संविधान सन्मान महासभेचं आमंत्रण देऊन प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींची केली कोंडी !

संविधान सन्मान महासभेचं आमंत्रण देऊन प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींची केली कोंडी !

संविधान सन्मान महासभेचं आमंत्रण देऊन प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींची केली कोंडी !

२५ नोव्हेंबर रोजी मुंबईत छत्रपती शिवाजी पार्कवर भव्य कार्यक्रम

संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबरला मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्कवर आयोजित संविधान सन्मान महासभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनाही आमंत्रण देण्यात येणार आहे. सदरचं आमंत्रण राहुल गांधींची राजकीय कोंडी करणारं ठरणार आहे. इंडिया आघाडीतून वंचित बहुजन आघाडीला सतत डावलण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर संविधान सन्मान सभेचं आमंत्रण स्वीकारून राहुल गांधी उपस्थित राहतील का, हा मोठा कळीचा प्रश्न आहे.

भारतीय संविधानाने या देशातील शोषित, वंचित, अल्पसंख्यांक, दलित - आदिवासी, ओबीसी व धार्मिक समुह या सर्वांच्या हक्क अधिकारांचं संरक्षण केलं आहे. समता, बंधुता आणि न्यायाची हमी दिली आहे. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान समितीच्या वतीने संविधान सादर केलं व संविधान आणि येणारी परिस्थिती व त्यावरील उपाय यावर उहापोह करणारं भाषण केलं. त्या भाषणाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन संविधान सन्मान महासभेचं आयोजन करण्यात आल्याची  माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

संविधान सन्मान महासभेसाठी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना निमंत्रण द्यावं, असा निर्णय वंचितच्या राज्य कार्यकारिणीत झाला असल्याचं व  त्यांनाही निमंत्रण पाठवणार असल्याचं ॲड. प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.

पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरदेखील निशाणा साधला. २०२४ च्या लोकसभा निवडणुका या विकास, आर्थिक धोरण, परराष्ट्र धोरण इत्यादी मुद्द्यांवर लढवल्या जातीलच मात्र, आरएसएसचा अजेंडा असा आहे की, इथे आमची व्यवस्था हवी आहे ! यातील ‘आमची’ हा शब्द फसवा आहे. ते वैदिक व्यवस्था मानतात. त्यांच्या व्यवस्थेत बंधुत्व, स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य  नाही. आरएसएसला वैदिक धर्मावर आधारित संविधान पाहिजे आहे. आताचं भारतीय संविधान हे संतांच्या भूमिकेला आणि फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारं आहे. असं ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून वंचित बहुजन आघाडीच्या सभांचा धडाका सुरू आहे. ह्या सभांना लोकांचा मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. २५ ऑक्टोबर रोजी अकोला येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्म मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला लाखोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. त्यानंतर धुळे, सटाणा या ठिकाणी आदिवासी हक्क परिषदा मोठ्या संख्येने पार पडल्या होत्या आणि आता संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर संविधान सन्मान महासभा होणार आहे. 

देशभरात संविधानिक संस्था, लोकशाही धोक्यात असताना संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या ह्या सभेला अत्यंत महत्त्व आहे. मुंबईभरातून मोठ्या प्रमाणात ह्या सभेसाठी वंचित बहुजन आघाडी आणि संविधान प्रेमी जनतेकडून प्रचार जोरात सुरू असून ही महासभा देशातील संविधानप्रेमी जनतेला एक नवीन दिशा देणारी सभा ठरेल, असा वंचित बहुजन आघाडीचा दावा आहे. 

MediaBharatNews

Related Posts

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!