लता मंगेशकर : सिनेगायकीतली हुकुमत

लता मंगेशकर : सिनेगायकीतली हुकुमत

लता मंगेशकर : सिनेगायकीतली हुकुमत

मध्यंतरी रानू मंडल या गायिकेला सल्ला देण्यावरून लता मंगेशकर यांना ट्रोल करण्यात आलं. लता मंगेशकरांनी खरंच काही प्रतिक्रिया दिली होती का, माहित नाही, आणि ते तपासायला इथे कोणाला वेळही नाही. जे काही तथाकथित वक्तव्य वाचनात आलं, त्यानुसार, लता मंगेशकर म्हणे म्हणाल्या की नक्कल करू नये, स्वत:ची ओळख निर्माण करावी. समजा, असं बोलल्या असतील लता मंगेशकर तर त्यात खटकण्यासारखं काय आहे ? कोणीही कोणाची नक्कल करू नये आणि आपली स्वतःची ओळख निर्माण करावी, हा खरंतर एक चांगला सल्ला आहे. माझे अनेक मित्र मला हा सल्ला सातत्याने देत असतात.

काही लोकांनी रानू मंडलमुळे लता मंगेशकरांचा जळफळाट झाला, अशा आशयाच्या पोस्ट केल्या. या पोस्ट वाचून खरंच करमणूक झाली. विषयातलं आपल्याला कळत असो वा नसो, एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात आकस असला की कुठल्याही प्रकारचा विवेक न बाळगता प्रतिक्रिया देणं हा समाज माध्यमाचा एक संकुचित स्वभाव बनून गेला आहे.

लता मंगेशकर वयाच्या तेराव्या वर्षापासून गाताहेत. हिंदी सिनेसृष्टीत प्रदीर्घ काळ टिकून राहणं हे केवळ वशिलेबाजी, दुसऱ्यांची अडवणूक किंवा जातीय वर्चस्व यामुळेच शक्य होऊ शकत नाही. त्यासाठी ते नाणं तितकं खणखणीतही असावं लागतं. लता मंगेशकर यांच्याकडे ती गायकी गुणवत्ता नक्कीच आहे.

लता मंगेशकर यांची मराठी भावगीतं, भक्ती गीतं, वेगवेगळी चित्रपट गीतं जे सतत ऐकतात, त्यांना त्यातल्या वैविध्याचा आनंदानुभव चांगला ठाऊक आहे. लता मंगेशकर यांच्या गाण्यात एक स्पष्टता आहे, जी शेकडो गायिकांना ऐकल्यानंतरसुद्धा अभावानेच आढळते. गाण्यातला अर्थ, शब्दांचं वजन आणि भाव अचूकपणे देण्याचं सामर्थ्य लता मंगेशकर यांच्या गायकीत आहे आणि त्यामुळे ती गाणी थेट आपल्या हृदयाला भिडतात. लता मंगेशकर यांची गायकी आपल्याला भारून टाकते.‌

गायकीचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येकजण आपापल्या आवडीप्रमाणे संगीत ऐकत असतात. पण सिनेमागीतांच्या बाबतीत बोलायचं झालं तर लता मंगेशकर यांना तोड नाहिये. त्यांची सिनेसंगीतावर हुकुमत आहे, म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.

राहता राहिला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा, सामाजिक भूमिकांचा प्रश्न, तर त्यामुळेही लतांच्या गाण्यांचं रसिकांच्या आयुष्यातलं महत्त्वं कमी होतं, असं मला वाटत नाही. मतभेदांसहित एखाद्याची गुणवत्ता आपल्याला खुल्या दिलाने स्वीकारता आली पाहिजे.‌

मी पाहिलंय की मुंबई मेट्रोच्या आरे कारशेडवरून अमिताभ बच्चनला ट्रोल करणाऱ्या लोकांनी लता मंगेशकरांच्या कारशेडविरोधातील आंदोलनाला समर्थनाचं कौतुक केलं नाही. पूर्वग्रहदुषितपणात नि:पक्ष मूल्यमापन होत नसतं. कट्टरतावादात विवेकी विचारप्रक्रियाच हरवून जाते.

इथे संपूर्ण चांगलं किंवा संपूर्ण वाईट कोणी नसतं. तुमच्यातल्या चांगुलपणाने वाईटावर मात केली तर तुम्हाला लोक चांगलं समजतात आणि वाईटाने चांगुलपणावर मात केली, तर लोक तुम्हाला वाईट समजतात.‌

असो. सांगायचं इतकंच होतं की लता मंगेशकर ह्यांच्याशी असलेल्या वैचारिक मतभेदांसह मला त्यांच्याबद्दल आदर आहे, त्यांची गाणी मी आवडीने ऐकतो आणि लता मंगेशकर ह्या निश्चितच माझ्या आवडत्या गायिका आहेत.

आज लता मंगेशकर यांचा वाढदिवस. त्यांना खूप खूप सदिच्छा !!! त्यांना दीर्घायुष्य लाभो.

– राज असरोंंडकर

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!