विद्यार्थी : शिक्षकांच्याच पडछाया …

विद्यार्थी : शिक्षकांच्याच पडछाया …

विद्यार्थी : शिक्षकांच्याच पडछाया …

शिक्षक दिनाच्या निमित्ताने थोडासा साधलेला आपल्याशी संवाद. मी आनंदी आहे की मला शिक्षक होता आलं. मला नेहमीच वाटायचं की माझ्या मुलाला असे शिक्षक असते तर, या माझ्याच विचारातून माझ्या हातून उत्तम उत्तम विद्यार्थी घडत गेले आणि हे होत असताना माझ्यातला उत्तम शिक्षकही घडत गेला .

असं म्हणतात की मुलं आपोआप शिकतात. आपण फक्त मार्ग दाखवावा लागतो, त्यांना थोडंसं प्रेमानं घ्यावं लागतं. थोडसं त्यांच्या मनासारखं वागावं लागतं. असे शिक्षक मी स्वतः पाहिलेत .अशा शिक्षकांचा मी अनुभव घेतलाय. मुलांचा कुठेही गुणगौरव झाला, बक्षीसं मिळाली, तरीही शिक्षकाचं मूठभर मांस वाढते. इतके ते आनंदून जातात.

जशी आई घरात संस्कार करते तसेच शिक्षकसुद्धा शाळेत मुलांच्या आईचीच भूमिका निभावत असतात. त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न सतत करत राहतात. जोपर्यंत तो विद्यार्थी वर्गात आहे, तोपर्यंत तर त्याच्या प्रगतीसाठी सतत मागे लागतात. अनेक विद्यार्थ्यांना या गोष्टीला सामोरे जावे लागते.

सर्वांना समान वागणूक देणारे शिक्षक असतात. राष्ट्राचे भविष्य वर्गात घडत असतं म्हणतात ना, ते खरेच आहे. असे हे राष्ट्राचे भविष्य, भवितव्य घडवणारे शिक्षक विद्यार्थ्यांसाठी कायम झटतात.

जात-पात-धर्म या पलीकडे जाऊन शिक्षक मानवतेची शाळा भरवतात. प्रत्येकाला समान वागणूक देतात. मुलांच्या उपजत गुणांना वाव देतात आणि दुर्गुण त्यांच्यातून काढून टाकतात.

मुलांमध्ये कधी ते भेद करत नाहीत. मुलांना बोलते करणे यात शिक्षकांचा हातखंडा असतो. काही मुले बोलकी असतात, तर काही मुले अबोल असतात. मनातल्या मनात कुढत असतात. तो अबोलपणा घालवण्याचे काम शिक्षक करतात. वेळप्रसंगी एखाद्या मुलाने डबा आणला नसेल तर स्वतःचा डबा त्यांना खायला देण्यास सुद्धा ते मागेपुढे पाहत नाहीत.

आपल्या वर्गालाच आनंदाचे मळे, चैतन्याचे झरे करण्याचे काम शिक्षक करत असतात. अशा वर्गात शिकणारी मुले ही मोठी झाल्यावर कुठेही रस्त्यात भेटल्यावर पाया पडल्याशिवाय राहत नाहीत. शिक्षकाला स्माईल दिल्याशिवाय राहत नाहीत. शिक्षकाला भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसतो.

ही मुलं शिक्षकांचा आदर करतात ,भलेही काही वेळेस त्यांच्यावर शिक्षक काही कारणास्तव रागावलेले असतील, तरीही विद्यार्थ्याला कळते की, हे आपल्या भल्यासाठीच होते. हा राग त्यांच्या डोक्यात कधीच राहत नाही पुन्हा प्रेमाने तो शिक्षकांच्या जवळ येतो. शिक्षकसुद्धा त्याला प्रेमाने जवळ घेतात आणि समजावून सांगतात.

शिक्षकांच दिसणे, वागणे, बोलणे याचा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडतो. ओठांमध्ये गंमत गाणी आणि वाणी ज्यांची गोड आहे, असे शिक्षक मुलांच्या मनात कायम असतात. शिक्षकांना अनेकदा आठवणींची पुस्तके चाळावी वाटतात, तेव्हा त्यातील अनेक आठवणी वर्गातील मुलांच्या असतात.

आठवणींच्या पानापानातून मुले बोलतात. हे पुस्तक बंद करताना, शिक्षक मनातल्या मनात संवादतात. आता माझ्या या पडछाया मोठ्या झाल्या असतील ,अगदी उत्तुंग ! न मागता आशीर्वाद देणारे असे शिक्षक कधीकाळी वर्गातील मुलांना स्वतःच्या सावलीत वाढवणारे होते, हे विसरता येत नाही.

 

 

 

नंदा गवांदे

लेखिका शिक्षिका आहेत.

gawandenanda734@gmail.com

MediaBharatNews

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!