मुरलीधर शिर्के : फिरस्त्याची पत्रकारिता थांबली !

मुरलीधर शिर्के : फिरस्त्याची पत्रकारिता थांबली !

मुरलीधर शिर्के : फिरस्त्याची पत्रकारिता थांबली !

पांढरे केस, दाढी, कधी झब्बा पैजामा तर कधी सफारीत, हातात पेपरांच्या गठ्ठ्यांची पिशवी घेऊन नगरपालिका, महानगरपालिका, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन येथे फिरणं, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याणपर्यंत लहानमोठ्या बातम्यांचं वृत्तांकन करणं , बातमीत कार्यक्रमातील उपस्थित सर्वांचे पदांसह नामोल्लेख करणं, संपादकांच्या मागे लावून ते वृत्त छापून आणणे आणि ती बातमी संबधितांपर्यत पोहोचवणं आणि यासाठी गेली ३० वर्षे वणवण भटकणारी फिरस्तीची पत्रकारीता अखेर थांबली.

मोठ्या माध्यमांंनी ज्यांची कधीच दखल घेतली नव्हती, अशा, उपेक्षित व्यक्ती, संस्था, संघटना यांना प्रसिद्धी देण्यासाठी शिर्के काकांची पत्रकारिता कायम फिरस्तीवर राहिली.

शिवसेनेच्या माध्यमातून तळागाळातील लोकांच्या संपर्कातील कट्टर शिवसैनिक ! महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी, विठ्ठलवाडी स्टेशनसमोरील वायर कंपनी बंद पडली म्हणून रिक्षा चालवता चालवता, सोबतीला दै. अमृत कलश, दै. अंबरनाथ टाईम्स, दै जनमत, दै महाराष्ट्र सम्राट ते अखेरीस स्वत: संपादक असणाऱ्या साप्ता. शहर सम्राट सारख्या वर्तमानपत्रातून ३५ वर्षापेक्षा अधिक पत्रकारिता केलेल्या या पत्रकाराने लहान माणसं, संस्था, संघटना वाचल्या, मुद्रित केल्या जपल्या आणि मोठ्याही केल्या.

कुणाचंही भरभरून कौतुक करणं, लहान जेष्ठ, नवशिक्या पत्रकारांनाही मानाने संबोधणारे शिर्केकाका कायमच लक्षात राहतील.

कुठल्याही कार्यक्रमात एखाद्याचं चुकलं तर निक्षून सुनावणारे किंवा एखाद्याचं स्वागत, सत्कार राहिलाच तर आवर्जून आयुक्त, महापौर, सूत्रसंचालक किंवा आयोजकांच्या कानात जाऊन सांगण्याचं धाडस फक्त शिर्के काकाच करु जाणे !

काकांनी अडगळीतल्या, अंधारातल्या अप्रकाशित कवी, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते यांना आपल्या साध्याभोळ्या शब्दांंतून प्रकाशात आणलं. कोकण प्रवासी संघटनेच्या लढाईत कोकणवासीयांना सामावून विठ्ठलवाडी बस डेपो भूमाफियांंच्या घशात जाण्यापासून वाचवला. प्रत्येक सणाला स्वतंत्र बससेवेची उपलब्धता बस डेपो प्रशासनाशी भांडून ,समजावून करुन देणाऱ्या शिर्के काकांचं निघून जाणं तमाम कोकणवासीयांच्या जिवाला चटका लावणारं ठरलंय !

मी आजवर ५००० बातम्या, ५०० लेख लिहिले हे अभिमानाने ठणकावून सांगणारे शिर्के काका डिजिटल पत्रकारितेत थोडे मागे राहिले. परंतु, बातमी आणि त्यांच्यातील पत्रकार यातील अस्वस्थता त्यांनी कायम जिवंत ठेवली.

अलीकडेच, कौटुंबिक, शारीरिक , आर्थिक व्याधींनी, त्रस्त असतांनाही त्यांच्या जनसंपर्कात कधीही खंड पडला नाही. त्यांच्या वडिलधाऱ्या पत्रकारितेस अनेक सामाजिक,
राजकीय संस्थांनी पुरस्कारित केले.

शेवटच्या दिवसापर्यंत पत्रकारितेचा धर्म निभावण्याऱ्या या ७६ वर्षीय तरण्याबांड पत्रकारितेचा आकस्मित अंत होईल असं वाटत नव्हतं. . प्रफुलभाऊ ती बातमी मला पाठवा ना किंवा प्रत्यक्ष भेटल्यावर काय प्रफुलभाऊ कसे आहात , या आपुलकीच्या संवादाला मी कायमस्वरूपी मुकलो . एवढं मात्र खरं !!!

 

 

 

प्रफुल केदारे

कायद्याने वागा लोकचळवळीचे माध्यम समन्वयक तथा मिडिया भारत न्यूज चे सहसंपादक

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!