तुझं असणं, तुझं हसणं…!!

एखाद्याचं हसणं किती जिवांना प्रेरणा देऊन जातं, ते त्या व्यक्तिला सुद्धा कळत नाही..! आपलं असणं म्हणजे नुसत जिवंत राहणं नाही.. त्यासोबत आपल अस्तित्व सिद्ध करावं लागतं.. कायमच चेहरा पडलेला असेल तर तुमच्या जवळ कुणीच येणार नाही.. पण जर तुमच्या चेहर्‍यावर थोडसं हसू असेल, तर मात्र लोक तुमच्या भोवती गिरक्या घेताना दिसतात..

एखाद्याचं खळखळून हसणं इतकं भाव खावून जातं की अनेकदा ते आठवूनच हसू फुटतं.. पुन्हा एकदा शरीरभर उत्साह संचारतो.. असे हास्याचे झरे आपल्या अवतीभवती असले की जीव रमून जातो. त्यात सुरेख माहोल तयार होतो..

असा माहोल तयार करणारे फार कमी लोक असतात.. ज्यांच्या असण्याला आणि हसण्याला एक सुंदर अर्थ प्राप्त होतो..जे अर्थ दुसर्‍यांच्या जगण्याला निस्वार्थ मदत करतात..

जगण्याला पैलू पाडते मैत्री...आ-नंदाचे डोही या सदरातील मागचा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा !

'तुझ हसणंच असण्याचं प्रमाण आहे.. इतरांना जागृत करणारं देवस्थान आहे'.. असं म्हणावसं वाटतं, जेव्हा असे लोक आपल्या सोबत कायम असतात. खूप छान असतं, जेव्हा ही नाती आपली असतात. अशी गुणी नाती मिरवायलाही अभिमान वाटतो. चारचौघात मान मिळतो.

त्या खळखळून हसण्यावर आपला अधिकार गाजवावासा वाटू लागतो. हे सारं काही आपल्यासाठीच आहे, असा भास होतो. आपण आनंदी असावं म्हणूनच उधळून दिलेला असतो त्यांचा आनंद, त्यांनीच आपल्यासाठी. त्यांच्या हसण्याने सगळं वातावरण प्रफुल्लित होऊन जातं..

नंदा गवांदे यांचे यापूर्वीचे प्रकाशित लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा !

संपूर्ण सभेवर त्यांचंच राज्य पसरतं .. प्रत्येकाच्या मनात एक छोटंसं घर करून जातं. कानात त्यांच्या हसण्याचा गुंजारव सुरूच राहतो. कधी एकटं असताना तर कधी अनेकजण असतानासुद्धा हळूच ते हसणं आठवलं तरी चेहर्‍यावर प्रसन्नता पसरते. मग मन ते हास्याचे झरे आटू नयेत, म्हणून प्रयत्नशील होतं..

त्यांच्या हसण्यालाच असण्याची खूप मोठी किंमत असते. त्यांनाच देवाने बहाल केलेली देणगी असते. मौल्यवान असतात, अशी माणसं जी खळखळून हसू शकतात. त्यांच्या असण्यालाच हसण्याच कोंदण आहे. म्हणूनच तुझ असणं, तुझ हसणं आम्हा सर्वांसाठी महत्त्वाचं आहे..

खळखळून हसणा-या सर्वांनाच समर्पित..!

 

 

नंदा गवांदे

लेखिका शिक्षिका आहेत.
gawandenanda734@gmail.com


MediaBharatNews

comments
  • श्री.तुकाराम गायकर

    October 6, 2021 at 10:34 am

    खूप छान लेखन

  • BrandBond Nilesh B+

    October 6, 2021 at 2:55 pm

    स्मित हास्य असो की अगदी हसण्याचा मनसोक्त खळखळाट… दोन मनांमधील अंतर कमी करतं ते हास्य… हास्य म्हणजे जगातील एकमेव भाषा जी प्रत्येकाला कळते आणि भावते… छान सुंदर लेख… धन्यवाद!!!

  • leave a comment

    Create Account



    Log In Your Account



    Don`t copy text!