विद्यार्थी पुन्हा नव्याने घडवायचेत !

विद्यार्थी पुन्हा नव्याने घडवायचेत !

विद्यार्थी पुन्हा नव्याने घडवायचेत !

आता व्यवस्थित शाळा सुरू झाल्यात. पूर्वी सारख्याच. आता नियमित वेळ. सर्व तासिका. पूर्ण वेळ. सर्वकाही पूर्वीसारखंच ! पण आता मुलांची मनोवस्था पूर्वीसारखी राहिलेली नाही. मुलांनी दीर्घकाळ घरी राहण्याचा परिणाम असा झालाय की मुलं आता फार काळ एकाग्र होत नाहीयेत आणि प्रत्येकाची एक आपापली वेगळीच कहाणी आहे.  

थोड्याशा आवाजानेही डोकं दुखणं, फळ्यावरील अभ्यास लिहून न घेता येणं, वाचनाकडे दुर्लक्ष, एकमेकांना समजून न घेणं, अतिचंचलपणा, एकाग्रपणे अभ्यास न करता येणं...ही आणि अशीच लक्षणं मुलांमध्ये दिसू लागली आहेत.

मुलं काहीशी हेकेखोर, थोडी हट्टी, प्रचंड अग्रेसिव्ह वाटू लागली आहेत. स्थिरता कमी झाली. अभ्यासात मन रमत नाहीये. मन चंचल झाल्याने फार काळ एकाच गोष्टीत रस राहिलेला नाहीये.  एक गोष्ट नीट समजून घ्यायच्या आधीच दुसरी गोष्ट करण्याकडे त्यांचा कल दिसतोय.

सतत नावीन्यपूर्ण हवं आहे पण फार काळ त्याचा आनंद घेत नाहीत. सगळ्या गोष्टी पटापट हव्या आहेत. धीर धरावा असं मुळीच वाटत नाहीये. दुसर्‍याचा तर विचारच केला जात नाहीये. एकजुटीने राहावं, एकत्र काम करावं, एकमेकांना मनापासून समजून घेऊन मदत करावी ही भावना उरलेली नाही.        

याउलट बोटावर मोजता येईल एव्हढी मुलं मात्र खूप चुणचुणीत झाली आहेत. सगळ्या गोष्टीत तत्परता ; अभ्यासात सहजता आहे. आकलन वयाला अनुसरून आहे. माणुसकी शब्द कळत नसला तरी माणुसकीला धरून वागणारी आहेत. इतरांना अभ्यासात मदत करणारी आहेत. एक सुंदर व्यक्तिमत्व असणारी साजेशी मूर्ती म्हणजे ही काही मुले.

प्रत्येक मुलाच्या प्रतिसादामागचं कारण आहे त्यांच्या घरची कोरोना काळातील परिस्थिती...ज्यांना परिस्थितीला योग्यप्रकारे सामोरे जाता आले, त्यांची मुलेही आहे त्या परिस्थितीत सर्वसाधारण जीवन जगत राहिली. आर्थिकमंदी जरी आली तरीही त्या काळात मुलांची योग्य समजूत काढून ध्येय निश्चित कसं करावं ह्याचाच जणू अभ्यास करून घेतला..मुलांकडे जराही दुर्लक्ष केले नाही...याउलट ज्यांना अर्थार्जनासाठी खूप खस्ता खाव्या लागल्या..त्यांचं मात्र मुलांकडे थोडं दुर्लक्षच झालं..अन्न आणि शिक्षण या दोहोंचा एकत्र मेळ घालून योग्य ते मार्गदर्शन करण्यात काहीच असमर्थ ठरले. पोटाची भूक अस्वस्थ करीत होती. रोजचा प्रश्न होता, खाण्याचा आणि ते मिळवून जगण्याचा...

पण आता ही मुलांच्या मनोवस्था योग्य दिशेला वळवणं ही खूप मोठी जबाबदारी पालक आणि शिक्षक यांच्यावर येऊन पडलीय. खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना शिक्षण प्रवाहात आनंदाने सामील करण्यासाठी विविध प्रयोगांच्या माध्यमातून जावं लागणार आहे.

पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांचा जर योग्य मेळ बसला तर खरंच पूर्वीसारखंच सुंदर चित्र वर्गांवर्गात दिसू लागेल..त्या दिवसाची आपण वाट पहात आहोत. त्यासाठी सबुरीने घेणे फार गरजेचं आहे.

केवळ पाठ्यपुस्तक आणि विद्यार्थी हा हुतूतूचा खेळ थांबला पाहिजे. मुलांमधील ऊर्जा कामात आणायची एक चांगली संधी म्हणजे विविध उपक्रम. कधी बोलगाणी, कधी कविता, तर कधी मैदानी खेळ असे मुलांच्या कलाने घेतले की मुलं आपोआप स्थिर होतील .

मुलं दमली पाहिजेत, म्हणजे मग ती शांत निवांत होतील. त्यांच्यातील ऊर्जा वापरात आणण्यासाठी आपण आहोतच. मग कोरोनानंतरच्या मानसिकतेने अवघडलेली ही मुलं पुन्हा नव्याने घडवणं सोपं जाईल. आपण फक्त त्या तयारीने वर्गात जायला हवं.

 

 

 

नंदा गवांदे

लेखिका शिक्षक आहेत.
gawandenanda734@gmail.com

MediaBharatNews

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!