स्त्रीयांची घुसमट वाढवणारं लाॅकडाऊन !

स्त्रीयांची घुसमट वाढवणारं लाॅकडाऊन !

स्त्रीयांची घुसमट वाढवणारं लाॅकडाऊन !

लहानपणी बाणी हा एक काव्यप्रकार ऐकला होता. पंढरीच्या पांडुरंगा मागणं एक वार…. जन्म बायकांचा नको वारंवार ! देव किती धावला माहित नाही. पण स्त्रीच्या वेदना कालही होत्या. आजही आहेत. उद्याही संपणार नाही. नुसती लाॅकडाऊनची नाही तर जन्मोजन्मीची ही घुसमट आहे.

2020 हे वर्ष अतिशय घातक ठरले ते कोरोना व्हायरसमुळे. संपूर्ण जगभराची झोप उडवणारा हा रोग. आधी चीनमधील वुहानमध्ये आणि मग तेथून जगभरात इतक्या वेगात कधी पसरला ते कळले सुद्धा नाही. जणू घराचा सदस्य झाला.

आख्खं जग लाॅकडाऊनमधे गेलं. तोच एक अखेरचा पर्याय होता. लाॅकडाऊनचा पर्याय आपल्या भारत देशानेही स्विकारला. 22 मार्च ला रात्री 9 वाजता बातम्यांत लाॅकडाऊनची बातमी सांगण्यात आली. तेव्हा मात्र भारत देश प्रत्येक घराघरात निद्रिस्त, निष्क्रिय झाल्यासारखा वाटू लागला.

आतापर्यंतची कधीही न झोपणारी शहरे माणसांविना पोरकी दिसू लागली. चिटपाखरूही रस्त्यावर न दिसल्याने मांजरी आणि कुत्रीही दु:खाने विव्हळू लागली. सर्वजण आपल्याच घरात बंदिस्त झाले. काहीजण परगावी अडकले गेले, ते तेथेच अडकून राहिले. तेव्हापासून सुरु झाली, घर घर की कहाणी. पण प्रत्येकाची थोडी- थोडी वेग-वेगळी…

सुरूवातीला सर्वकाही अलबेल वाटणारं नंतर मात्र स्त्रियांसाठी जाचक वाटू लागलं. 24 तास सर्व कुटुंब एकत्र, एकाच छताखाली. सासू-सासरे, मुले, नवरा असा सर्वच परिवार. काहीची तर घरही लहान. एक सून म्हणून, आई म्हणून, बायको म्हणून प्रत्येक घरातली स्त्री रोज खपत होती. प्रत्येकाच्याच फर्माईशी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होती. कारण नोकरीच्या निमित्ताने बाहेर जाणारी स्त्री आता अचानक 24 तास घरातल्याच्या सेवेसाठी आयतीच मिळाली होती.

रोज रोज नव्या पदार्थांची फर्माईश पूर्ण करतच होती पण त्यात आणखीन भर पडली ती धुणीभांडी, साफसफाई, बाहेरून आलेल्या वस्तू निर्जंतुक करून ठेवणे. या सगळ्यात तिचा दिवस कुठून सुरुवात होत होता आणि कुठे संपत होता, ते तिलाही समजत नव्हतं.

स्वतःसाठी तिला स्वतंत्र वेळच मिळेनासा झाला. बरं तोंडातून ब्र काढण्याची पण सोय नाही. लाॅकडाऊनमधे स्त्री शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या पिचलीच. नोकरीवर जाऊन आपण घरातलीही कामे करत होतो, पण इतके दमत नव्हतो, जेव्हढं आता थकायला होतंय ; याची जाणीव तिला अस्वस्थ करू लागली..

तिची घुसमट होऊ लागली. ना एकांत, ना निवांत अशी अवस्था झाली. तिच्या भाव-भावनांना घरात जणूकाही जागाच उरली नाही. 24 तास खपूनही घरातल्याचे समाधान होईना. त्यात रोजच्याच टिव्हीवरील कोरोनाच्या बातम्या मनातली भिती वाढवत होत्या. घराबाहेर पडायला संधी नाही. मित्र, मैत्रिणी, नातलग, जिवलग कुणीच जवळपास नाही.

घरातल्यांचं नाही ऐकलं की वाद झालेच म्हणून समजा. नवरा सतत मोबाईल वर, एकतर ऑनलाईन काम किंवा नुसतेच व्हाटसअप उद्योग. सासू-सास-याच्या कटकटी, असंच कर नी तसंच कर. मुलांची आपापसातील भांडणे, त्यांचे मोठमोठ्या आवाजातले खेळ ,डोकं भंडावून सोडत होते. पण इलाज काहीच नव्हता..

पुष्कळशा घरांमध्ये हिंसेचे प्रकार वाढू लागले. स्त्रियांनी कोणत्याही गोष्टीचा प्रतिकार केला की झालेच वाद म्हणून समजा. अनेक घरात तर घटस्फोटांचे प्रकार वाढले. ज्या महिला घटस्फोटित होत्या, त्यांना या काळात पोटगीही न मिळाल्याने घर चालवणं अवघड झालं.

ज्या घरी रोजगार राहिला नाही तिथे भांडणं वाढली. कोणी समजूनच घेईना. नव-यासोबत चार प्रेमाचे शब्द एकांतात बोलावेत तर तेही घडेना. एकांतच उरला नाही तर संवाद कुठला. एकमेकांवर कुरघोडी होऊ लागल्या. तोही समजून घेईनासा झाला. सतत त्याचं आपलं घरीच आहेस ना, मग काय झालंय करायला? तिची खरं तर कामवालीच करून टाकली.

जास्त वेळ मुलांबरोबर ऑनलाईन अभ्यासाला बसणं, त्यांना समजून सांगण हा एक रोजचा कार्यक्रम सुरू झाला. ही जबाबदारीही जास्तीत जास्त तिच्यावर येऊन पडली. एखादीचा मुलगा, मुलगी किंवा नवरा अत्यावश्यक सेवेत आहेत आणि त्यांना रोजच घराबाहेर पडावं लागत आहे. अशा जणींचा तर रोजचा जीव धाकधूक होई. बाहेर पडावं तर लागणारच पण घरी बसा म्हणूनही सांगता येईना आणि जा म्हणूनही सांगता येईना.

काहीजण अत्यावश्यक सेवेत रूजू होते, ज्यांना अनेक दिवस घरीच यायला मिळालं नाही, त्यांच्या बायकांनी तर कित्येक दिवस नव-याचे तोंडही पाहिले नव्हते . त्यांची एक वेगळीच घुसमट होत होती. रोजच्या रोज जीव टांगणीला. काहीजणी वर्क फॉर्म होम करत होत्या ,घर सांभाळून !

काहींच्या तर नोक-या सुटलेल्या पगारपाणी बंद. पैसा हाताशी नाही. घर कसं चालवायचं, हा मोठा प्रश्नच निर्माण झाला. बऱ्याच जणींनी स्वत:चे दागिने मोडले. कोणी पी.एफ. काढला. काहींनी एफ.डी मोडीत काढून घरखर्च भागवण्यास सुरुवात केली. पण संसाराची जुळवाजुळव काही करता येईना.

गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय घरातल्या प्रत्येक स्त्रीची थोडीफार हिच अवस्था. मन मोकळं करण्याची सोयच उरली नाही. जिथे कामवाल्या होत्या, त्या बंद झाल्याने तर आणखीनच बिकट अवस्था झाली. घर कामाची सवय नाही. स्वयंपाक बनवण्याची पंचायत होई, नवरा तिला समजून घेण्यात असमर्थ ठरे.

नोकरीचा जो ऐट होता तो कधीच निघून गेला होता. आता त्या सर्वसामान्य टिपिकल स्त्रियांसारख्या भासू लागल्या.

घरकामाने हैराण झाल्या होत्या. मनाविरुद्ध जगावं लागलं की, घुसमट होऊ लागते. असेही काही प्रसंग असतात की ते आपण कोणाजवळ बोलूच शकत नाहीत.

समजून घेणारे कमी आणि उलट अर्थ घेणारे आपल्या अवतीभवती असल्यास आपलं जगणं मुश्किल झाल्याशिवाय राहत नाही. मन कोमल आहे, तस कणखरही आहेच, पण या दोन्ही भावना गळून पडतात, जेव्हा आपल्याला कोणीच समजून घेत नाहीत. जीव एकटा पडतो, मन बावरून जातं, घाबरून जातं. कोणाशी कसं वागावं तेच कळत नाही. ही वाईट अवस्था मनाची होते.

लाॅकडाऊनची झळ प्रत्येकालाच आपआपल्या परिने सोसावी लागली. पण ही घुसमट काहींच्या आत्महत्येस प्रवृत्त करणारी ठरली. एखाद्याचा नाहक जीव जावा याच्या इतकं वाईट असूच शकत नाही…अशा घुसमटीतही ज्या ज्या स्त्रिया विचलित न होता संयमानं घर चालवत होत्या..घरपण जपत होत्या त्यांना सॅल्युटच !

 

 

 

नंदा गवांदे

लेखिका शिक्षिका आहेत.

gawandenanda734@gmail.com

 

 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!