नगररचनाकार प्रकाश मुळ्येंना कोणाचे अभय ?

नगररचनाकार प्रकाश मुळ्येंना कोणाचे अभय ?

नगररचनाकार प्रकाश मुळ्येंना कोणाचे अभय ?

उल्हासनगर महानगर पालिकेचे नगररचनाकार प्रकाश मुळ्ये यांना वाटतंय की आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना गणपतीची सोन्याची मूर्ती काय भेट दिली, जणू मुख्यमंत्र्यांना विकतच घेतलंय. मुख्यमंत्र्यांच्या कानावर त्यांचे स्थानिक चमचे किती सत्य परिस्थिती घालतात माहित नाही, पण मुख्यमंत्र्यांना हे स्पष्टपणे कळवण्याची वेळ आलीय की तुम्ही प्रतिनियुक्तीवर बेकायदेशीररित्या पाठवलेल्या अधिकाऱ्यांनी महानगरपालिकांत धुडगूस घातलाय. त्याची जबाबदारी नगरविकासमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपल्याला घ्यावी लागणार आहे.

प्रकाश मुळ्ये हा व्यक्ती कमालीचा मग्रुर आहे. या व्यक्तीने बिनधिक्कतपणे विकास नियंत्रण नियमावली धाब्यावर बसवून इमारतींचे बांधकाम आराखडे मंजूर केलेत. अशा प्रतापांसाठी शासनानेच नेमलेल्या चौकशी समितीने मुळ्येंना दोषीसुद्धा ठरवलंय, पण मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे की सोन्याच्या मूर्तीचा, कळायला मार्ग नाही, मुळ्ये बिनधास्त आहेत.

वाट्टेल त्या नोटिसा जारी करणे आणि अंगलट आल्यावर त्या तितक्याच कोडगेपणाने मागे घेणे यात मुळ्येंचा हातखंडा आहे. शासन एका बाजूला उल्हासनगरची अनधिकृत बांधकामे नियमित करून विकासाचा मार्ग खुला केल्याचं श्रेय घेतंय आणि दुसऱ्या बाजूला मुळ्येसारख्या अधिकाऱ्याला पाठीशी घालून त्याच शहराला अधिक संकटात लोटतंय.

या मुळ्येचे प्रताप असे की या माणसाने नगररचना विभागात स्वत:च्या मनमानीने पाच पाच खाजगी व्यक्ती कामाला ठेवल्या होत्या. त्यांचा पगाराचा भार मुळ्ये स्वत: वाहत होता !! म्हणजे मुळ्येचा खिसा किती मजबूत असेल याची कोणालाही कल्पना यावी. त्यातला राहुल जोते हा मुख्यमंत्र्यांचा निकटवर्तीय आहे.

अर्थात, जोतेच्या काळ्याकांड्या मुख्यमंत्र्यांना ज्ञात आहेत की तो त्यांना अंधारात ठेवून उल्हासनगर महानगरपालिकेतील नगररचना विभागात बाॅसिंग करत होता, हे अजून गुलदस्त्यात आहे.

अशी पाच पाच माणसं अनेक महिने महापालिकेत रोजच्या रोज येणं, टेबलं बळकावणं, फाईली हाताळणं, आलेल्यांशी मनपा कर्मचारी असल्याचं भासवून संवाद साधणं, निर्णय घेणं महापालिका आयुक्तांची मूकसंमती असल्याशिवाय शक्य नाही. तक्रारी होऊनही आयुक्तांनी बेजबाबदारपणे त्याकडे दुर्लक्ष केलं‌. तक्रार करणारे पत्रकार किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना मुळ्ये धमकावतात, अशी उदाहरणं आहेत. कायद्याचा धाक नाही, कारवाईची फिकीर नाही, असं मुळ्येंचं वर्तन आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील , राष्ट्र निर्माण पार्टीचे शैलैश तिवारी आणि राहुल काटकर यांनी बोगस कर्मचारी रंगेहाथ पकडून दिले, पण आयुक्त अजीज शेख हातावर हात ठेवून आहेत.

औपचारिकता म्हणून बोगस कर्मचाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार देऊन त्यांना बळीचा बकरा बनवण्यात आलंय, पण मुळ्येला फक्त तकलादू नोटीस बजावण्यात आलीय. नगररचनाकाराचा पदभार तसाच ! भ्रष्टाचाराचा धांगडधिंगा जैसे थे सुरूच !

मुळ्येची उल्हासनगर महानगर पालिकेतून त्वरीत उचलबांगडी झाली पाहिजे, मुळ्येचं निलंबन होऊन त्याची चौकशी सुरू झाली पाहिजे आणि सोबत फौजदारी कारवाई केली गेली पाहिजे, ही ॲड. स्वप्नील पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मागणी आहे.‌

त्या मागणीसाठी ॲड. पाटील आणि सहकारी गुरूवार, ३१ ऑगस्ट, २०२३ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करताहेत.‌ या आंदोलनाला कायद्याने वागा लोकचळवळीचा पाठिंबा आहे.

जी कारवाई सरकारने स्वत:हून करायला हवी, किंबहुना जे सरकारचं कर्तव्यच आहे,  त्यासाठी सर्वसामान्यांना उपोषणासारखे मार्ग अवलंबावे लागत आहेत. भाजपा कार्यकर्ता नंदू ननावरे आत्महत्या प्रकरणातील आरोपींवर कारवाईसाठी त्यांच्या भावाला बोट छाटून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेट म्हणून पाठवावं लागलं. आम्हीही तसं करावं का, असा सवाल उद्विग्नपणे ॲड. स्वप्नील पाटील यांनीही केला आहे.

एकंदरीत 'बाळासाहेबांचं हिंदुत्व, दिघेंचं हिंदुत्व' म्हणत असं हे 'गतीमान' सरकार सध्या राज्यात कार्यरत आहे.

 

 

राज असरोंडकर

संपादक, मीडिया भारत न्यूज | संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ

mediabharatnews@gmail.com

MediaBharatNews

Related Posts

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!