३२ वर्षांनंतर पुन्हा शाळेचा वर्ग भरला !

३२ वर्षांनंतर पुन्हा शाळेचा वर्ग भरला !

३२ वर्षांनंतर पुन्हा शाळेचा वर्ग भरला !

हॅलो, मी मंदार तांडेल बोलतोय. आपण नंदा सरोदे ना..होय मीच ती..अरे, अमित तू. माझ्या घरातलं नाव तू घेतलस म्हणजे तू मला ओळखले बरोबर. अगदी बरोब्बर... तब्बल ३२ वर्षानंतर ऐकतेय हा आवाज. जुजबी गप्पा झाल्या नि कळलं, रविवारी ९ एप्रिलला संध्याकाळी मुंबई महानगरपालिकेच्या बर्वेनगर शाळा क्रमांक २ मधील विद्यार्थी शिक्षकांचं गेटटुगेदर आहे.

खूप उत्सुकता होती त्या दिवसाची, पण हाॅलवर पोहचलो तेव्हा कोणाचीच ओळख पटेना. सगळ्यांची तीच अवस्था मी अनुभवली. जो तो एकमेकांना विचारतोय, मला ओळखले का? हाय, हॅलो झालं. नावं सांगितली तरी ओळख काही पटेना.

कशी पटणार ? लहानपणीचे गोंडस चेहरे आता थोराड दिसू लागले होते. आठवणींचे किस्से रंगू लागले, तसं हळुहळू मन बालपणीच्या त्या वर्गात जाऊन पोहचलं. मित्रांसोबत केलेली मारामारी आणि त्यानंतर शिक्षकांना घाबरून तीन दिवस शाळेला मारलेली दांडी. त्यावेळेस शिक्षकांनी दिलेली समज.

याच शिक्षकांनी जगण्याचा खरा अर्थ शिकवला. सुजाण नागरीक बनवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले आमचे शिक्षक. अभ्यासक्रम पूर्ण केला म्हणजे कर्तव्य संपले असे न करता त्यांनी त्याही पलिकडे जाऊन इतर अनेक गोष्टींतून आमचं व्यक्तिमत्व घडवलं होतं.

आम्हांला पाहून शिक्षकांनाही खूप हुरूप आला होता. अगदी वयस्कर किंवा लांबून आलेले शिक्षकसुद्धा कार्यक्रम संपेपर्यंत थांबून राहिले. खरं तर कोणाचाच तिथून पाय निघत नव्हता. इतक्या वर्षांनीसुद्धा त्यांचे खणखणीत आवाज ऐकून मन त्यावेळेच्या वर्गात जाऊन बसलं होतं. सर्वजण कानात प्राण आणून ऐकत होते. खूप सुंदर होता तो क्षण.

शिक्षकाचा सत्कार प्रत्येक विद्यार्थ्याचं करताना मन कृतकृत्य झालं होत. ओथंबून आलेलं मन प्रत्येकाच्या डोळ्यात दिसत होते. देहबोली सांगत होती "अरे वेड्या कोणते पुण्य केले आहेस रे तू?" जो तुला हा क्षण अनुभवायला मिळत आहे".

आयुष्यात वेलसेटल असलेले सगळेच अगदी जेवण वाढण्यापासून पडेल ती कामं न सांगता खुशीने करत होते. आणखी वाढू का, हा मनापासून केलेला केवढा तो आग्रह ! खरं तर हे सगळं पाहूनच मन भरलं होतं आमचं.

आम्ही डबा नसेल आणला तर त्यावेळी आमचे शिक्षक स्वत:चा डबा आमच्यासाठी देत असत. आजही आम्ही वयाने इतके मोठे झाल्यावरही आमच्यासाठी खाऊ आणायला ते विसरले नव्हते. खूप सुखद होतं ते. खूप दिवसांनी आईच्या हातचा गोड खाऊ मिळाल्याचा अनुभव आला. तोही आम्ही मला पहिला- मला पहिला करत उड्या मारून मारून खाल्ला. शालेय  वयासारख्याच आमच्या थोड्या गप्पा आणि थोडी मस्ती चालू होती, काय करणार? इतक्या दिवसांनी भेटलो होतो ना सर्व ? शिक्षकही आम्हाला भेटण्यास तेवढेच उत्साही दिसले. तीच प्रसन्नता, तेच चैतन्य चेहऱ्यावरून उतू जात होतं. आशीर्वादासाठी डोक्यावर ठेवलेला हात परिस स्पर्शाचा अनुभव देत होता. पैसा आणि प्रतिष्ठा सारं सारं गळून पडलं होतं. आता फक्त गुरू- शिष्याचं नातंच फक्त होतं.

आमच्या सावंत मॅडम तर म्हणाल्या, लहानपणी शहाणपण येणं आणि शहाणपण आल्यावर लहानपण जपून ठेवणं खूप महत्वाचं आहे. माणसाला आनंदी ठेवायला हे खूप उपयोगी पडतं.

बाईंचा शब्द म्हणजे आमच्यासाठी प्रमाण होता. त्यांनी आम्हाला सांगितलेली अगदी छोटी छोटी कामंसुद्धा आम्हाला खूप मोठेपणाची वाटायची. आम्हाला कामं सांगतात म्हणजे आम्ही वर्गात एकदम हिरोच होऊन जायचो. असं वाटायचं आपणच इतरांपेक्षा अधिक समजदार, हुशार आहोत. गर्वाने छाती छप्पन इंचाची व्हायची. ३२ वर्षाच्या कालावधीनंतर गेटटुगेदरमध्ये पुन्हा तीच बाल्यावस्था झाली होती.

 

 

 

नंदा संजय गवांदे

लेखिका शिक्षक आहेत.

gawandenanda734@gmail.com

MediaBharatNews

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!