भारतात आता अशी घटना कोणाही हिंदुंच्या बाबतीत घडू शकते. यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत. कदाचित पुढचा क्रमांक तुमच्या कुटुंबाचा असू शकतो. हिंदुंनी हिंदुंची आपसांतील वैमन्यस्यातून हत्या करायची आणि आरोप मुस्लिमांवर ढकलून द्यायचा. शक्य झालं तर दंगल पेटवून द्यायची. संघभाजपाने सुनियोजितपणे रुजवलेला मुस्लिम द्वेष हिंदुंचाच कर्दनकाळ बनत चाललाय. विद्वेषी वातावरणाचा गैरफायदा समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेऊ लागलेत.
घटना कानपुरातील आहे. मनीष कनोडीया या कापड व्यापाऱ्याच्या अवघ्या दहावीत शिकणाऱ्या मुलाची कुशाग्रची हत्या झाली. सुरुवातीला मुलगा बेपत्ता होता आणि एका अनोळखी व्यक्तीने मनीष कनोडीयाच्या कुटुंबापर्यंत चिठ्ठी पोहोचवली होती. चिठ्ठीत खंडणीची मागणी केलेली होती.
खंडणी न दिल्यास तुमच्या सणासुदीचे दिवस खराब होऊ शकतात, अशी धमकीही दिलेली होती. आरोपी चिठ्ठीमध्ये 'अल्लाहू अकबर' लिहायला विसरला नव्हता.
सहाजिकच, कोणीतरी मुस्लिम व्यक्तीने कुशाग्रचा अपहरण केलं आहे, असं चित्र निर्माण झालं होतं. त्यानंतर कुशाग्रचा मृतदेह पोलिसांना सापडून आला आणि पोलीस तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली.
आरोपी व्यक्ती जेव्हा स्कूटी घेऊन मनीष कनोडीया राहत असलेल्या सोसायटीत आली तेव्हा तिने हेल्मेट घातलेले होते. स्कुटीचा पुढचा नंबरप्लेटवर काळं फासलेलं होतं तर मागची नंबरप्लेट कपड्याने झाकलेली होती ; परंतु सोसायटीच्या वॉचमनने सजगता दाखवत कपडा बाजूला करून स्कूटीचा नंबर टिपून घेतला होता.

त्या नंबरवरून ती स्कूटी कुशाग्रची ट्युशन टीचर रचिता हिची असल्याचं पोलिसांना दिसून आलं. तिथून धागा गेला प्रभात शुक्लावर. प्रभात शुक्ला हा रचिताचा बॉयफ्रेंड ! त्यानेच कुशाग्रला बोलावून त्याला ट्युशन टीचर ने बोलावलं आहे असं सांगून सोबत नेलं. सीसीटीव्हीमध्ये ते दिसून आलंय. ट्यूशन टीचरचं नाव सांगितल्यामुळे कुशाग्र विश्वास ठेवून मागोमाग गेला.

शुक्लाच्याच घरातील एका स्टोअर रूममध्ये शुक्लाने कुशाग्रचा गळा आवळून खून केला. चिठ्ठी पाठवण्यापूर्वीच कुशाग्रची हत्या झाली होती, असं उघड झालंय. कुशाग्र आणि ट्युशन टीचर रचिता यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते, असा प्रभात शुक्लाला संशय होता, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
पोलिसांनी तत्परतेने सूत्रं हलवल्यामुळे प्रभात शुक्ला वेळीच पोलिसांच्या तावडीत सापडला. कुशाग्रचा मृतदेह एखाद्या मुस्लिम वस्तीजवळ टाकून या घटनेला वेगळंच वळण देण्याचा शुक्लाचा डाव होता.