देशाचं हसं करतोय बुद्धीबधीरांचा ड्रोन सायंटिस्ट !

देशाचं हसं करतोय बुद्धीबधीरांचा ड्रोन सायंटिस्ट !

देशाचं हसं करतोय बुद्धीबधीरांचा ड्रोन सायंटिस्ट !

महिन्यातून अठ्ठावीस दिवस विदेशांचा प्रवास करणाऱ्या अवघ्या २१ वर्षीय प्रतापबद्दल काही ऐकून आहात की नाही तुम्ही ? तुमच्याकडे आली की नाही त्याची पोस्ट ?

फ्रान्सने प्रतापला नोकरीसाठी निमंत्रण दिलं. मासिक सोळा लाखांचा गलेलठ्ठ पगार, पाच शयनकक्षांचं घर, अडीच कोटींची दिमाखदार कार, अशा प्रलोभनपूर्ण प्रस्तावांनी अनेक संस्थांनी त्याला बोलावले. ह्या पठ्ठ्याने या सर्वांना सरळ नकार दिला. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याला बोलावून घेतलं, उचित पारितोषकाने त्याचा सत्कार केला आणि 'डी आर डी ओ' मध्ये त्याला सामावून घेण्यास सांगितलं.

एखाद्या सिनेमाची कपोलकल्पित कथा घरबसल्या लिहावी आणि आपण ती खर्राखुर्रा सिनेमा म्हणून पसरवत राहावी. भारतात आता ही बाब खूपच सर्वसाधारण होऊन बसलीय. इथल्या लोकांनी मोदीभक्तीत आणि हिंदूराष्ट्राची स्वप्ने बघता बघता आता जणू काही यापुढे मेंदूचा वापर करायचाच नाही, असा पक्का निर्धार केलाय.

पूर्वी कसे राक्षस जन्मल्या जन्मल्या इतके मोठे होत जायचे की आभाळाला भिडायचे. पृथ्वी घेऊन समुद्रात लपून बसायचे. पुरुषाचं पाण्यात पडलेलं वीर्य गिळून मासीण गर्भवती व्हायची. घामाने मगर गर्भवती व्हायची. हातावर घेऊन जाता जाता डोंगर सांडायचे. एक थरार होता त्या काळात. तो थरार थोड्याबहुत फरकाने आजही सुरू आहे. स्वरुप बदललंय थोडंफार ! पण श्रद्धापूर्ण डोळे झाकून विश्वास ठेवणारी प्रवृत्ती मात्र जशीच्या तशीच आहे. युगानुयुगे !

वाॅटसएप, फेसबुकवर कोणी काहीही टायपावं आणि ते निमूटपणे पुढे सरकवावं. काय आहे, कोणी पाठवलंय, खरं असेल का, खरं असू शकतं का, असं असतं का कुठे...आपल्याला एकही प्रश्न पडत नाही. धर्मकार्याला एकदा वाहून घेतलं की तसंही मेंदूचं फारसं काम राहत नाही ! प्रताप त्यामुळेच भाव खाऊन गेला.

प्रतापची कथा रंगवून सांगितली जाते ती अशी की कर्नाटकातील मैसूर जवळ कोडाईकुडी नावाच्या एका दुर्गम खेड्यात त्याचा जन्म झाला. त्याचे शेतकरी वडिल सुमारे दोन हजार रुपये कमवू शकत.

याला बालपणापासूनच 'इलेक्ट्रॉनिक्स' मध्ये विशेष रस. बारावीत शिकत असताना आसपासच्या प्रतापचा सायबर कॅफेच्या माध्यमातून बोईंग ७७७, रोल्स रॉईस कार, अवकाश, हवाई प्रवास, अशा गोष्टींशी कसा परिचय झाला, कसे त्याने जगभरातील अनेक शास्त्रज्ञांना मोडक्या तोडक्या इंग्रजीत शेकडो इमेल लिहिले आणि कळविले की त्याला काम करायचे आहे पण कशी कुणीच दखल घेतली नाही.

कसा प्रतापला इंजिनिअरिंग ऐवजी आर्थिक परिस्थितीमुळे बीएससी (फिजिक्स)ला प्रवेश घ्यावा लागला, कसे त्याला वसतीगृहाचे शुल्क भरता आले नाही म्हणून हाकलून देण्यात आले. तो मैसूर बसस्टँडवर झोपायचा, सार्वजनिक स्वच्छतागृहात कपडे धुवायचा. त्याने एकलव्याप्रमाणे सी प्लसप्लस, जावा कोअर, पायथॉन या संगणक भाषा स्वतःच शिकल्या आणि अशातच त्याला ई वेस्ट पासून ड्रोन बनविण्याबद्दल कळले. सुमारे ऐंशी खटपटीं नंतर त्याला असा ड्रोन बनविण्यात यश आले. सहाशे ड्रोन बनवलेत त्याने...वगैरे वगैरे.

प्रतापच्या कथा स्वत: प्रतापच सांगतोय. त्याचे कुठलेही पुरावे कोणीही तपासलेले नाहीत. मात्र, प्रतापच्या प्रतापांचं युट्यूबवर काही वाहिन्यांनी फॅक्टचेक केलंय आणि त्याची पोलखोलही केलीय.

प्रताप राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्काराने सन्मानित झाल्याचं सांगतो. पण सगळ्या फोटोत तो एकटाच प्रमाणपत्रं घेऊन उभा दिसतो. त्याला कोणी सन्मानित करतंय, पुरस्कार देतंय असा एकही फोटो नाही. तो दावा करत असलेल्या कुठल्याही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार देणाऱ्या कंपनीच्या वेबसाईटवर त्याचा पुसटसाही उल्लेख नाही की पुरस्काराची माहिती नाही. त्याने दावा केलेले तसे पुरस्कार संबंधित कंपन्या देतही नसल्याचं दिसून आलंय.

प्रतापच्या टोकिओ प्रदर्शनातील सहभागाच्या कथा तर रंगवून रंगवून मांडल्या जात आहेत. आईचे मंगळसूत्र विकून प्रवास केला, सोळा ठिकाणी उतरून ट्रेन बदलल्या, टोकियो प्रदर्शनात कसा त्याने क्रमांक पटकावला, अख्ख्या देशाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले, मोदींनी काॅल करून अभिनंदन केलं...जितकी लपेटता येईल तितकं लपेटलं आहे.

भारतात कसं टॅलेंट आहे, मोदी कार्यकाळ सुरू झाल्यापासून कसे लोक आता परदेशातील लाखोंच्या पगाराच्या नोकऱ्या ठोकरून देशातच नोकरी करू इच्छितात, मोदी त्यांच्या टॅलेंटची कशी कदर करतात, जे पूर्वी होत नव्हतं, मोदी अशा टॅलेंटेड लोकांना कशा स्वत:हून नोकऱ्या ऑफर करतात, हे दाखवण्याच्या नादात अशा फेक कथा रचून पसरवल्या जात आहेत. स्वत: प्रताप एन एमने सुद्धा भारतीयांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत स्वत:चं व्यवस्थित प्रमोशन केलंय. तसाही लायकी नसलेल्यांच्या गौरवीकरणाचा काळ भारतात सुरू आहे. 

प्रतापचा खोटारडेपणा उघड होऊन तीनचार वर्ष उलटलीत, पण आमचे मोदी किती थोर हे दाखवण्याच्या लाचार धडपडीत भले भले लोक आजही प्रतापच्या पोस्ट पसरवण्याचं काम सोडत नाहीयेत. अशा गोष्टींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा डागाळतेय, देशाचं हसू होतं याचं कोणालाही देणंघेणं नाही. 

प्रतापची पोलखोल ऐकायची असेल तर खालील लिंकवर जाऊन खातरजमा करू शकता :

https://youtu.be/57-2X549ujw?si=S3rku9P6Uli_t3nB

https://youtu.be/7T57OpxjzsM?si=koNbnwsJc5LEvqVm

https://youtu.be/HW-nO0he928?si=l9KKY3ES4AgQOHC5

MediaBharatNews

Related Posts
comments

Comments are closed.

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!