कोविड संकट, सामाजिक प्रश्न आणि लोकशाहीचा संकोच करणारी अभूतपूर्व परिस्थिती ! ॲड. यशोमती ठाकुरांचं दोन वर्षांचं स्व-परीक्षण !

कोविड संकट, सामाजिक प्रश्न आणि लोकशाहीचा संकोच करणारी अभूतपूर्व परिस्थिती ! ॲड. यशोमती ठाकुरांचं दोन वर्षांचं स्व-परीक्षण !

कोविड संकट, सामाजिक प्रश्न आणि लोकशाहीचा संकोच करणारी अभूतपूर्व परिस्थिती ! ॲड. यशोमती ठाकुरांचं दोन वर्षांचं स्व-परीक्षण !

बघता बघता राज्यमंत्रिमंडळातील माझ्या समावेशाला २ वर्षे झाली. पहिल्यांदाच मंत्री बनण्याचा आनंद आणि उत्साह काही वेगळाच होता, पण हे पद किती काटेरी आहे याची कल्पनाही होती. मी ज्या परिस्थितीतून राजकारणात आले ती परिस्थिती मी कधीच विसरले नाही आणि म्हणूनच मंत्री झाल्यानंतर माझ्यात फारसा बदल घडला नाही...

महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केलं गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळाचं स्व-परीक्षण !

ज्या व्रतासाठी मी राजकारणात आले, त्या व्रताला या मंत्रीपदामुळे गती आली. माझ्या बाबांनी मला कानमंत्र दिला होता, की स्वतःचं दुःख कुरवाळत बसण्यापेक्षा आपल्यामुळे इतरांची दुःख हलकी होतील असं काम कर. त्या दिवसापासून मी राजकारणात आले, आणि आज राज्याची मंत्री म्हणून काम पाहतेय.

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही काळातच जग एक मोठ्या संकटाला सामोरं गेलं. जगभर कोविड महामारीचं थैमान सुरू होतं. बलाढ्य देश गुडघे टेकून बसले होते. अतिशय प्रगत वैद्यकीय सुविधा, तंत्रज्ञान, आर्थिक पाठबळ असलेले महाकाय देश-अर्थव्यवस्था केविलवाण्या झाल्या होत्या. काय करावं याबाबत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडे उपाय नव्हता आणि कोविडचा प्रसार थांबवण्यासाठी जगभर लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारण्यात आला.

भारतासारख्या देशात लॉकडाऊन म्हणजे भयंकर निर्णय होता. त्यात केंद्र सरकारकडून थाळीनाद-शंखनाद यासारखे कार्यक्रम करून झाल्यानंतर सामान्य माणूस सर्वच उपाययोजनांकडे साशंकतेने पाहत होता. जनता कर्फ्यू पासून अचानक लॉकडाऊन पर्यंतच्या प्रवासामुळे सगळेच हवालदिल झाले होते.

लॉकडाऊन म्हणजे सगळंच बंद होत नाही, तिथून सुरू होतो एक वेगळाच प्रवास. हा प्रवास कुठे जाईल हे माहित नव्हतं. या प्रवासात आपल्याला काही होईल याची चिंता ही कधी सतावली नाही, कारण आसपास जे दिसत होतं ते भयंकर होतं. सगळीकडे भीतीचं वातावरण होतं आणि कोविडपेक्षाही ही भीती जास्त जीवघेणी होती.

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मी कुपोषणमुक्तीसाठी काही मोहीमा सुरू केल्या, महिला सुरक्षेचं ऑडीट हाती घेतलं, बालहक्क या दुर्लक्षित विषय, मात्र या विषयात तज्ज्ञांच्या साह्याने विविध सुधारणा हाती घेतल्या, महिला आयोगाचं सक्षमीकरण हाती घेतलं, महिलांना तक्रार करण्यासाठी मुंबईत यावं लागतं, या सर्वांत मोठ्या प्रश्नावर आजपर्यंत तोडगा काढला गेला नव्हता, मी महिला आयोगाची कार्यालये राज्यभर सुरू करण्याचा निर्णय घेतला,अंमलात आणला.

माविमच्या मार्फत नवी कर्जवाटप, बचतगटांच्या उत्पादनांचं मार्केटींग, अर्थसाक्षरता असे विविध कार्यक्रम हाती घेतले. अनाथ मुलांचा, परित्यक्ता महिला, वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला, भिक्षेकरी महिला-मुलं अशा दुर्लक्षित घटकांसाठी आजवर कोणी केलं नसेल इतके उपक्रम माझ्या कार्यकाळात धडाडीने सुरू केले.

अचानक आलेल्या कोविडमुळे सगळ्या कामांना ब्रेक लागतो की काय असं वाटायला लागलं. मात्र, आज मागे वळून पाहताना जे लक्षात येतं त्यावर विश्वासच बसत नाही. कोविडमुळे जग जरी स्तब्ध झालं असलं तरी जगभरातील महिलांनी या महामारीचा सामना करण्यात फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम केलं. आरोग्य क्षेत्रात तर महिलांचा सहभाग लक्षणीय आहेच, पण अगदी भाजी विक्री-धान्य विक्री पासून घरोघरी आरोग्य तपासणी, पोषण आहार पोहोचवणे यासारखी सर्व महत्वाची कामं महिलांनी आपल्या खांद्यावर घेतली. कोणी दखल घेवो न घेवो मात्र, माझ्या अंगणवाडी ताई आणि आशा सेविकांमुळे आज अगणित लोकांचे प्राण वाचले आहेत.

याच काळात राष्ट्रीय पोषण माह उपक्रमात महाराष्ट्राने देशपातळीवर पहिला क्रमांक पटकावला. कुपोषित बालकांची शोधमोहीम राबवून न जाणो कित्येक मुला-मुलींचे प्राण वाचवले. हे सगळं अभिमानास्पदच आहे. माझ्या अंगणवाडी ताईंनी दरीखोऱ्यातून, नदी-नाल्यातून वाट काढत गाव-पाड्यांपर्यंत पोषण आहार पोहोचवला. कोविडमुळे जो-तो आपल्या जीवाला घाबरत होता अशा काळात अंगणवाडी सेविका गावखेड्यात पोहोचत होत्या. काम करत होत्या.

महिला व बालविकास विभागाची मंत्री म्हणून मी हे सर्व जवळून जगत होते. अनेक ठिकाणी अंगणवाडी सेविकांच्या नवऱ्यांना आम्हाला क्वारंटाइन करावं लागलं. महिलांच्या आयुष्यात कितीतरी लहानसहान वाटणारे डोंगराएवढे प्रश्न असतात. या सर्व प्रश्नांची तीव्रता लॉकडाऊन मध्ये लक्षात आली.

अचानक कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली, बालविवाहाच्या केसेस समोर येऊ लागल्या. अनेकदा टीकाही झाली, मात्र मला कधी त्याची चिंता वाटली नाही, कारण माझा विभाग ही सर्व प्रकरणे संवेदनशीलतेने हाताळत होतं. बालविवाहाच्या घटना समोर येत होत्या, कारण आम्ही राज्यभरात खबऱ्यांचे नवीन नेटवर्क तयार केले, अनेक प्रसारमाध्यमांची मदत घेतली. अगदी गुजरात मध्ये होणारा बालविवाहही आम्ही रोखला.

बालविवाह ही एक सामाजिक समस्या आहे, आपल्या आसपास होणारे बालविवाह रोखले पाहिजेत यासाठी समाजानेच पुढाकार घेतला पाहिजे, आम्ही लोकांमध्ये जाऊन जनजागृती करत आहोत. यामागच्या आर्थिक आणि सामाजिक कारणांबाबत जनजागृती झाल्याशिवाय केवळ कायद्याच्या धाकाने बालविवाह थांबणार नाहीत.

असाच मुद्दा कौटुंबिक हिंसाचाराचा. अनेक मोठमोठ्या-सुशिक्षित घरांमध्ये कोविड काळात कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे समोर आली. ही प्रकरणे सोडवताना संपूर्ण विभागाचा मोठा कस लागला.मात्र, आम्ही कुठलाही गाजावाजा न करता हे काम करत राहिलो. कोविडमुळे अनेक लहान मुलांच्या डोक्यावरच पालकांचं छत्र हरपलं. अतिशय वेदनादायी अशा कित्येक घटना समोर येत होत्या, कोविड मुळे अनाथ झालेल्या मुलांना मदतीचा हात देण्याचा निर्णय सर्वांत प्रथम महाराष्ट्र राज्याने घेतला.

राज्यभरातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांशी चर्चा करून त्यांना आवश्यक तो शिधा, सॅनिटरी पॅडचा पुरवठा केला गेला. महिला व बालविकास खात्यातील अगदी बारीकसारीक गोष्टींचा या काळात मी आढावा घेतला, अशा वेळी महिला धोरणाची चर्चा जर केली नाही तर मोठी चूक ठरेल. शपथविधीनंतर तात्काळ मी महिला धोरणाचा आढावा घ्यायला सुरूवात केली. महिला धोरण आणणारं पहिलं राज्य असा महाराष्ट्राचा लौकिक आहे. मात्र कालांतराने हे धोरण कागदावरच राहतंय की काय अशी स्थिती निर्माण झाली.

जेंडर बजेट साठी आग्रही असल्याने मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पांमुध्ये जेंडर बजेटला स्थान मिळालं, मात्र ते सुद्धा अपुरं आहे. खऱ्या अर्थाने जेंडर बजेट व्हायचं असेल तर महिला धोरणाची कडक अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि प्रशासकीय उत्तरदायित्व निश्चित करायला पाहिजे. या दृष्टीकोनातून एका समितीचं गठन करून आजच्या काळाला सुसंगत असं महिला धोरण आकारण्यास सुरूवात केली. येत्या महिला दिनापर्यंत हे धोरण तयार झालेले असेल.

सक्षम महिला, सुदृढ बालक, सुपोषित महाराष्ट्र-सुरक्षित महाराष्ट्र ही चतुःसूत्री विभागाचं ब्रीद म्हणून आम्ही अंगीकारलं आहे. विभागाच्या पलिकडे जाऊन राज्यभरात लोकशाहीवर श्रद्धा असलेला समाज निर्माण करणे, जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या तत्वांना रोखणे याबाबत आग्रही राहून काम मला करता आलं याबाबत मला समाधान आहे.

देशात निर्माण झालेली परिस्थिती अभूतपूर्व आहे. लोकशाहीचा संकोच होत असल्याचं चित्र आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतंय. मला अशा काळात स्वस्थ बसणं हा गुन्हा वाटतो, त्यामुळे संविधानाच्या - या देशाच्या रक्षणासाठी सजगपणे काम करावे लागणार आहे.

दोन वर्षाचा हा टप्पा खरं तर फारच छोटा टप्पा आहे, अजून मोठा प्रवास-मोठी लढाई बाकी आहे. या प्रवासात थोरा-मोठ्यांचे आशिर्वाद आवश्यक आहेत.

 

 

 

 

 

ॲड. यशोमती ठाकूर

महिला व बाल विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!