बोटक्लबचा लढा

बोटक्लबचा लढा

बोटक्लबचा लढा

भाजपाच्या सत्तेत भारतमातेची विटंबना

उल्हासनगर महानगरपालिकेच्या बोटक्लब उद्यानातलं भारतमातेचं शिल्प सद्या मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे दुरवस्थेत आहे. केवळ व्यापारी हेतूने राजकारण करणाऱ्या उल्हासनगरातील भाजपाकडून राष्ट्रभक्तीची अपेक्षाच करणं अवास्तव ठरतं. जिथे देशभरातच वंदे मातरम, भारतमातासारखे मुद्दे स्वार्थी राजकारणात तोंडी लावण्यापुरती वापरणारी भाजपा उल्हासनगरात सत्तेत आहे. बोटक्लबमधील भारतमातेच्या विटंबनेमुळे भाजपाचा ढोंगी चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे.

प्रल्हाद अडवानींनी उभारलं होतं
बोट क्लब उद्यान

जनसंघाचे प्रल्हाद अडवानी उल्हासनगरच्या नगराध्यक्षपदी होते, त्यावेळी नगरपालिकेचं बजेट अवघं ४ कोटींचं होतं. तरीही इच्छाशक्तीच्या जोरावर अडवानींनी बोटक्लब उद्यान उभं केलं. आज ७०० हून अधिक कोटींचं बजेट असताना त्या उद्यानाला अक्षरशः अवकळा आली आहे. या उद्यानात शाळकरी मुलांच्या वनसहली यायच्या,सहभोजन व्हायचं. हिरवाईने नटलेलं होतं हे उद्यान. उद्यानातील तलावात बोटींगची व्यवस्था होती. नागरिकांसाठी बोटक्लब उद्यान एक आवडतं विरंगुळा ठिकाण होतं.

माहितीपूर्ण राष्ट्रशिल्पंही उभारली होती

प्रभु रामचंद्र, गुरू गोविंदसिंग, छत्रपती शिवराय, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई, महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील एका प्रसंगावर आधारित वास्तुशिल्प आणि त्या प्रसंगाची सविस्तर माहिती असं त्या राष्ट्रशिल्पांचं स्वरूप होतं. त्यातली बहुतेक शिल्प गायब असून, प्रभु राम, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई यांची शिल्प दुरवस्थेत राजकारणांच्या कोडगेपणाची साक्ष देत उभी आहेत. यात एक शिल्प भारतमातेचं आहे, ज्यावर सारे जहांसे अच्छा हे गीत कोरलेलं आहे. भारतमातेचं हे शिल्पही तिथे बकाल अवस्थेत उभं आहे. अस्वच्छतेचे दूत म्हणून ओळखली जाणारी डुकरं या शिल्पांची देखभाल करताहेत.

यापूर्वी वेधले होते दुरवस्थेकडे लक्ष

कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून, नगरसेवक असताना आणि नंतर चळवळीच्या स्थापनेनंतरही हा विषय वारंवार चव्हाट्यावर मांडला आहे. प्रत्येकवेळी कायमस्वरूपी उपाययोजनांची हमी देऊन तात्पुरती साफसफाई केली जाते. सद्यस्थितीत कचरा वाहतूक ठेकेदाराला वाहनतळासाठी बोटक्लब उद्यानाची जागा देण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजनेतील जलकुंभाची उभारणीही उद्यानात करण्यात आली आहे. त्यामुळे उद्यानाला अवकळा आली आहे. उल्हासनगर मनपा प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या मेंदूत किती कचरा भरलाय, याची प्रचिती या उद्यानाची दुरवस्था पाहून येते.

मन की मैल ना धोयी…

उल्हासनगरात सद्या स्वच्छता अभियानाने जोर धरला आहे. ज्यांनी कधी स्वतःच्या धार्मिक दरबारासमोरील अस्वच्छतेबाबत किंवा एकूणच शहरातील समस्यांबाबत एक अवाक्षर काढलेले नाही, अशा व्यक्तींना महापालिकेने स्वच्छता दूत नेमले आहे. शहारात जाहिरातींमध्ये जोरदार स्वच्छता मोहिम सुरू आहे. पण बोटक्लब उद्यानासारखी सार्वजनिक ठिकाणं या मोहिमेपासून दुर्लक्षित आहेत.

सगळा हलकटपणा खाजगीकरणासाठी

उल्हासनगर महापालिका बोटक्लब उद्यानाची निगा राखू शकली नसती, असं नाही, पण ही जागा खाजगीकरणाच्या नावाखाली गिळंकृत करण्यासाठी बडी धेंडं टपलेली आहेत. लोकप्रतिनिधीही स्वार्थासाठी भूमाफियांसोबत आहेत. एकदा हा डाव कायद्याने वागा लोकचळवळीने उधळून लावला होता. मात्र, लोकप्रतिनिधींची लालसा संपलेली नाही. उद्यानाच्या खाजगीकरणाचा विषय कधीही डोकं वर काढू शकतो. अशा वेळी ही सर्व राष्ट्रशिल्पं उखडून फेकून द्यायला महापालिका मागेपुढे बघणार नाही. महापालिकेत सत्ता भाजपाची आहे आणि सद्यस्थितीत भाजपाची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

बोटक्लब युजर्स फोरमची घोषणा

कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी बोटक्लब युजर्स फोरमची घोषणा केली असून, हा नागरिकांचा फोरम उद्यानाच्या पुनर्जीवनासाठी कार्यरत राहिल. सद्या ती जागा ज्यांच्या ताब्यात आहे, त्यांच्याकडून ती ताबडतोब काढून घ्यावी, ही फोरमची पहिली मागणी असेल. उल्हासनगरातील कोणीही जागरूक नागरिक या फोरममध्ये सहभागी होऊ शकतात, असे आवाहन राज असरोंडकर यांनी केलं आहे.

admin

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!