मावळतीची सोनेरी किरणे …!

मावळतीची सोनेरी किरणे …!

मावळतीची सोनेरी किरणे …!

२२ जून २०२२ चा दिवस संस्मरणीय असाच ठरला. नारायण पंढरीनाथ पाटील यांचा सेवानिवृत्तीचा हा दिवस. प्रयोगशाळा सहाय्यक या पदावर ते कार्यरत होते. इतका सुंदर सोहळा याची देही याची डोळा अनुभवता आला. नियोजनबद्ध कार्यक्रम किती सुंदर असतो याची प्रचिती आली.

नोकरीतून निवृत्त होत असताना माणसाला नेमके काय हवं असतं ते हा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहत असताना जाणवलं. आजपर्यंत आपल्या कामातून आपण कमावलेलं नाव, किती मोठं आहे याची प्रचिती अनेकांच्या भाषणांतून कळतेच. काम कोणतं का असेना, पद कोणतं का असेना, ते तितकं महत्वाचं नाही ; तर महत्वाचं हे आहे की, तुम्ही ते कसं पार पाडता?

आपल्या जवळची किती माणसं खरोखरीच आपल्या किती जवळ आहेत हे समजतं. इतक्या मोठ्या प्रमाणावर सेवानिवृत्त कार्यक्रमाला हितचिंतकांची उपस्थिती असणं म्हणजे जवळची माणसं आपल्यावर किती प्रेम करतात याचं ते प्रशस्तिपत्रकच असतं.

अख्खा हॉल माणसांनी खचाखच भरून जाणं, जिवलगांचं आपल्या विषयी भरभरून बोलणं. आपसूकच त्याच्या प्रेमाच्या गोड आठवणींनी आपला ऊर दाटून येणं. हे काही नुसतं एकदा-दोनदा चांगल वागून अनुभवायला मिळत नाही. त्यासाठी अखंड सेवेचं व्रतच घ्यावे लागतं. आपल्या कामाशी एकनिष्ठ राहून मेहनत घ्यावी लागते. नातं हृदयातून जपावं. कोणताही भेदभाव न करता, कामचुकारपणा न करता काम मनापासून करावं लागतं. हे जाणवतं.

"याचसाठी केला होता अट्टाहास" अस म्हणावंस वाटतं जेव्हा इतका सुंदर सोहळा आपल्यासाठी पार पडत असतो. खूप सुखावून जातो तो क्षण जो कानात सांगून जातो, "ये, हे सारं तुझ्याचसाठी बरं का"?

जिथे आपण मनापासून काम करतो खुद्द त्यांनीही आपली इतकी छान दखल घेणं हे मनोमन आनंद देऊन जातं. त्यावर कहर म्हणजे त्यांनी आपणास आणखी सेवा देण्याची मागणी करणं. हीच तरी खरी पोचपावती आपल्या कामाची.

शरीर जरी थकलं तरी मन मात्र थकत नाही, अशा व्यक्तींचं. कायम फ्रेश असतात अशी माणसं. अशी माणसं कागदावरून जरी निवृत्त झाली तरी वेगवेगळी कामे सुरूच ठेवतात.

कुटुंबियांनीसुद्धा इतकं भरभरून कौतुक करावं हेच खरं मोठं बक्षीस आहे, त्यांच्या चांगुलपणाचं. असं एकत्र येऊन संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाने सहभागी व्हावं, यातून कुटुंबाच आपलंपण जाणवतं.

अखेरीस इतकंच म्हणावसं वाटतं....
"चलते, चलते,
मेरा ये गीत याद रखना,
कभी अलविदा ना केहेना..

मावळतीचा सूर्य छान प्रकाश घेऊन येतो. त्यालाच आपण संधीप्रकाश म्हणतो. जो वातावरण सुंदर पद्धतीने सजवतो. एक वेगळीच छबी वातावरणाची मनामनात आनंदलहरी निर्माण करते.

पाटील सर प्रयोगशाळा सहाय्यक होते. कामाशी एकनिष्ठ होते. हे माझं काम नाही ते मी करणार नाही अशी त्यांची वृत्ती नव्हती. शाळा आपली. विद्यार्थी आपले. मग जी कामं शक्य होती ती त्यांनी मनापासून केली. मुलांपासून शिक्षकांपर्यंत नारायण पाटील सर्वांना हवेहवेसे होते. वरिष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्वांच्याच जवळून परिचयाचे असणारे.

मावळतीला तर प्रत्येकाला जायचंच आहे. पण आपल्या आयुष्यातील सोनेरी किरणे पुन्हा एकदा चकाकली पाहिजेत अशी उदंड इच्छाशक्ती सरांची आहे.

सेवानिवृत्तीच्या दिवशी या सोनेरी किरणांचे अनेक साक्षीदार सरांना निरोप द्यायला उपस्थित होते. त्यात मी एक. आपल्या नशीबी ही सेवानिवृत्तीची श्रीमंती असेल का? हा प्रश्न मनात येताना हा लेख पूर्ण होतोय. मावळतीच्या किरणांना नमस्कार करुन !

 

 

 

नंदा गवांदे

लेखिका शिक्षिका आहेत
gawandenanda734@gmail.com

MediaBharatNews

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!