ्यावा लागला आणि दावा करताना केलेल्या विधानांवरुन पतंजलीने ३६० अंशात पलटी मारली.आयुष मंत्रालय आणि आईसीएमआर (भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद) यांनी पतंजलीचा हा दावा साफ खोटा ठरवला आणि औषधावर तात्काळ बंदी आणली.

अशा प्रकारचा प्रचार ड्रग्स एंड मैजिक रेमेडीज अॕक्ट १९५४ चे उल्लंघन आहे. शिवाय सद्यस्थितीत डिझास्टर मैनेजमेंट अथॉरिटी एक्ट २००५ नुसार कोणतीही व्यक्ती खोटे दावे करत असेल तर तो गुन्हा आहे. पतंजलीचा कोरोनावरील औषधाचा दावा सरळ सरळ ह्याच कायद्याचे उल्लंघन आहे. ह्या कायद्या अंतर्गत एखाद्याला औषध बनवण्यासाठीची परवानगी मिळू शकते. दावे करण्याची नाही. सदर कायद्याचं उल्लंघन केल्यास व्यक्तीला ५-७ वर्ष सजा होऊ शकते. पतंजलीे तर वैश्विक महामारीचा फायदा घेत होती, त्यामुळे जागतिक पातळीवरही पतंजली अडचणीत येऊ शकते.

पतंजलीने असे खोटे दावे करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. जनतेची दिशाभूल करण्याची पतंजलीची परंपरा स्थापनेपासूनची आहे.

योगाने homosexuality आणि एड्स सारखा आजार बरा होऊ शकतो, हा दावाही पतंजलीने कुठल्याही ठोस वैज्ञानिक पुराव्याविना केला होता.homosexuality सारख्या मानसिक आजार योगामुळे बरा होऊ शकतो, असे सांगून पतंजली थांबली नाही तर त्याचा एक कोर्सच लाँच केला त्यातही बरीचशी औषधे त्यांनी लोकांना सुचवली होती. रामदेव बाबांनी ह्याच आजाराचा आधार घेऊन ज्यांना मुल-बाळ होत नाही त्यांना योगामुळे मुलं होतील, असाही दावा केला होता. तोही कालांतराने बनावट ठरला

मार्च २०१६ मध्ये बाबा रामदेव यांच्या पतंजली स्टोअर मध्ये अॉक्टोबर २०१६ चे म्हणजे सहा महिने नंतरचं उत्पादन दाखवणारा आवळ्याचा मुरब्बा विक्रीस होता. स्थानिकांनी केलेल्या तक्रारीनंतर एफएसडीएच्या अधिका-यांनी पतंजलीच्या स्टोअरवर छापे मारून तेथून मुरब्ब्याचे डब्बे ताब्यात घेतले. उत्पादन तारीख चुकीची टाकणे तसेच चुकीच्या माहितीच्या आधारावर प्रोडक्टस विकणे भारत सरकारच्या ड्रग्स अॕण्ड कॉस्मेटीक अॕक्ट १९४० चे उल्लंघन आहे. सदर उत्पादन हे पतंजलीच्या हरिद्वारस्थित कंपनीतून विक्रीस पाठवण्यात आले होते.

https://www.dnaindia.com/business/report-now-baba-ramdev-s-patanjali-murabba-comes-under-scanner-2186222

फेब्रुवारी २०१६ मध्ये बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योग समुहाला हरिद्वार कोर्टाने ११ लाखांचा दंड ठोठावला होता. आपली उत्पादने विकण्यासाठी दुस-या प्रतिस्पर्धी उत्पादनाविरुद्ध खोट्या अफवा पसरवणे तसेच आपल्या उत्पादनांची खोटी जाहिरात करणे असा आरोप पतंजलीवर ठेवण्यात आला होता. पतंजलीव्यतिरिक्त इतर खाद्यतेलाच्या सेवनामुळे कँन्सर सारखा रोग होतो, हे धडधडीत खोटे वाक्य पतंजलीने आपल्या जाहिरातीत जोडले होते आणि माध्यमांनीही ह्या प्रचाराला हवा दिली होती.

२०१५-२०१६ ह्या काळात पतंजली उद्योगसमुहाच्या ३३ जाहिरातींपैकी तब्बल २५ जाहिराती ह्या दिशाभूल करणा-या तसेच खोटी माहिती पसरवणा-या होत्या. consumer protection act 1986 तसेच violation of ASCI Code च्या अंतर्गत पतंजली उद्योग समुहाला नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. त्यावेळी आपल्या कुठल्याही दाव्याचे पतंजलीकडे योग्य स्पष्टीकरण आढळून आले नव्हते.

२०१७ च्या एका माहिती अधिकारातून पतंजलीचा आवळा रस तसेच शिवलींग बीज नामक उत्पादनेही निकृष्ट दर्जाचे असल्याचे सामोरे आले होते. नेस्टले कंपनीच्या मॕगीला पर्याय म्हणून बाजारात आलेली पतंजली आटा नूडल्सही निकृष्ट दर्जाचे असल्याचे Food Safety and Drugs Administration (FSDA) मेरठनी स्पष्ट केले.

पतंजली सातत्याने देशातल्या लोकांच्या आरोग्याशी खेळत आली आहे. राष्ट्रवादाचे कव्हर चढवून पतंजली आतमध्ये कोणतेही उत्पादन बेधडक पणे विकू शकते. साहजिकच हे सर्व सरकारच्या मदतीनेच होत आहे. एवढ्या सगळ्या प्रकरणानंतरही पतंजलीवर कुठलीही ठोस कार्यवाही झाली नाही उलट वेगवेगळ्या सरकारने आपली जमीन कवडीमोल भावात योगगुरुच्या घश्यात घातली.

मुद्दा स्वदेशीचाच असता तर डाबर, Vicco सारख्या कितीतरी कंपन्या आज डबघाईला आलेल्या आहेत. त्या स्वदेशी नाहीत? नक्कीच आहेत, पण त्यांच्याकडे राष्ट्रवादाचे, धार्मिक अस्मितेचे प्रमाणपत्र नाही की एखादा भगव्या कपड्यातील ब्रैंड अबेसेडर नाही. टिव्हीवरचा योगा कधी उत्पादने बनून राष्ट्रवादाच्या मार्गाने तुमच्या माझ्या स्वयंपाकघरापर्यंत आला कळलेच नाही.

आपल्याला स्वदेशी नावाचे अंजन इतक्या वेळा घातले गेलय की आपण आंधळे होऊन एका नियोजित उद्योगपतीला बाबा समजून त्याच्यावर विश्वास ठेवला होता. जोपर्यंत आपण असे आंधळे बनवून राहू तो पर्यंत पतंजली सरकारच्या मदतीने सगळे अन्नसुरक्षेचे, औषधनिर्मितीचे नियम धाब्यावर बसवून तुमच्या माझ्या आरोग्याशी खेळत राहणार हे नक्की !

 

अंकुश हंबर्डे पाटील

कायद्याने वागा लोकचळवळीचे नांदेड जिल्हा समन्वयक तसंच मिडिया भारत न्यूज चे कार्यकारी संपादक

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!