पावसाळी पडझडीला जबाबदार कोण?

पावसाळी पडझडीला जबाबदार कोण?

पावसाळी पडझडीला जबाबदार कोण?

चार दिवस मजबूत पाऊस लागतोय मुंबईत.. अजून दोन दिवस पडेल. नंतर सध्याच्या पावसाच्या मुड पाहता परत सणसणीत #ऊन पडेल. असं पावसानंतर ऊन पडलं की मुंबईचे ज्या जूनाट वस्त्या व अस्ताव्यस्त बांधले गेलेले भाग आहेत तिथं इमारती कोसळण्याची १००% शक्यता आहे. नंतर पुन्हा चालू होईल..याला जबाबदार कोण..त्याला जबाबदार कोण…जबाबदार कोण.. ?

उगा कोणतरी दोन चार जण निलंबित होतील. पोलीस चौकशी लावली जाईल. लोकांना #न्याय मिळाल्याचा भास होईल. मिडीयाला न्याय मिळवून दिल्याचा भास होईल. तशा ब्रेकींग चालतील. मृतांच्या नातेवाईकांना सरकारी #मदत जाहीर होईल. नातेवाईक खूष होतील. समाजसेवकांचे बॕनर लागतील. परत पाऊस पडेल. नंतर ऊन पडेल. मग इमारती पडतील. पुन्हा चालू होईल..याला जबाबदार कोण..त्याला जबाबदार कोण..? हवामानाचं चक्र जितकं नियमित तितकंच हे चक्रही नियमित.

स्थापत्य अभियांत्रिकी नावाची एक गोष्ट असते. त्यात त्या इमारतीचा वापर, वस्तू आणि माणसांचं वजन, हवा पाऊस भूकंप अशा नैसर्गिक घटकांचा विचार करून सुरक्षित वास्तू बांधण्याचा विचार केला जातो. हा विषय झोपडपट्टी व जून्या मेंटेनन्स न केलेल्या इमारतींना लागू होत नसतोय. साधारण अनुभव असलेला कोणीही सोम्यागोम्या उठतो आणि झोपडीवजा इमारत बांधून मोकळा होतो. या धोकादायक इमारतींमुळे पहीला बळी जातो तो अभियांत्रिकी तत्वांचा. बाकी सारं नंतर.

पावसानंतर कडकडीत ऊन पडल्यावर धोकादायक इमारती का कोसळतात याची अभियांत्रिकी कारणं अनेक आहेत. पहीलं म्हणजे इमारत बांधताना भिंतींसाठी जी वीट वापरली जाते तिची पाणी शोषून घेण्याची क्षमता वजनाच्या २०% पेक्षा जास्त असू नये असा प्रघात आहे. हे प्रमाण पण बरंच जास्त आहे खरंतर. म्हणजे १००० किलो वजनाच्या वीट बांधकामात २०० किलोपर्यंत पाणी घूसलं तरी चालतंय असं आपण म्हणतो. तरीही भिंतीना संरक्षण देण्यासाठी आपण प्लास्टर, पेंट वापरतो. हे संरक्षण आपल्याला धोकादायक इमारतींमध्ये कधीच दिसणार नाही. शिवाय बांधकामात वापरलेल्या वीटा फारच ढिसाळ व कच्च्या असतात. कारण, बांधणाऱ्यांना तेच परवडतंय. जेव्हा अचानक ऊन पडतं तेव्हा वीटेत घूसलेलं पाण्याची वाफ व्हायला सुरूवात होते. तापमानातील फरकामुळे आम्ही ज्याला temperature stress म्हणतो त्या प्रकारचा ताण तयार होतो. या ताण पूर्ण इमारतीमध्ये अनियंत्रित असेल आणि तर इमारतीची फ्रेम असंतुलीत होते. भेगा पडतात आणि इमारत कोसळण्याची शक्यता वाटते.

ज्या इमारतीची भार पेलण्याची क्षमता कमी झालेली असते तिच्यात दर १ हजार किलोमागे पावसाच्या पाण्याचं २०० – ३०० किलो वजन वाढलं तर दुसरं काय होणार ?

घरात दाटीवाटीनं कोंबलेली माणसं, आवश्यक अनावश्यक सामानाची जडशीळ अडगळ, अभियांत्रिकी तत्व फाट्यावर मारून बांधलेल्या वास्तू…यांना गरीब नवाझांचं संरक्षण मिळतंय. कारण, वापरकर्ते मतदार आहेत.

या अनधिकृत बांधकामावर कारवाई करायला गेलेल्या अभियंत्यांना पोलीस संरक्षण वेळेवर मिळत नाही. पोलीस सुद्धा जिथे जायला बिचकतात अशा भागांमध्ये या धोकादायक बांधकामांचं प्रमाण जास्त आहे. “डोंगरी ते दुबई”सारखी कितीतरी पुस्तकं, अंडरवर्ल्डच्या पैशांवर पोसलेलं, गुन्हेगारीची भलामण करणारं तुमचं बॉलीवूड अशा अनेक गोष्टी चित्रित करतंच की..

‘मुन्नाभाई’ मध्ये बीएमसीच्या एका अधिकाऱ्याला मुन्नाभाई त्रास देतो तेव्हा आपण खळखळून हसतो. परंतु, वास्तवात एका अधिकाऱ्याच्या डोक्यावर भूवयांच्या मध्ये पीस्तूल रोखली जाते, तेव्हा घरी बायकामुलं असणारा तो अधिकारी किती धास्तावत असेल, मानसिकदृष्ट्या खचत असेल याची कल्पना आपणास कदाचित येणार नाही. आठ महीने नैराश्यग्रस्त होऊन मानसिक उपचार घेणे ते ही तुम्ही फक्त अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलात म्हणून.. विनयभंगाच्या आरोपांना आणि कारवाईला सामोरं जावं लागणे.. मानहानी होणे.. कारण तुम्ही अनधिकृत बांधकामावर नोटीस काढायला गेलात म्हणून.. फक्त तुम्ही यंत्रणेच्या खालच्या स्तरात आहात म्हणून बळीचे बकरे बनणार..

विषय न संपणारा आहे. पाऊस थांबेल उद्या परवा. ऊन पडेल. इमारती पडतील. तेव्हा फक्त कोणालातरी जबाबदार ठरवताना या गोष्टींचा जमलं तर विचार करा. या सगळ्याला जबाबदार कोण?

 

ओमकार गिरकर
(लेखक स्थापत्य अभियंता व समृध्द कोकण अभियान या चळवळीचे रत्नागिरी समन्वयक आहेत.)

 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!