वामनदादा कर्डक : आंबेडकरी विचार नेमकेपणाने साकारणारी लेखणी !

वामनदादा कर्डक : आंबेडकरी विचार नेमकेपणाने साकारणारी लेखणी !

वामनदादा कर्डक : आंबेडकरी विचार नेमकेपणाने साकारणारी लेखणी !

लहानपणी गळ्यात संबळ अडकवुन गावभर तमाशाची गाणी गुणगुणारा हा आवाज. पुढे भिमगीतांना रक्तातला डीएनए बनवून मरेपर्यंत जगला. आजन्म आंबेडकरी विचारांवर निष्ठा जपणारे महाकवी वामनदादा कर्डक. आजही “चांदण्याची छाया”, ‘ पहाट झाली प्रभा म्हणाली ‘ या गाण्यांशिवाय डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची सुरुवात होत नाही.

बाबासाहेब आणि माईसाहेबांच्या माथ्यावर छत्री धरणं ते तब्बल सात वेळा भेटण्याचे भाग्य लाभलेला हा माणूस भीमदीवाना झाला नाही तर नवलच होतं, म्हणूनच काखेत तबला व डोक्यावर हार्मोनियम घेऊन दलित आदिवासी वाड्यावस्त्या तुडवत महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यांंत ते फिरला. परिवर्तनाचा विचार त्यांनी कव्वाली, भीमगीते, शाहीरी पोवाडे, लावणी, गजल, रुबाई, सिनेगीतांतून पोहोचवला.

वामनदादा वयाच्या १० व्या वर्षीच शाहीर घेगडेंंच्या नाशिक सत्याग्रह या पोवाड्याने प्रभावित होऊन सांस्कृतिक अंगाने आंबेडकरी चळवळीत सामील झाले. विधवा आई आणि बहिणीसह मुंबईतील शिवडीत पत्र्याच्या खोलीत वामनदादांंनी, खरं तर सिनेनट होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण गिरणी कामगार , कोळसा वेचणं, आईसफ्रुट चिक्की विकणं, टाटा कंपनीत मजदूर ते हा प्रवास मिनर्व्हा थिएटर, रणजीत , कारगार स्टुडिओत मेकअपमन पर्यंतच रेंगाळत राहिला.

एकदा बीडीडी चाळीत एकाचं पत्र वाचता आलं नाही. म्हणून व्यथित वामन दादांनी आपले अधिकारी देहलवींंकडून अक्षरज्ञान करून घेतलं.आणि, १९४३ रोजी राणीच्या बागेत पहिलं हिंदी विडंबन गीत लिहलं. इथूनच सुरुवात केलेल्या वामनदादांनी पुढे १० हजारांपेक्षा अधिक गाणी लिहिली. ते प्रत्येक गाणं तुफानातील दिवा ठरलं, ज्याने उपेक्षितांना चैतन्याचा उजेड दिला .

१९२० साली बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ काढले तेव्हाच्या कालखंडावर वामनदादा लिहितात,

मी मूकनायक, मी मुक्यांची वाणी,
मी मुक्यांची गाणी , मी मार्गदाता,
मीच गायक, मी मूकनायक’….

वामनदादांची लेखणी विद्रोह, डॉ बाबासाहेबांचे चरित्र, लोकभाषेतील रंजकता, प्रबोधन सांगतानाच भावूक कोमल भावनाही चितारते. तर मुलभूत हक्क मागतांना संतप्त होऊन,

सांगा आम्हाला बिरला,
बाटा, टाटा कुठे हाय हो,
सांगा धनाचा साठा अन्
आमचा वाटा कुठे आहे हो “

विषम व्यवस्थेला ठणकावून हा प्रश्नही विचारते. शोषितांच्या जगण्याची करुण कहाणी वदतांनाच त्यावर न्याय्य अधिकारांची दिशाही दर्शवतेय. वामन दादांंची लेखणी सांस्कृतिक वाटेने स्वतंत्र अभिव्यक्तीला व्यापक वाव देतेय.

अगदी साध्या शब्दात आणि लोक व्यवहारातील उदाहरणांनी प्रगल्भ जीवनदृष्टी व मूल्य दृष्टी वामन दादांनी आपल्या गाण्यांमधून दिलीय. त्यांची प्रत्येक रचना ही नवसमाज रचनेची नांदी सांगणारी आहे. वामनदादांंच्या याच प्रतिभेला प्रेरणा मानुन असंख्य कवी गायक शिष्य महाराष्ट्रात निर्माण झाले

दिग्दर्शक अनंत माने यांनी तर ” सांगते ऐका ” चित्रपटातील वसंत पवारांनी संगीतबद्ध केलेलं ,”अहो सांगा या वेडीला, माझ्या गुलछडीला “. हे गाणं तुटपुंज्या मानधनावर लिहून घेतलं. पुढील आणखी गाणी देतो म्हणून तीन महिने स्वतः मागे फिरवलं होतं. ही वामनदादांची उपेक्षा होती की मानेंची असुरक्षितता हे आजवर कळलंच नाही.

वामनदादांंना संत नामदेव, मानवमित्र, महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र सहित २५ हुन अधिक पुरस्कार मिळाले. नाशिक – बुलढाण्यात तर त्यांची नाणेतुलाही झाली. महाराष्ट्र शासन साहित्य संस्कृती मंडळावर तीन वर्षे सदस्यत्व लाभलं. मात्र शेवटी त्यांना आर्थिक विवंचनेतच मरावं लागलं. आजही त्यांचा वाॅचमन असलेला दत्तक मुलगा रवींद्र हा शासनाकडून मिळणाऱ्या सदनिकेची आस लावून बसलाय.

१५ ऑगस्ट १९२२ रोजी नाशिक च्या देशवंडीत जन्मलेला हा वादळवारा जन्मभर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारक विचारांचे संक्रमण करीत, सर्वंकष विषमता नष्ट करीत १५ मे २००४ रोजी दुपारी सव्वा दोन वाजता नाशिकमध्ये

चल झोप शांत आता ,
माझे मरण म्हणाले …

असं विश्वाला जगण्याचं सोप्पं तत्त्वज्ञान सांगत निरोप घेता झाला !

 

 

प्रफुल केदारे

लेखक पत्रकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते व कायद्याने वागा लोकचळवळीचे माध्यम समन्वयक आहेत.

MediaBharatNews

Related Posts
comments
  • Sachha karyakarta…dada was real oxygen of Ambedkar movement.

  • leave a comment

    Create Account    Log In Your Account    Don`t copy text!