येऊरची ओढ : इथलं प्रत्येक झाड, फुलझाड आपल्याशी हितगुज करतं !

येऊरची ओढ : इथलं प्रत्येक झाड, फुलझाड आपल्याशी हितगुज करतं !

येऊरची ओढ : इथलं प्रत्येक झाड, फुलझाड आपल्याशी हितगुज करतं !

सकाळची वेळ झाली की, मन येऊरची वाट धरू लागतं. हळू हळू पावलं तिकडे वळू लागतात. त्या आधी घरातल्या उरकाउरकीसाठी माझी माझ्याशीच स्पर्धा असते. एकदा येऊरच्या जंगलात शिरलं की आपण त्याचे होऊन जातो.

नववधू प्रमाणे रोज तोही खुलताना दिसतो. आकाशातला निळसर, लालसर रंग आणि खाली हिरवाशार पसरलेला रंग. मन बेहोश करून टाकणारे हे सारे रंग मनाला तजेला देतात. पक्षांचा किलबिलाट, तर कधी पहाटेला सुद्धा रातकिड्यांचा आवाज कानाला नादवतात.

अनेकजण पहाटेच मॉर्निग वॉकसाठी येऊरला येतात. जी नव्याने येतात ती नियमित येऊ लागतात. जी नित्याने येतात ती तर येऊरच्या प्रेमातच पडतात. ती माणसे कधीच येऊर टाळू शकत नाहीत. येऊरचं लोभसवाणं रूप प्रत्येकाला त्याच्या प्रेमात पाडल्याशिवाय राहत नाही.

हेही वाचा :  स्त्रीयांची घुसमट वाढवणारं लाॅकडाऊन !

पुष्कळ लोक असले तरीही आपापसात कमी बोलतात आणि निसर्गाशी अबोलपणे अफाट गप्पा मारतात. तरल भावनांनी निसर्ग आणि मानव एकरूप झालेला इथं पहायला मिळतो.

इथलं प्रत्येक झाड, फुलझाड आपल्याशी हितगुज करतं. कधी त्याच्या मनातल आपल्याला सांगतं, तर कधी आपल्या मनातलं जाणून घेत शांतपणे.. अव्यक्त भावना इथं व्यक्‍त होतात.

शब्दांची फुलपाखरे होतात. झरझर कागदावर उमटू लागतात. सुंदर सुंदर शब्दांची रांगोळी कागदावर छान खुलून दिसते. मनाचे रंग मात्र गहिरे होत जातात. आपोआपच अनेक चांगल्या चांगल्या लोकांसोबत ओळखी होतात. मैत्रभाव वाढत जातो. इतकं दान निसर्ग आपल्याला भरभरून देतो.

हेही वाचा :  तब्बल २३ वर्षांनंतर पाखरांचा वर्ग पुन्हा भरला होता !

तशा येऊरमध्ये अनेक पायवाटा आहेत. पण रोज एकाच जरी पायवाटेने गेलात तरी काहीतरी नवीन पाहिल्याचा आनंद चेहर्‍यावर उमटतो. रोजच हे येऊरचं ट्रेकिंग शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवायला मोलाच ठरतं. संपूर्ण दिवस प्रसन्नतेने भरलेला राहतो. तुम्हाला कितीही वेदना असू देत हा निसर्ग त्या वेदना पिऊन टाकतो आणि आपल्या वाट्याला देतो ते प्रेमाच भरभरून दान.

स्वतःकडे दुःख घेऊन प्रत्येकाला सुख देणारा हा निसर्ग मला नेहमीच भावतो. अशा या गोजिरवाण्या येऊरच्या प्रेमात कुणी नाही पडले तर नवलच!

कुणी चित्रकार इथं चित्र काढताना दिसतो, तर कुणी फोटोग्राफर इथलं सौंदर्य आपल्या कॅमेरात टिपण्याचा प्रयत्न करत. कुणी छान छान गाणी म्हणत तर कुणी सुंदर शिळ घालत चालताना दिसतं. मधेच कोणी बासरी वाजवतानाचा आवाज. गप्पीष्ट मंडळी गप्पा मारताना दिसतात, तर खाद्यप्रेमी रानमेव्यावर तुटून पडतात. असं हे येऊर सर्वांनाच भावतं. सर्वांच्याच मनात आपलं एक घर करतं.

येऊरची ही हुरहूर मनाला कायम ओढ लावते. अन्‌ माझी अशी ही नित्याची पिकनिक होते. मी रमते. आपसूकच हृदयातलं गाणं ओठावर येऊ लागतं…ये जमी गा रही है, आसमा गा रहा है, मेरे संग संग ये सारा जहा गा रहा है !

 

 

 

नंदा गवांदे

लेखिका शिक्षिका आहेत.

gawandenanda734@gmail.com

 

MediaBharatNews

Related Posts
comments
  • माधुरी जगताप

    August 11, 2021 at 4:34 am

    येऊर हे ठाण्यातील नंदनवन म्हणावे लागेल.एकदा गेलं की माणूस जणू प्रेमात पडतो तिथल्या निसर्गाच्या. शहरात इतक्या जवळ अस हे ठिकाण त्याला धनदांडग्या पासून जपायला हवं

  • leave a comment

    Create Account



    Log In Your Account



    Don`t copy text!