एप्रिल फूल आणि मनुवाद्यांचा काय संबंध ?

एप्रिल फूल आणि मनुवाद्यांचा काय संबंध ?

एप्रिल फूल आणि मनुवाद्यांचा काय संबंध ?

समाजमाध्यमांचं युग सुरू झाल्यापासून आपापलं घोडं दामटवणाऱ्यांचंही पेव फुटलं आहे. संदर्भहीन, तर्कहीन आणि तथ्यहीन संदेश बनवणं आणि ते बिनधास्तपणे पसरवणं याचा कोणासही संकोच वाटेनासा झाला आहे. उलट खोटं रेटून बोलणाऱ्यांची संख्या वाढते आहे. अशा प्रवृत्तींचं जातधर्मभाषादेशप्रांतापलिकडे समाजात बहुमत निर्माण झालं आहे. असाच एक संदेश काही दिवसांपासून झळकू लागलाय. तो संदेश आहे, एप्रिल फूल संदर्भातील ! या संदेशाचा डॉ. भीमराव आंबेडकर यांचा संदर्भ देण्यात आला असल्याने तो खातरजमा न करता भावनिकदृष्ट्या पसरवणाऱ्यांची संख्या मोठी आहे.‌

आंबेडकरी अनुयायी स्वत:ला पुरोगामी, विज्ञानवादी, विवेकवादी समजतो. त्यामुळे त्याच्या कृतीत तर्क आणि तथ्य अपेक्षित असतं. पण उत्साही लोकांची आता कुठल्याही जातधर्मात अगदी विचारप्रणाली अनुसरणाऱ्यांमध्येही कमतरता नसल्याने आंबेडकरांचं नाव आहे ना मग द्या पुढे ढकलून, असं धोरण बाळगणारेही नसतील तर काय नवल !

पुढील संदेश सद्या वेगाने पसरतोय...

खरं तर १ एप्रिल हा दिवस एप्रिल फुल नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला एक ग्रंथ "the problem of the rupee" या ग्रंथाचा आधार घेऊन १ एप्रिल १९३५ या दिवशी reserve bank of india बाबासाहेबानी या बँकेची स्थापना करून १ एप्रिल ते ३१ मार्च हा आर्थिक कालावधी ठरवला, बाबासाहेबानी देशासाठी केलेले एक हे महान कार्य आहे, त्यामुळे १ एप्रिलपासून आर्थिक वर्षाची सुरुवात होते आहे आणि हि गोष्ट मनुवादी लोकांना पटली (पचली) नाही म्हणून त्यांनी १ एप्रिल हा दिवस मूर्खपणाचा दिवस म्हणून साजरा करायला लावला, म्हणून सर्वांनी याचा तार्किक विचार करून एप्रिल फुल्ल हा दिवस साजरा करू नये हा बाबासाहेबांचा अपमान आहे. जयभीम !

या मजकुरातील १ एप्रिल १९३५ रोजी भारतीय रिझर्व्ह बॅंकेची स्थापना झाली, इतक्याच माहितीत तथ्य आहे.

भारतीयांनी १ एप्रिल हा दिवस एप्रिल फूल म्हणून साजरा न करता रिझर्व्ह बॅंकेचा स्थापना दिवस म्हणून साजरा करावा किंवा त्या दिवसाच्या निमित्ताने आंबेडकरांनी मांडलेल्या अर्थनीतीवर चर्चाविनिमय घडवावा, असं आवाहन करणारा मजकूर असता, तरी चालण्यासारखं होतं.

पण १ एप्रिल हा दिवस मूर्खपणाचा दिवस म्हणून साजरा करण्यामागे मनुवाद आहे, हा तर्क निराधार आणि काल्पनिक आहे ; कारण एप्रिल फूलला जवळपास चारपाचशे वर्षांपूर्वीचे संदर्भ आहेत. ते ऐतिहासिकदृष्ट्या ठोस नसले तरीही जगाने ते अंदाजे माहिती म्हणून स्वीकारलेले आहेत.

एप्रिल महिन्याचा पहिला दिवस. ह्या दिवशी गमतीने एखाद्यास बनविण्याची प्रथा पाश्चिमात्य राष्ट्रांत प्रामुख्याने दिसून येते. बनलेल्या व्यक्तीस ‘एप्रिल फूल’ म्हणण्याचा प्रघात आहे. ह्या प्रथेची सुरुवात केव्हा व कशी झाली, हे निश्चितपणे सांगता येत नसलं तरी काही लोक तिचा संबंध प्राचीन रोममधील व्हीनस व फॉर्चुना व्हिरिलीस या देवतांच्या उत्सवाशी लावतात.

ग्रेगोरियन पंचांग १५६४ साली स्वीकारल्यानंतर फ्रान्समध्ये या प्रथेस सुरुवात झाली व ती १६०० पर्यंत इतरत्र पसरली असेही म्हटले जाते. काही लोक त्यास लूच्या वसंतोत्सवाची स्मृती मानतात.

ग्रेगरियन कालगणनेप्रमाणे मार्च हा वर्षातील तिसरा महिना असतो. मार्स म्हणजे मंगळ ही युद्ध देवता व कृषिदेवता मानलेली असून या देवतेवरून या महिन्याला मार्च असे नाव पडले. ख्रि. पू. १५३ पर्यंत मार्च हाच वर्षाचा पहिला महिना समजला जाई व २५ मार्च हा वर्षारंभ समजत.

इंग्लंडमध्ये तर इ. स. १७५२ पर्यंत मार्च हा वर्षारंभ महिना असे. हा महिना ३१ दिवसांचा असतो. मार्च ३१ हा दिनांक पुष्कळ व्यवहारात वर्ष अखेरचा दिवस समजलेला आहे.

प्राचीन रोममधील हिलेरिया व भारतातील होळी या उत्सवाशी या एप्रिल फूलचे बरेच साम्य आहे. होळी व हिलेरिया यांच्याप्रमाणेच हा प्रकार वसंतागमनाच्या वेळीच साजरा करतात.

मेक्सिकोत २८ डिसेंबरला हा दिवस पाळतात. त्या दिवशी उसनी घेतलेली वस्तू परत न करण्याची तेथे प्रथा आहे. बनलेल्या व्यक्तीस इंग्‍लंडमध्ये ‘एप्रिल फूल’, स्कॉटलंडमध्ये ‘एप्रिल गॉक’ व फ्रान्समध्ये ‘एप्रिल फिश’ म्हणतात. ब्रिटिशांच्या अंमलाबरोबर ही प्रथा भारतात आली. या दिवसास सकल मूर्खांचा दिवस असेही म्हणतात.

लहानग्यांपासून ते वयस्करांपर्यंत सर्वजण एकमेकांना मुर्ख बनविण्याचा दिवस म्हणजे १ एप्रिल.

संपूर्ण जगात हा दिवस एकमेकांना मुर्ख बनविण्यासाठी साजरा केला जाऊ लागला. जपान आणि जर्मनीमध्ये पूर्ण दिवस लोक प्रॅंक करत असतात. स्कॉटलॅंडमध्ये सलग २ दिवस हा दिवस साजरा केला जातो. फ्रान्समध्ये याला 'फिश डे' असे म्हटले जाते. यादिवशी लहान मुल कागदाचा मासा एकमेकांच्या पाठीवर चिटकवून दिवस साजरा करतात.

एप्रिल फूल साजरा करण्याची सुरूवात फ्रान्समधून झाली. पॉप ग्रेगरी १३ यांनी १५८२ यांनी प्रत्येक युरोपियन देशाला ज्यूलियन कॅलेंडर सोडून ग्रेगोरियन कॅलेंडर वापरण्याचे निर्देश दिले. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये नवे वर्षे हे १ एप्रिलपासून नाही तर १ जानेवारीपासून सुरू होतं. अनेक लोकांनी हे मानण्यास नकार दिला तर काहींना याबद्दल माहितीही नव्हती. यामुळे ते नववर्ष १ एप्रिललाच साजरे करतात. अशांना एप्रिल फूल म्हटले जाऊ लागले.

यादिवशी आकस्मिक घटना घडवून किंवा पसरवून एकमेकांना मुर्ख बनवू लागले. बघता बघता ही प्रथा युरोपमध्ये पसरली.

एप्रिलमध्ये नववर्ष साजरं करण्याची प्रथा केवळ फ्रान्समध्येच नाही, तर भारतातील हिंदुंचं नववर्षही गुढी पाडव्याला म्हणजेच एप्रिलच्याच कालावधीत साजरं केलं जातं.

हिंदु नववर्षाचा पहिला महिना चैत्र हा एप्रिल व मे या इंग्रजी महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे १ जानेवारीला नववर्ष साजरं करणाऱ्यांच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर हिंदू नववर्ष साजरं करणारेही मूर्ख ठरू शकतात. त्यामुळे ते ( मनुवादी ) स्वत:च एप्रिल फूल साजरा करतील, ही शक्यता तर्काला धरून दिसत नाही !


आणखी काय वाचाल ?

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!