तब्बल 23 वर्षानंतर पाखरांचा वर्ग पुन्हा भरला होता !

तब्बल 23 वर्षानंतर पाखरांचा वर्ग पुन्हा भरला होता !

तब्बल 23 वर्षानंतर पाखरांचा वर्ग पुन्हा भरला होता !

‘आज 6 वाजता झूम वर सगळ्यांनी भेटायचं’ असा मेसेज व्हॉटसअपवर आला आणि एक वेगळीच चमक चेहर्‍यावर चमकून गेली. डोक्यात अनेक विचार घोळत होते. तब्बल 23 वर्षानी… बापरे केव्हढा मोठा कालावधी जावा लागला एकमेकींना दिसण्यासाठी. आज बर्‍याच वर्षांनंतर एकमेकींना स्क्रीनवर दिसणार होतो. तेव्हा रोज कानात बसलेले आवाज आज व्हॉटसअपच्या माध्यमातून का होईना 23 वर्षानंतर ऐकणार होतो.

खूपच उत्सुकता लागून राहिली होती. कशा दिसत असतील सर्वजणी ? काय – काय परिवर्तन त्यांच्यात झालं असेल? की अजून तशाच असतील काहीशा समजदार, काहीशा अल्लड..

कधी एकदाचे ६ वाजतील असं झालं होतं. खरेदीला जायचं होतं, पण तो बेत मी रद्द केला, मैत्रिणींना भेटण्यासाठी..त्यांना भेटण्याची अशी संधी पुन्हा लवकर भेटणार नव्हती. मुलगा आणि नवरा दोघेही सांगत होते, मार ग गप्पा खुशाल, आम्ही दोघेजण नाही डिस्टर्ब करणार तुला.

कॉलेजचे ते दिवस डोळ्यासमोर तरळू लागले, ती एकत्र केलेली मजा, कधी थोडीशी लटकी – लटकी झालेली भांडणे, एकमेकींना वेळोवेळी केलेली मदत, स्टेजवर मॅडम नसताना त्यांच्या केलेल्या नकला, नाटकाच्या आणि नृत्याच्या केलेल्या तालमी, निरनिराळे प्रकल्प, त्यासाठी लागणारी मैत्रिणीची मदत, लेसन घेताना आणि लेसन घेण्याआधी भरलेली धडकी, लेसन झाल्यावर सोडलेला सुटकेचा श्वास, लेसन निरीक्षणाला चांगलेच शिक्षक येऊ देत म्हणून केलेली सामूहिक प्रार्थना, आज सारं सारं आठवल, आणि मग मन खूपच प्रसन्न होऊन गेलं..

झूम सुरू केल आणि अनेक वर्ष मनात साठवलेले पण नजरेसमोर नसणारे चेहरे पटापट जॉईन होत गेले .. आपापले विडिओ चालू झाले. एकमेकींना बघून सर्वच सुखावले. प्रत्येकीला काहीतरी बोलायच होतं. किती प्रश्न? किती उत्तर? याची गणतीच नाही.

प्रत्येकाचे चेहरे उजळलेले दिसत होते. बरेचसे परिपक्व आणि तरीही थोडे अल्लड भासत होते. आज चाळीशी पार झालेल्या माझ्या मैत्रिणी किती सुंदर दिसत होत्या म्हणून सांगू? ही सुंदरता त्यांच्या मनाची होती, प्रसन्नता होती, एकमेकींना भेटण्याची ओढ होती जी चेहर्‍यावर आली होती.

आज पुन्हा एकदा पाखरांचा वर्ग भरला होता आणि त्यांचा किलबिलाट सुद्धा सुरू होता. पाखरांची शाळा भरे व्हाट्सपवरती… काॅलेजच्या मैत्रिणी किती रमती गमती. किती प्रेमपूर्वक, आपुलकीने एकमेकांची चौकशी करत होतो. इथे उखाळ्या पाखाळ्या अजिबात नव्हत्या. कितीतरी सुंदर सुंदर आठवणी निघाल्या होत्या. वाटलं संपूच नये ही वेळ.

सर्व कशा टिपिकल शिक्षिका भासत होत्या , पण तरीही काही काळापुरत्या का होईना, त्या कॉलेजतरूणी झाल्या होत्या. प्रत्येकीच्या आवाजात एक वेगळाच भारदस्तपणा आलेला जाणवला. थोड्या थोड्या घाबरणाऱ्या आणि बाचकणार्‍या मुली सुद्धा आज बिनधास्त गप्पा मारत होत्या.

अरे हेच तर परिवर्तन होतं जे आज आपण अनुभवलं. पुन्हा एकदा भेटण्यासाठी आजची मिटींग बळेच संपवली. पण मला माहितेय की प्रत्येकीच्या मनात आताच्या आणि तेव्हाच्या सुंदर आठवणी सुगंधित झाल्या असतील.. आज खऱ्या अर्थाने मनमोगरा बहरला.

 

 

 

 

नंदा गवांदे

लेखिका मुंबईतील खाजगी शाळेत प्राथमिक शिक्षिका आहेत.

 

gawandenanda734@gmail.com

MediaBharatNews

comments
  • Khuuuuuuuuuup ch sundar lekh 👌🏻👌🏻👌🏻

  • सुंदर लेख 🌹🌹

  • खरंच आ नंदाचे डोही आज आनंद तरंगला.
    खूप छान लेखन.

  • Mayuri Alpesh Bodke

    July 31, 2021 at 2:48 pm

    खुप छान 👌👌

  • leave a comment

    Create Account



    Log In Your Account



    Don`t copy text!