होय, मुंबई आम्ही विकत घेतलीय !!

होय, मुंबई आम्ही विकत घेतलीय !!

होय, मुंबई आम्ही विकत घेतलीय !!

मुंबई नगरी ही पहिल्यापासूनच बहुभाषी असली आणि तिच्या उभारणीत नि जडणघडणीत मराठ्यांसह सर्व प्रांतीयांचा वाटा असला, तरी तिचे अव्वल भौगोलिक स्थान आणि प्राचीनत्व हे निखळ मराठी आणि मराठीच आहे.

महाराष्ट्राला गुजरातशी सयामी जुळ्यासारखे जोडून द्वैभाषिक राज्य चालवण्याचा केंदाचा हेका महाराष्ट्रीयांनी मोडून काढला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण केला. आणि गेली पन्नास वर्षे 'मुंबई कोणाची' हा प्रश्न सतत ऐरणीवर येत राहिला.

मुंबई फक्त मराठ्यांचीच नव्हे तर सगळ्यांची, इथपासून ते 'मुंबई तुमची, भांडी घासा आमची' म्हणण्यापर्यंत कटुता ताणली जात असते.

मुंबई हे दक्षिण आशियाचे इकॉनॉमिक हब होण्यापर्यंतची घोडदौड ही परप्रांतीयांच्या भांडवलामुळे झाली असे उदाहरणांसकट मांडले जाते. पैसा, भांडवल हे शब्द नुसते ऐकले तरी मराठी माणसाला विनाकारण हुडहुडी भरते.

किंबहुना पैसा आणि मराठी हे दोन विरुद्धार्थी शब्द असल्यागत आपली वाटचाल चालू असते. त्यामुळे भांडवलवाल्या अमराठी माणसांसमोर मराठी माणसे कायम न्यूनगंड घेऊन वावरत असतात. रस्त्यावरच्या राड्यांमागेही हाच न्यूनगंड असतो.

पण याच महाराष्ट्राने मुंबईसह स्वतंत्र राज्य म्हणून जन्माला येण्यापोटी गुजरातला चक्क कोट्यवधी रुपये मोजले आहेत, हे फारच कमीजणांच्या गावी असेल.

महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन स्वतंत्र राज्ये अस्तित्वात येणार ही काळ्या दगडावरची रेघ ठरल्यानंतर राज्यघटनेच्या ७व्या व ८व्या परिशिष्टात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या. कलम ४२(२), ४८(१) आणि ५१(५)अनुसार गुजरात राज्याची राजधानी विकसित करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या राज्याच्या कॅश बॅलन्स इन्व्हेस्टमेंट अकाऊंटमधून १० कोटी रुपये इतकी रक्कम देण्यात यावी असे प्रस्तावित करण्यात आले.

त्यानंतर गुजरात राज्याची वार्षिक तूट भरून काढण्यासाठी १९६० साली ६.०२ कोटी रुपयांपासून सुरुवात करून १९६९-७० पर्यंत १.१४ कोटी अशा क्रमाने रकमा द्याव्या, असे ठरले. याखेरीज १९६२-६३ पासून १९६९-७० पर्यंत ८ आथिर्क वर्षांत गुजरातला २८.३९ कोटी रुपये लाभ व्हावा असाही निर्णय झाला.

बॉम्बे रिऑर्गनायझेशन अॅक्ट १९६०च्या कलम ५२खाली महाराष्ट्राने गुजरातला १९६२-६३ साली ६१२ लाख, ६३-६४ साली ५८५ लाख, ६४-६५ साली ५०१ लाख, ६५-६६ साली ५२६ लाख, ६६-६७ साली ४३३ लाख, ६७-६८ साली ३४० लाख, १९६८-६९ साली २०९ लाख असे ३२ कोटी ६६ लाख रुपये दिले.

यात नव्या तरतुदीनुसार दिलेले ३८ कोटी धरून एकूण ६० कोटी ६६ लाख रुपये महाराष्ट्राने गुजरातला दिल्याची नोंद 'द गॅझेट ऑफ इंडिया एक्स्ट्रा ऑडिर्नरी'मध्ये आहे.

याचा अर्थ, मुंबईवरील ताबा राखण्यासाठी महाराष्ट्राला ६० कोटींची किंमत चुकवावी लागली आहे. होय, एका परीने मुंबई आपण विकत घेतलीय.

भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी झालेल्या फाळणीत पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यावे लागले, त्यावरून आजही एक वर्ग सतत विखारलेला असतो. इथे तर स्वतंत्र भारतातीलच एका राज्याने दुसऱ्याला ही किंमत मोजली आहे.

या मुंबईत कामगार, चाकरमानी, कारकून, कष्टकरी आणि निर्धन बुद्धिवादी इतकीच ओळख असलेल्या मराठी माणसाला कोणताच न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही.

मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आणण्यासाठी १०६ हुतात्म्यांचे रक्त तर आपण सांडले आहेच, पण ६० कोटी ६६ लाख रुपयेही मोजले आहेत.

 

 

 

प्रतिमा जोशी 

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता | पत्रकार | लेखक

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!