दादरा व नगर हवेली मधून शिवसेना उमेदवार कलाबेन डेलकर ह्या भाजपा उमेदवाराचा दणदणीत पराभव करून निवडून आल्या. त्यांच्या या विजयानंतर शिवसेनेने त्यांचे स्वागत करताना औक्षण केलं. रश्मी ठाकरे यांनी खासदार डेलकर यांना कुंकुमतिलक करून ओवाळलं. मात्र शिवसेनेची ही कृती सनातन्यांना चांगलीच झोंबलेली दिसते. विधवेला औक्षण करतात का, अशी गरळ भाजपाई ट्रोलर्सनी समाजमाध्यमात ओकली आहे.
कलाबेन डेलकर ह्या दिवंगत मोहन बेलकर यांच्या पत्नी. मोहन बेलकर दादरा व नगर हवेलीतील खासदार होते. ७ वेळा ते खासदार म्हणून निवडून आलेत. २०१९ चा त्यांचा विजय अपक्ष म्हणून होता.

फेब्रुवारीत त्यांनी मुंबईत एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. त्यांच्या पत्रात प्रफुल पटेल यांच्यासह कित्येक बड्या भाजपा नेत्यांवर व प्रशासकीय अधिकाऱ्यांवर छळवणुकीचा आरोप आहे. एका खासदाराच्या आत्महत्येचं प्रकरण असतानाही केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं. मुंबई पोलिस मात्र या आत्महत्या घटनेचा तपास करीत आहेत.
त्यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली. त्या ठिकाणी डेलकर यांच्या पत्नी कलाबेन यांना शिवसेनेने पाठबळ दिलं आणि त्या निवडून आल्या.
मात्र, आता शिवसेनेकडून त्यांचं औक्षण करण्यात आल्यानंतर डेलकर यांचं विधवेपण पुढे केलं जातंय. 'अहो विधवेला औक्षण करतात का कधी ? हिंदू परंपरा माहीत नाही आणि हे हिंदूंसाठी लढणार म्हणे !' असं खवचट ट्वीट शिवसेनेविरोधात करण्यात आलंय.
ज्या ट्वीटर अकाऊंटवरून आक्षेपार्ह व तितकीच संतापजनक प्रतिक्रिया दिली गेलीय, ते राजकीयदृष्ट्या संघभाजपा समर्थक आहे. शिवाय केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या कार्यालयाने फाॅलो केलेलं आहे.
अर्थात, या ट्वीटवर उत्तरादाखल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून, संघभाजपाचं हे बुरसट हिंदुत्व असल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी अकाऊंटधारकाला अक्षरश: ठोकून काढलं आहे.